Saturday, March 09, 2024

 

दोन पुस्तके

 दोन पुस्तकें 

आमच्या जमान्यात बहुतेक तरूणाईने वाचलेल्या दोन पुस्तकांचा धावता परामर्ष घेईन म्हणतो. त्यातील एक म्हणजे ऑटोबायोग्राफ़ी ऑफ योगी, नि दुसरे नोबेल पारितोषिक विजेते पर्ल एस् बक् चे दि गुड अर्थ. दोन्ही विंग्रजी भाषेत लिहिली असली तरी पहिल्या पुस्तकाची भाषांतरें अनेक भाषांत उपलब्ध होती. मला वाचायचा भरपूर सराव असला तरी ती दोन्ही पुस्तके वाचून संपवायला मला अनेक महिने लागले होते. त्या मानाने इतर ग्रंथ वा कादंबऱ्या मी सहसा आठवड्यांत संपवीत असे


ऑटोबायोग्राफ़ी ऑफ योगी हे पुस्तक समजून घ्यायला मला बऱ्यापैकी मशक्कत करावी लागली हे निर्विवाद, कारण विषय नीट समजून घेतल्याशिवाय मी सहसा पुस्तक बाजूला ठेवत नसे. कॉलऱ्या सारख्या गंभीर आजारांत मृत्यू समोर दिसत असलेल्या स्थितींत स्वामीजींना आलेले विलक्षण दैवी अनुभव खरोखरच अवाक् करणारे होते आणि ते वर्णन वाचताना अंगावर अक्षरश: काटा आला होता. तदनंतरची त्यांची योगसाधना आणि जगभरांत झालेले शेकडो नव्हे हजारो साधक अनुयायी अजूनही कार्यरत आहेत


पर्ल् बक् ची बहुतेक सर्व पुस्तकें मी आधाशासारखी रिचवली होती त्या काळीं. अतिशय सोपी सुंदर ओघवती लेखनशैली पुस्तक बाजूला ठेवू देत नसे. साधारण एकोणीसशे पन्नास ते साठ च्या दशकात मी त्यांची सर्व पुस्तके वाचू शकलो. अर्थातदि गुड अर्थअंम्मळ नंतर वाचले मात्र तेही संपूर्ण कारण तेव्हांना मी पर्ल बक् चा नि:सीम चाहता झालो होतो. अमेरिकन असूनही बहुतांश वास्तव्य चीन मधे झाल्याने तत्कालीन चिनी संस्कृतीचा खोल ठसा त्यांचे पुस्तकांतून दृग्गोचर होत असे. चीन देखील भारताप्रमाणे कृषिप्रधान देश होता तेव्हा आणि दि गुड अर्थ मध्ये तत्कालीन आणि तत्पूर्वीच्या शेतकऱ्यांचे दुखदर्द, जमीनदारांचे अय्याशी जीवन वगैरेंवर अतिशय प्रभावी आणि सुंदर चित्रण यात आढळेल आणि या पुस्तकाला नोबेल पारितोषिक देऊन गौरवान्वित केले जाणे औचित्यपूर्ण म्हणता येईल

पर्ल एस् बक् ची आत्तां आठवत असलेली पुस्तके म्हणजेलेटर फ़्रॉम पेकिंग’, ‘ ब्रिज फ़ॉर पासिंग’, ‘ईस्ट विंड - वेस्ट विंड’, ‘दि मदर’, ‘दि बिग वेव्ह’, ‘दि एनिमीवगैरे वगैरे. होय, सर्व वाचली आहेत मी अर्थात सर्वच विस्मरणांतही गेलीत आतां


तथापि आज वरील दोन पुस्तकांचा उल्लेख वाचून समवयस्कांच्या स्मृती चाळवल्या गेल्या तर हा उपद्व्याप सार्थक म्हणावा लागेल नि तरूणाईने वाचली नसल्यास त्यांना स्फूर्ती होईल या सदभावनेने हे चऱ्हाट आवरते घेतो

रहाळकर

मार्च २०२४ 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?