Monday, December 23, 2024
किरीटिनं गदिनं चक्रिणं च !
किरीटिनं गदिनं चक्रिणं च…….!
भगवंतांनी दहाव्या अध्यायांत आपल्या स्वत:च्या किमान पंचाहत्तर विभूतींचे वर्णन करताच अर्जुनाला तें दिव्य स्वरूप प्रत्यक्ष पाहण्याची घोर उत्कंठा निर्माण झाली. त्याला त्याच्या मानवी नेत्रांनी ते विराट नि विलक्षण तेजोमय रूप पाहणे अशक्य असल्याने त्याला दैवी दिव्यदृष्टी बहाल करण्यात आली. तथापि ते अतिविराट आणि प्रखर तेजाने तळपणारे किंवा चकाचौंध करणारे रूप पाहताना अर्जुनाची भीतीने गाळण उडाली आणि त्याने भगवंताला आपले सुपरिचित गोजिरे स्वरूप पुन्हा परत आणण्याची विनंती केली, नव्हे हट्ट धरला !
भगवद्गीतेतील वर दिलेला श्लोक प्रसिध्द आहेच पण माऊलींनी भगवंताच्या त्या रूपाचे दर्शन मोजक्या नि बहारदार शब्दात घडवले आहे.
अर्जुन म्हणतो की हे वैकुंठ-नायका, तुमचे मस्तकावर विराजमान मुगुट तोच आहे, पण त्याची दीप्ती नि तेज अधिकच विलक्षण झालेले पाहतोय मी. आणि तुम्ही करंगळीवर लीलया फिरवीत असलेले सुदर्शन चक्र पेलण्यासाठी अम्मळ मागे रेलून तुम्ही उभे आहांत. खरोखर, ते मनोहर दृष्य कधीच विसरणे शक्य नाही. दुसऱ्या हातात धरलेली गदा देखील खिळवून ठेवणारी आहे. तुमचे रिक्त असलेले दोन्ही हात मात्र अतिशय चपळाईने आणि विलक्षण कुशलतेने लगामांना मागेपुढे ओढताना दिसत आहेत. हे नीलवर्ण प्रभो, तुझे हे गोजिरे स्वरूप तू माझ्या विनंतीचा अव्हेर न करतां क्षणार्धात विराट करून दाखवलेस आणि पुन्हा सगुण साकार स्वरूपात आपले दिव्य दर्शन दिलेत हे केवळ त्या दिव्यदृष्टीमुळेच मी पाहूं शकलो.
विश्वरूप दर्शनाबरोबरच मला भावले ते किंचित मागे रेलून सुदर्शनचक्र पेलणारे भगवंताचे गोजिरवाणे सांवळे रूप ! तुम्हाला ?
रहाळकर
२३ डिसेंबर २०२४.
Sunday, December 08, 2024
गप्पांची मेहफिल !
गप्पांची मेहफिल !
किती महिने, खरंतर कितीतरी वर्षें निघून गेलीत एखादी झक्कास गप्पांची मेहफिल जमून ! मला वाटतं बारा वर्षांपूर्वी सागर किंवा कैवल्यच्या विवाह-सोहोळ्याआधी किंवा कदाचित मोहिनीच्या लग्नापूर्वीं. तसं म्हटलं तर सिध्दिश्रीचे विवाहाच्या पूर्वसंध्येला खरीखुरी बहारदार मैफल जमली होती तीस वर्षांपूर्वी आणि त्यावेळी रत्नाकरांचे सूत्रसंचालन मिश्किल पण बहारदार झाले होते.
या सर्व कौटुंबिक मैफिलींबद्दल बोलायचे कारण इतकेच की आतांशा लग्न-मुंजींचे सोहोळे खूप थाटामाटांत होत असले तरी त्यांतील सामुहिक पर्सनल् टच् क्वचितच लक्षात येतो. बरेचसे संवाद सोपस्कार म्हणून तरी होतात किंवा लहान लहान ग्रूप्समधे ! आणि म्हणून पूर्वीचे सोहोळे आठवले की त्यांत रमून जायला होते आतांशा .
वास्तविक गप्पांच्या मैफिली जमायला कोणत्याही मोठ्या इव्हेंटची गरज नसते. चार समविचारी डोकीं एकत्र आली की संवाद सहज घडूं शकतो. मग ते राजकारण असो, क्रिकेट, टीव्ही सीरियल्स, रस्त्यांची दुर्दशा, बेदुंध ट्रॅफिक किंवा खादाडी केंद्रें का असेनात !
मात्र अशा गप्पांच्या मैफिलींना साधारण सत्तर वर्षांपूर्वी एक भक्कम व्यासपीठ उभारण्यात मला खारीचा वाटा मिळाला होता नि तो म्हणजे आम्ही पाच युवकांनी सुरू केलेले ‘अभ्यास-मंडळ’ ! विशेष म्हणजे त्या अभ्यासमंडळाने वयाची पन्नाशी गांठलेली मला कित्येक वर्षांपूर्वी कळून खूप आनंद झाला होता. असो.
खरंतर मनमोकळ्या पण एखादा विशिष्ठ विषय पुढ्यात ठेवून केलेली चर्चा म्हणजेच अभ्यासमंडळ. यात क्वचित वादविवाद घडू शकतो पण बरेचसे माहीत नसलेल्या पैलूंचेही दर्शन घडत असते. साईसंघटनेत असताना स्टडी-सर्कल हा एक महत्वाचा कार्यक्रम असला तरी त्यातील प्रत्यक्ष उपस्थिती आणि सहभाग खूप अभावाने दिसत असे आणि याचे कारण बहुधा सहभाग घेणाऱ्या व्यक्तींचा पांडित्याचा दुराभिमान असणे शक्य आहे. मुळांत अभ्यास मंडळ कां नि कशासाठी हेच नीट कळत नसावे. तेही असो.
मला आज खूप याद येतेय ती मागे कधीतरी खूप रंगलेल्या गप्पाटप्पांची. आम्ही सर्व भावंडें फारा वर्षांनी एकत्र आले होतो नि जवळजवळ सहा सात तास खूप विषयांवर नि आठवणींवर गप्पा छान रंगल्या होत्या. मात्र सरते शेवटी दिवाकरने उच्चारलेले एक निरीक्षण अतिशय बोलके होते. तो म्हणाला होता की आपण सर्व जरी वेगवेगळ्या डोंगरांवर उभे असलो तरी आपल्या प्रत्येकाची ‘उंची’ जवळजवळ सारखी आहे ! कितीही वादविवाद झाले, असहमती असली तरी त्यातून प्रत्येकाच्या झोळींत काही ना काही भर पडत असतेच.
वरील लिखाणाला ‘गप्पांची मेहफिल’ असे म्हणण्याचे कारण म्हणजे निव्वळ गप्पा न मारतां त्यातून मनसोक्त आनंद, समाधान आणि ऊर्जा मिळवता आली पाहिजे. एखादी सांगीतिक मैफल, काव्य-वाचन, झकास जमून आलेला परिसंवाद, खूप रंगलेले कीर्तन वगैरे सर्व ‘मैफिल’ या सदरात मोडायला काय हरकत आहे ?
हल्ली दारावरची बेल वाजवून ‘गप्पा मारायला आलोंय, वहिनी फक्कड चहा टाका बुवा’, असे म्हणत कुणीच अचानक येत नाहीत ही खंत मागेच बोलून झाली आहे, मग गप्पांची मैफल जमणार तरी कशी ?
रहाळकर
८ डिसेंबर २०२४.