Friday, August 30, 2024

 

संतकवी त्यागराज

 संतकवी त्यागराज

दक्षिण भारतातले तुलसीदास म्हणता येतील असे संत त्यागराज आपल्या कर्नाटक शैलीत उत्तम संगीतकार, कवी आणि प्रखर रामभक्त म्हणून ओळखले जातात.  


वास्तविक कर्नाटक शैलींत संगीत-रचना करणारे शेकडो कलाकार होऊन गेले असले तरी त्यांतील तीन दिग्गज म्हणजे संत त्यागराज, मुथ्थुस्वामी दिक्षितार आणि श्यामा शास्त्री. या पैकीं संत त्यागराजांचे नाव केवळ दक्षिणेतच नव्हे तर अखिल विश्वात श्रध्दा आणि आदरपूर्वक घेतले जाते. दक्षिणेतील इतर संतकवींमधे पुरंदरदासांचे नावही ठळकपणे जाणवते


महाराष्ट्रांत देखील हजारो संतांनी सुंदर काव्यरचना केल्या आणि त्या घराघरांत पोहोचल्या नि रूजल्या सुध्दाउत्तरेकडे तुलसीदास, मीराबाई, कबीर वगैरे संतमंडळींनी आपापल्या सुंदर मनोवेधक रचनांनी भक्तांची हृदयें नि कान तृप्त तृप्त केले. तथापि दाक्षिणात्य त्यागराज त्या मानाने आपल्याला फारसे माहीत नसतील म्हणून हे अल्पसे निवेदन


त्यागराजांचा जन्म कंबम् या गावीं, आंध्रातील कुरनूल जिल्ह्यात झाला सन सतराशे सदुसष्ठ सालीं. संगीत आणि भक्तिभाव त्यांना वारसा म्हणून प्राप्त झालेला. त्यांचे मूळ नाव - काकर्ला त्यागब्रह्ममम्, जे नंतर केवळ त्यागराज म्हणून रूढ झाले. संगीताची उत्तम जाण असलेले त्यागराज बालपणापासून वीणावादनात प्राविण्य मिळवते झाले. त्यांची पहिलीवहिली संगीत रचना होती देशिका तोडी रागातलीनमो नमो राघवैय्या’, त्यांना विलक्षण नावलौकिक मिळवून देणारी

त्यांच्या जन्मभूमीचे नाव तिरूवायुर म्हणून प्रसिध्द आहे, ज्यांचा अर्थ होतो संगम. वास्तविक थिरूवायुरला पाच नद्यांचा संगम आहे - कावेरी, कोलेरम, वेण्णा, कुडामूर्ती नि वेत्तार

त्यागराजांची कवने विलक्षण मधुर, सहज सोपी, हृदयंगम आणि  भक्तिभावाने ओसंडणारी असत. त्यांची एक पंचरत्न कृतीयंदरू महानुभावलुम्हणजे जिथे जिथे महानुभाव असतील तिथे तिथे मी त्यांना वंदन करतो. ( ज्या कोणीशंकराभरणम्हा मूळ तेलुगु चित्रपट पाहिला असेल त्यांना हे गीत निश्चितच आठवून पुन:प्रत्याचा आनंद मिळेल ! ) असो


कमालीची रसानुभूती नि रमणीयता त्यांचे गायनाचे वैशिष्ठ्य म्हटले पाहिजे. त्यागराजांनी सुमारे चोवीस हजार कवनें केली असे म्हणतात


अजून एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजेतिरूवायुरचा प्रत्येक नागरिक संगीताचा खराखुरा दर्दी, चाहता नि रसिक आहे हे कित्येकांना माहीतही नसेल बहुधा


मी आत्ताच सांगितले की त्यागराजांनी चोवीस हजार कवनें लिहिलीत. त्यांतील किमान तीन हजार कवने आजही कित्येक कलाकार, विद्वान नि रसिकजन प्रत्यहीं गातात, इतके ते विशाल साहित्य जपून ठेवण्यांत आले आहे ! त्यांच्या अजरामर कवनांद्वारे केवळ कर्नाटक संगीतच नव्हे तर भारतीय संस्कृती अधिक समृध्द होण्यास मदत झाली आहे हे नि:संशय

सुप्रसिध्द कर्नाटक शैलीचे गायक बालमुरली कृष्णन् यांनी त्यागराजांची अनेक भजने ताकदीने गायिली आहेत आणि ती सहज उपलब्धही आहेत. जिज्ञासूंनी जरूर शोध घ्यावा

त्यागराजांना नारद मुनींचा अवतार म्हणतात, मात्र फकीरी वृत्तीने राहणारा हा संतकवी सन अठराश् सत्तेचाळीस सालीं ऐंशियाव्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला

इति शम्

रहाळकर

३१ ऑगस्ट २०२४      



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?