Thursday, October 17, 2024

 

करुणा - Compassion !

 करूणा’ - Compassion ! 

आज कधीपासून एक सुंदर भजन सतत मनात घोळतंय्, जे मी कधीतरी गात असे अतिशय तल्लीन होत ! होय, मी गातसुद्धा असे कित्येक भजनें माझे ऐन जवानींत ! जवानीत भजने ? ? थोडंसं ऑड वाटलं तरी तोही प्रमाद घडलाय माझ्याकडून ! तसं पाहिलं तर त्याच्याही कितीतरी आधी मला चक्क भीमसेन म्हणत माझी भावंडें. कसचं कसचं ! !जाऊ देत झालंअसो

करूणाहा शब्दच मुळात इतका अर्थपूर्ण, नव्हे भावपूर्ण आहे की तो एकदा का मनात रूंजी घालू लागला की विचारांची बुलेट ट्रेन सुसाट धावत सुटते विनाथांबा. अगदी तेच घडतेंय या क्षणीं

करूणासागर महाराज, स्वामी कारुण्यानंद, करूणाष्टकें नि  करूणा-त्रिपदी अशी कित्येक करूणा शब्दाशी निगडीत नावें, विशेषणे वगैरे खूप गर्दी करत आहेत मनांत. सबब, आज या विषयाचा फडशाच पाडीन म्हणतो


वास्तविक करूणा, दया, क्षमा वगैरे दैवी गुण प्रत्येकाचा स्थायी भाव असतो, अगदी प्रत्येकाचा. मात्र तो व्यक्त होण्यासाठी एखादा प्रसंग, अनुभव किंवा आठवण पुरेशी असते. ईश्वराकडे करूणेची भीक मागण्यात काहीच गैर नसल्याने तशी वेळ कुणावर आलीच तर मागेपुढे पाहण्याचे कारण नसावे. मनापासून याचना करावी आणि तो दयासागर कधीच हात आखडून घेत नाही आपला. तथापि त्या याचनेंत आर्तता हवी, निकड असावी आणि मनोमन पूर्ण शरणागती

आमची कित्येक भजनेदया करो, कृपा करो, आनंद दोअशी वारंवार विनंती करणारी असत. उगीच नाही एखाद्या त्यागराजावर, मीरेवर, चैतन्य महाप्रभूंवर तो कृपासागर प्रसन्न झाला. अगदी जीझस देखील अशाच करूणेची महती गात राहिला नि अनुयायांकडून करवीत राहिलाय्. Matthew said, ‘Ask and you will get it ; Seek, and you shall find it ; Knock, and the doors shall open for you’ ! 


आपल्याला देखील एखाद्या अगतिक माणसाबद्दल अचानक करूणा दाटून येते. का बरें ? कारण निदान त्या क्षणीं आपण त्याच्या दु:खाशी किंवा अडचणीशी समरस होऊन जातो नि अंत:करणात दडून असलेली दया नि करूणा उफाळून वर येते, चार धीराचे शब्द आपसूक मुखरित होतात नि जमेल तेवढी मदत करायला आपण उद्युक्त होतो. यांचे कारण आपणही मुळात तो करूणासागर असतो. (अहं ब्रह्मास्मि चा प्रत्यक्ष पुरावा ! )


काही तर्कट मंडळी या उत्स्फूर्त प्रतिक्रियेला सत्व-रज-तमादि त्रिगुणांशी जोडण्याचा प्रयत्न करतील पण अतिशय तमोगुणी किंवा रजोगुणी असलेला माणूसही कधीतरी दयार्द्र असू शकतो हे कोण नाकारतील ?


गाडी तर्कटपणाच्या नि विसंवादाच्या रूळांवर वळण्याआधी थांबणे श्रेयस्कर !

रहाळकर

१७ अक्तूबर २०२४.      


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?