Wednesday, August 28, 2024

 

फन्न्नी लॅंग्वेज !

 फन्न्नी लॅंग्वेज

कुठल्या तरी सिनेमातला अमिताभचा एक संवाद खूप गाजला होता.  ‘इंगलिस इज फन्न्नी लॅंग्वेज, सीयूटी कट् और बीयूटी बट्, तो फिर पीयूटी पुट् क्यों’ ? वगैरे वगैरे. खरंतर शब्दच्छल, पॅरोडी किंवा विडंबन हा एक आगळा वेगळा साहित्यिक प्रकार म्हटला पाहिजे. आचार्य अत्र्यांचीझेंडूची फुलेंएकेकाळी खूप गाजली होती. अर्थात त्याआधी नि नंतरही तसे प्रयोग अनेक झाले आणि अगदी गंभीर स्वभावाच्या मंडळींनाही त्यांची दाद देणे भाग पडत गेले


या निमित्त मला इंग्लंड मधील काही शब्द स्वस्थ बसू देईनात. तिकडे ग्रीनिच चे खरे स्पेलिंग ग्रीनविच असे असते तर वूलिचचे वूलविच असते ; लिसेस्टरला ते लेस्टर म्हणतील तर वोर्सेस्टरशायर निव्वळ वूस्टर ! वेल्स या ब्रिटनच्या भागातील स्पेलिंग्ज तर फूट फूट लांबीची असतात, अगदी अस्सल इंग्रजांनाही सहज वाचता येणारी

पुट्टपर्थी नजीकच्या कित्येक गावांची नावे कधीच नीट उच्चारता आली नाहीत. कोठ्ठाचेरूवूला ते कोच्चेरू म्हणत तर चिम्मन-चेर्ला उच्चारायला जीभेला कष्ट पडत ! असो


 एकूणच जगभरातील सर्व भाषांतविडंबनहा प्रकार अनूस्युत असावा. अगदी कालिदासाच्या मेघदूतम् पासून शेक्सपियर पर्यंत सर्व साहित्यिकांच्या लिखाणांचे यथेच्छ विडंबन झालेले आपल्याला माहीत आहे. मुळात त्या विषयाची पुरेशी जाण असल्याशिवाय त्यावर विडंबन केवळ हास्यास्पद होईल. बरेच वेळी विडंबन वाचल्यानंतर मूळ साहित्य वाचावेसे वाटते असे म्हटले तर ते वावगे ठरू नये

विडंबन म्हणजे नुसतीच खिल्ली उडवणे नसून त्यातील गर्भितार्थ उकलून दाखवण्यासाठी त्याला विनोदाची झालर लावण्याचे काम विडंबन हा साहित्यप्रकार करीत असतो. एऱ्हवीं अतिशय गंभीर तत्त्वज्ञान समजून घ्यायला अशा कुबड्या उपयुक्त ठरू शकतात


प्रारंभीं अमिताभचा संवाद सांगायचे कारण इतकेच होते की प्रत्येक भाषेचे वैशिष्ठ्य त्यावरील विडंबनाने अधिक प्रभावीपणे समजावे. जगातली प्रत्येक भाषा, मग ती लिखित असो वा बोलीभाषा, आपली अस्मिता आणि दिमाख जपून असते. त्यांतील गुणदोष समजून घेण्यासाठी कधी विनोद तर कधी गांभिऱ्याची मदत घेणे त्या भाषेला अधिक समृध्द करत असते


कशी वाटली आजची बकबक

रहाळकर

२८ अगस्त २०२४.     


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?