Sunday, March 17, 2024

 

एक विलक्षण सत्संग

 एक विलक्षण सत्संग 

कित्येक महिन्यांनंतर काल माझे गुरूतुल्य ज्येष्ठ स्नेही श्रीमान देशपांडेकाका आमचे राहत्या घरी आले आणि नेहमीप्रमाणे सत्संगाची लयलूट झाली. जवळजवळ दोन तास विविध विषयांवर चर्चा झाली असली तरी अमृतानुभव या विषयावर त्यांनी केलेले यथार्थ निरूपण आणि तदनुषंगाने ज्ञानोत्तर भक्ती आणि संजीवन समाधी म्हणजे नक्की काय यांवरचे त्यांचे प्रगल्भ विचार ऐकून कित्येक दिवस उपाशी असल्यासारखे आम्ही दोघे या सत्संगांत आकंठ डुंबत राहिलो. खरोखर, आपल्या अवतीभोवती इतकी प्रखर तेजस्वी, ओजस्वी आणि प्रगल्भ व्यक्तिमत्वें सहजगत्या वावरत असूनही फार क्वचित त्यांना ओळखले जाते हा निव्वळ दैवदुर्विलास म्हटला पाहिजे. आता तशी आगळीक होऊ नये याची दक्षता घेऊया आणि गेल्या महिन्यात मी मांडलेल्या विचाराला पुरर्जीवित करण्याचा प्रयत्न करूंया. काल घडलेला विलक्षण सत्संगअभ्यास मंडळाच्या संकल्पनेला चालना देईल असा मला विश्वास आहे

अमृतानुभव हा विषय निरूपणाचा होऊ शकत नाही कारण तो केवळ अनुभवाचा प्रांत आहे असे जरी त्यांनी आग्रहाने म्हटले असले तरी आपल्या सारख्यांना तो विषय कळायला तर हवाच ना ! केवळ त्यावरील पुस्तके वाचून अमृतानुभवाचे यथार्थ आकलन होणे अवघड आहे आणि म्हणूनच काकांसारख्या अधिकारी व्यक्तीने त्याबद्दल सांगितले तर आपण सर्व कृतार्थ होऊ अशी माझी भावना आहे

काल घडलेला सत्संग अधिकाघिक व्यक्तींनी अनुभवायला हवा होता अशी चुटपुट लागून राहिली आहे. श्री देशपांडे काकांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि तुम्हाला ते कधी हवे ते तातडीने मला कळवावे अशी पुन्हा एकदा तुम्हा सर्व सुहृदांना साद घालतो. तुम्ही मला निराश करणार नाही या अपेक्षेने तूर्तास थांबतो.

रहाळकर

१७ मार्च २०२४ 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?