Monday, March 25, 2024

 

माया निरूपण !

 माया निरूपण !

थांबा, कुठे जाऊ नका कारण आजचे हे निरूपण ब्रह्म, माया वगैरे पारमार्थिक विषयावर नसून चक्क ऐहिक व्यक्तीं बद्दलचे दिलखुलास कथन आहे. तसेही समर्थ श्रीरामदास स्वामी किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी पारमार्थिक मायाबद्दल  इतके अलौकिक आणि विस्तृत विवेचन केलेले आहे की त्यांचेच शब्द पुन्हा गिरविण्यांत नेहमीच हंशील असते असे नाही कारण त्यांत आपले हंसे होण्याची दाट शक्यता असते

मी आत्ताच म्हटले दिलखुलास कथन, पण कृपया माझी अंतस्थ भीती समजून घ्या कारण मी कदाचित त्यांचे वैगुण्यही बोलून जाईन कदाचित

सरळ त्या तीनदेवियांबद्दल थोडक्यात कथितो. पहिली माया नावाची माझी एक क्लासमेट किंवा सहाध्यायी होती, बोर्डात प्रथम क्रमांकाने पास झालेली. साहाजिकच खूप अक्कडबाज. तिचे इंग्रजी बोलणे अक्षरश: फाडफाड असे नि आमच्यातील कुणालाच ते पटकन् कळत नसे. एकतर खूप फास्ट बोलायची ती आणि उच्चारही आम्ही कधीच ऐकलेले. साध्या पेट्रोलला ती पेट्रल म्हणायची नि रॉकेल ला रॉक ऑयल ! मेडिकलची पहिली दोन्ही वर्षे ती पहिली आली पण नंतर कुणास ठाऊक का पण आषाढी कार्तिकी करत कशीबशी बाहेर पडली. तिने विवाह केलाच नाही आणि बरीचशी एकलकोंडा स्वभावाची होत गेली. एक उमदे आयुष्य निष्कारण वाया गेले असे वाटते

दुसऱ्या माया नावाच्या मॅडम ससूनला प्रोफेसर नि एचओडी होत्या बहुधा सर्जरीच्या. एक अतिशय निष्णात सर्जन आणि उत्कृष्ठ शिक्षिका असा नावलौकिक होता त्यांचा. एका मेडिकल कॉन्फरन्स मधे त्यांचा परिचय लांबून झाला होता, कारण शी वॉज चेन-स्मोकर ! ! 

तिसरी व्यक्ती म्हणजे अचाट कर्तृत्ववान, विलक्षण धाडसी, सततच्या कार्यमग्न नि जवळजवळ आख्खे जग एव्हाना पालथा घातलेल्या डॉ. मायाताई सरदेसाई ! नुकताच त्यांचा न्यूझिलंड मधील धाडसी उडीच्या व्हिडिओ बद्दल ऐकले. त्या आधी त्यांची अंटार्क्टिका सफर त्यांचेच कडून ऐकली पाहिली होती खूप वर्षांपूर्वी. जे. कृष्णमूर्तींवरील त्यांचा शोधनिबंध त्यांना विद्यावाचस्पती करून गेला. त्यांनी लिहिलेले जे. कृष्णमूर्ती आणि हेनरी बर्गसन किंवा बर्गसॉं यांच्या तत्वज्ञानावरील साध्धर्म्य किंवा तफावत वाचण्याचा प्रयत्न केला खरा, पण दॅट हॅपन्स टन बी व्हेरी हेवी डोझ फ़ॉर मी ! व्हेरी टॉल ऑर्डर इंडीड ! ! असो. आदित्यशगुन मधील सर्वच रहिवासी त्यांना ओळखतात. कित्येक मैल सायकलिंग तसेच एचआयव्ही बाधित मुलांसाठी त्यांनी केलेले नि करत असलेले कार्य विलक्षण स्पृहणीय आहे, अनेकांनी प्रेरणा घ्यावी असे आहे. त्यांना शतकोटी प्रणाम ! नव्हे, त्यांना काहीच वैगुण्य नाही ! ! ! ( बुरा ना माने होली है ! ) 

रहाळकर

२५ मार्च २०२४  


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?