Sunday, February 18, 2024

 

प्रायोरिटीज !

 प्रायॉरिटीज !

आज अचानक पुतण्याने एक प्रश्न विचारून मला गडबडवून टाकले. त्याने विचारले की काका, आतां या वयात तुमच्या प्रायॉरिटीज काय आहेत ? तुम्ही आयुष्याबद्दल समाधानी आहात काय किंवा काही करायचे राहून गेले असे तुम्हाला वाटते काय ? मी संभ्रमात पडलो कारण मी आता नुसता उतारवयात नसून चक्क पंच्यैंशी कडे झुकत चाललोंय आणि आता मला पर्याय असे कितीसे असणार. तरी पण प्रसंगावधान ठेवत मी म्हटले की अर्थातच आजपर्यंतच्या माझ्या आयुष्याबद्दल मी पूर्ण समाधानी आहे आणि करायचे राहून गेलेल्या कितीतरी गोष्टी आहेत. साहाजिकच त्याचा प्रश्न की तर मग तुमच्या प्रायोरिटीज काय यावर जरासा विचार करणे आवश्यक वाटले मला. खरंतर आता या वयांत कोणावरही बोजा होऊन राहणे मलाच काय कुणालाच आवडणार नाही. स्वत: स्वत:ची दिनचर्या करत राहता आली पाहिजे एवढीच सीमित आकांक्षा आहे आता. 

 

राहून गेलेल्या गोष्टीं ऐवजी मला काय करता आले याचा लेखाजोखा घेताना जाणवले की ‘सेवे’च्या अनेकानेक संधी आपसूक माझ्याकडे येत गेल्या नि मी बऱ्यापैकी त्यांचा परामर्ष घेऊ शकलो. सुचले तितके, जमले तेव्हढे करू शकलो माझ्या तुटपुंज्या साधनसामग्रीतून. नंतर कधीतरी असेही वाटले की त्याच सामुग्रीत अधिक काही करणे शक्य झाले असते बहुधा. 

तथापि ‘राहून गेलेल्या’ संधींबद्दल बोलताना कुणी सहज विचारेल की सर्वात मुख्य बाब तुला जमली काय आणि ती म्हणजे तू तुझा स्वत:चा आणि पर्यायाने ईश्वराचा ‘शोध’ घेऊ शकलास काय ? यावरचे माझे प्रत्त्युत्तर ऐकून तुम्ही नक्कीच माझा हेवा कराल, कारण मी म्हणणार आहे की स्वत:चा पूर्ण थांगपत्ता मला लागला नसला तरी मी परमेश्वराला नक्कीचशोधू शकलो, पाहू शकलो, अनुभवू शकलो. कारण तो मला अणुरेणूंत, शत्रुमित्रांत, आसमंतांत सर्वदूर सदासर्वदा सतत दिसत राहिला. ओळखायला ऐंशी पंच्चांशी वर्षें गेली तरी तो माझ्याजवळ सतत असतच होता आणि आहेही ! ! 

मला वाटतं पुतण्याच्या त्या प्रश्नांना मी समर्पक उत्तर देऊ शकलो. तुम्हाला काय वाटले ! 

रहाळकर

१८ फेब्रुवारी २०२४


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?