Sunday, July 28, 2024
तुझ् आहे तुजपाशी !
तुझे आहे तुजपाशी !
‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व’ असे कायमस्वरूपी ब्रीद मिळवलेल्या पु. लं. चे हे गाजलेले, अजरामर असे नाटक प्रत्यक्ष नाट्यमंदिरांत जाऊन मी एक्केचाळीस वेळा आणि नंतर टीव्ही नि यूट्यूबवर किमान दहा वेळा पूर्णपणे पाहिले आहे यावर कुणाचाच प्रथमदर्शनी विश्वास बसणार नाही, पण ईश्वरसाक्ष नि मात्यापित्यांची सौगंध खाऊन सांगतो की हे त्रिवार सत्य आहे.
अगदी पहिल्यांदा हे नाटक मी इंदौरच्या गांधी हॉलमध्यें पाहिले आणि लोकाग्रहास्तव झालेला सलग दुसऱ्या दिवशींचा प्रयोगसुध्दा मी पुन्हा पाहिला होता. त्यावेळी इन्दौरमधील प्रथितयश नाट्यकर्मी बाबा डिके यांनी ‘काकाजीं’ची भूमिका साकार केली होती तर ‘आचार्य’ होते राहूल बारपुते, ‘नईदुनिया’ या हिंदी दैनिकाचे प्रधान संपादक. उषाचा रोल आदा केला होता सुमनताई धर्माधिकारींनी आणि ‘श्याम’ हे अफलातून पात्र रंगविले होते त्या काळचा अतिशय नटखट नट बंडू देवलने ! डॉक्टर सतीश होते इंदौरमधले सर्वात हॅंडसम प्रा. मराठे, तर ‘गीता’ चा रोल मधुवंती दांडेकर या (त्या काळच्या ) नाजुक साजुक सुस्वरूप युवतीने केला होता. अतिशय बेरका डिके घराण्यातल्या वासुअण्णांचा वट रंगवला होता तितक्याच बेरकी चंदू पारखीने !
या सर्व पात्रांची नावे एवढ्यासाठी सांगितली की ती कदाचित तुम्ही या आधी ऐकली असावीत ( किंवा नसावीत ! )
पुण्यात आल्यावर मात्र हे नाटक मी लागले तितक्या वेळी पाहिले. अगदी राजा परांजपे, राजा नेने, राजा गोसावी, शरद तळवलकर, रमेश देव-सीमा, आशालता वाबगांवकर वगैरेंपासून थेट दाजी भाटवडेकरांपर्यंत सर्व सर्व दिग्गज कलाकार मला पाहता आले.
नुकतेच अमेरिकेतील कुठल्यातरी महाराष्ट्र मंडळाने सादर केलेले हेच नाटक पाहून खरोखर डोळ्यांचे पारणे फिटले, मन तृप्त तृप्त झाले आणि इतकी वर्षे पाहात आलेल्या प्रयोगांवर कळस चढल्याचे जाणवले. तेथील हौशी कलाकारांनी या नाटकाचा गाभा समजून उमजूव केलेले, उत्तम अभिनय आणि सर्वोत्तम दिग्दर्शन असलेले हे नाटक मी यूट्यूबवर पाहिले खरे पण ती लिंक ‘सेव्ह’ करू शकलो नाही ही खंत आहे.. बरे कोणत्या ‘स्टेट’ मघले हे महाराष्ट्र मंडळ आहे तेही आता आठवत नाही. हा हन्त हन्त ! असो.
या नाटकाच्या हिंदी आवृत्तीतील एक उतारा स्व. डॉ. मायाताईंनी काही वर्षांपूर्वी सादर केला होता. हिंदी असो वा मराठी, एकूणच ही कलाकृती विलक्षण आहे हे नि:संशय.
आज पुन्हा एकदा गतकालीन रम्य स्मृती चाळवल्या आणि आत्तां आभाळ जसे भरून आले आहे तसे मनही भरून वाहते आहे………!
रहाळकर
२८ जुलै २०२४