Saturday, March 02, 2024

 

अमृतानुभव - एक अभ्यास - पुष्प पहिले आणि दुसरे


पुष्प पहिलें

अमृतानुभवम्हणजे नक्की काय ? असे पहा, ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी सांगितली ती विशाल सामाजिक भान ठेवून सर्वसामान्यांशी साधलेलाश्रोतृसंवादम्हणूया, तर चांगदेवपासष्टी ही व्यक्तिगत मित्रत्वाच्या भावनेतून लिहिलेल्या पत्राद्वारे साधलेलामित्रसंवादम्हणता येईल

अमृतानुभवमात्र त्यांनी स्वत:शीच साधलेलाआत्मसंवादम्हटला पाहिजे ! आत्मस्थितींत रंगलेल्या ज्ञानदेवांना आपल्या आंतून प्रकट होणाऱ्या अनुभवांचे प्रगटीकरण करण्यासाठी केलेला हा आत्मसंवाद आहे. हा आत्मस्वरूपाच्या अनुभवाचा विषय आहे

लोकांशी बोलताना त्यांना रूचेल, पचेल, समजेल अशा भाषेंत बोलावे लागते. सर्वसामान्य माणसांशी बोलताना तर हे पथ्य पाळावेच लागते आणि ते ज्ञानदेवांनी भावार्थ दीपिकेंत सांभाळले आहे

एखाद्या मित्राशी बोलत असताना तो ज्या भूमिकेवर आहे त्याचे भान ठेवत त्याच्या अपेक्षेनुसार बोलावे लागते, जे ज्ञानदेवांनी चांगदेवपासष्टींत राखले आहे

खरोखर, औचित्त्याची मूर्ती असलेल्या ज्ञानदेवांनी सूक्ष्म विवेक सांभाळत भावार्थ दीपिका नि चांगदेव पासष्टींत संवाद साधला आहे.

मात्र अमृतानुभवाच्या तिसऱ्या संवादाचे वेळी त्यांच्या मनावर कोणतेही ओझे नाही. येथे कोणी श्रोते नाहीत, गुरू नाही, किंवा समानशील असा सुहृद नाही. (मित्राची व्याख्यासमानशीले व्यसनेषु सख्यम्अशी असली तरीव्यसनम्हणजेसंकटहा अर्थ लक्षात असू द्यावा - संकटसमयीं जवळ असणारा, आधार देणारा ! ) असो

येथे श्री ज्ञानदेव आपले आपणच आहेत, दुसरा तिसरा कोणी नाही. गुरूंचा उल्लेख केवळ प्रारंभीच्या वंदनांत नि शेवटी जस्ट जाता जातां केलेला आढळेल. हा निव्वळ आत्मसंवाद असल्याने प्रथेप्रमाणे केले जाणारेमंगलाचरणवगैरे स्तुती या ग्रंथात सापडणार नाही. तेही असो


याआत्मसंवादालाकोणतेही निमित्त नाही, कार्यकारण भाव नाही, केवळ निर्निमित्त स्वान्त: सुखाय असा भाव आहे, अंत:करणातून उमटलेला एक हुंकार, अविष्कार, जो अद्वैतभावाचे ठसठशीत प्रतीक बनून राहिला आहे

या ग्रंथाला कुणा संताने उपनिषद् म्हटले आहे. खरोखर अतिशय गहन विषयाचा यांत उहापोह असल्यानेमौनही मौनावतेअशी स्थिती होते. भगवंतांनी आपल्या विभूती योगांतमौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्’  असे नाही का म्हटले


खरेतर या ग्रंथाच्या प्रारंभीचे पाच संस्कृत श्लोक संपूर्ण ग्रंथाचा गोषवारा देऊन टाकतात. जमलं तर उद्यापासून प्रत्यक्ष सुरूवात करूंया ! (तसाही विषय अतिशय गहन गंभीर असल्याने काऊचिऊचे घास घेऊं म्हणतो ! !




पुष्प दुसरे


अमृतानुभव या ग्रंथाची विवरण करण्याची पध्दत एका अतिशय उन्नत अवस्थेत पोहोचलेल्या पुरूषाचे हृदगत दर्शवणारी आहे हे निर्विवाद. या ग्रंथात वैराग्य किंवा इन्द्रिय संयम आदि साधनांचे विवेचन नाही. ज्याला परमार्थ म्हणजे काय हे माहीत नाही आणि तशी जिज्ञासाही नाही, जो परमार्थ मार्गावर अग्रेसर आहे नि मोक्षप्राप्ती साठी वाटचाल करणारा साधक असेल, अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींचा निर्देश सुध्दा या ग्रंथात मिळणार नाही, कारण सर्व अवस्था ओलांडूनअद्वैत-साक्षात्कारांतपोचलेल्या पुरूषाचाअनुभववर्णन करणारा हा ग्रंथ आहे. कर्माचा उहापोह येथे अभिप्रेत तर नाहीच, पण ज्ञानाचा मार्गही येथे चालत नाही - असा श्री ज्ञानदेवांचा अभिप्राय आहे. अनुभवामृतांत ज्ञान गृहित धरले आहे, किंबहुना त्या ज्ञानाला देखील मागे टाकून अद्वैताचा अनुभव पुढे गेलेला आहे असे  लक्षात येईल

(किती गहन विषयाला आपण हात घालत आहोत याची पुन्हा एकदा जाणीव होताच विलक्षण दडपण येणे साहाजिक आहे. मात्र तुम्ही हा (ही) आगावूपणा सांभाळून घ्याल अशी खात्री आहे ! ) असो


मात्र या अद्वैत निरूपणांतहीभक्तिभावकुठेच लपून राहात नाही. ज्ञानदेवांनी कर्म, ज्ञान, योग यांपेक्षाही भक्तीला प्राधान्य दिले आहे हे विसरता कामा नये. निखळ भक्तीसाठी अहंकाराचा त्याग करणे अत्त्यावश्यक असले तरी अहंभाव त्यागणे सोपे नाही ! स्थूला पासून सूक्ष्मा पर्यंत आणि अज्ञानदशे पासून ज्ञानाच्या अवस्थे पर्यंत त्याचे पदर एका मागोमाग एक असे दडलेले असतात. इतकेच नाही तरमी अहंकाराचा त्याग केलाअशी जाणीव देखील चित्तात दबा धरून बसतेच ना ! (ज्ञानदेव एक सुंदर उपमा देतात - केळीच्या बुंध्याचे एकेक सोपटे काढून टाकता टाकतां त्या सोपट्यांनी वेढलेले मर्यादित आकाश हळूहळू विशाल आकाशांत प्रविष्ट होते, तसा माझ्या अहंभावाचा त्याग करीत करीत शिवशक्ती मध्यें समाविष्ट होऊन त्यांना वंदन करताना आपण त्यांच्यांत विलीन होऊन गेलो आहोत - असा हा ज्ञानदेवांचा भक्तिभाव आहे ! “रंभागर्भु आकाशें / निघाला जैसा //“


जरा विषयांतर झाले खरे, पण अद्वैत निरूपणांतही भक्तिभाव कसा टवटवीत राहिला त्याचा हा नमूना

(अजूनही मूळ ग्रंथापर्यंत आपण आलेलो नाहीत. हरकत नाही, भरपूर वेळ आहे आपल्याकडे थोडे अधिक चिंतन करायला ! ) 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?