Wednesday, February 14, 2024

 

संस्थानिक !

 संस्थानिक

इन्दौर उज्जैनला जन्मलेले आणि लहानाचे मोठे झालेले आम्ही जेव्हा कधी मुंबई पुण्यास येत असूं तेव्हा इकडचे नातेवाईक आमचीसंस्थानिकम्हणून हेटाळणी किंवा अवहेलना करीत. कारण सोपे होते, आमचे सावकाश हिंदी मिश्रित बोलणे नि संथ गतींत होणारे सर्वच व्यवहार ! बोलण्यांत चटपटितपणा नसायचा , वागणूकस्मार्टनसायची (इकडच्या तुलनेंत ! ) आणि कपड्यांचा वापर देखील साधासुधा असे. साहाजिकच इकडच्या मानाने कधीकधी गबाळपण नजरेत भरणारे ! वास्तविक सर्वच बाबतींत आमचा तिकडचा प्रदेश अधिक सुजलाम सुफलाम असाच होता. खाण्यापिण्याची सुबत्ता किंवा रेलचेल, उत्तम शिक्षण व्यवस्था, सांस्कृतिक वारसा आणि एकंदर खुशहाली  निश्चितपणे उजवी होती


मात्र या नैसर्गिक सुबत्तेबरोबरच एक प्रकारचा खानदानीपणा देखील नजरेत भरावा इतका दृढ झाला नि त्याचे कारण पेशव्यांसमवेत उत्तर भारत काबीज करत असतांना तिकडच्या मातींत रूजून अधिक वैभवशाली झालेली अनेक संस्थाने. मोठमोठाली अशी बडोदा, धार, इन्दौर, ग्वाल्हेर अशी तर रतलाम, झाबुवा, देवास, बडवानी, अलिराजपूर सारखी छोटी छोटी संस्थानें. या सर्व लहानमोठ्या राज्यांतले बहुतांश नरेश किंवा राजे आपापल्या प्रजेंत विलक्षण आदरणीय आणि पूजनीय मानले जात. अर्थात त्यांत काही मॅडकॅप किंवा लांच्छनास्पद निफजले हेही वास्तव असले तरी बरेचसे उत्तम प्रशासक होते हे निर्विवाद. इंग्लंडच्या राजघराण्या प्रमाणेच वर नमूद केलेल्या काही संस्थानिकांवर प्रजेने अतोनात प्रेम केले


पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर, थोरले माधवराव सिंघिया, सयाजीराव गायकवाड इत्यादि मात्तब्बरांनी आपापली राज्ये खरोखर उर्जितावस्थेत आणली हे वास्तव विसरतां येणार नाही. देशात इंग्रजी हुकुमत असूनही त्यांच्या तोडीस तोड अशा अनेक सोयी सुविधा आम जनतेसाठी खुल्या करण्यात आल्या. त्यांत विविध शैक्षणिक संस्था, उत्तम वैद्यकीय सेवा, साहित्य संगीत आणि इतर कित्येक कलांना उत्तेजन आणि संवर्धन अशी अगणित लोकोपयोगी कार्यें यासंस्थानिकांनीहातीं घेऊन तडीसही नेली हे मी जाणून आहे

स्वातंत्र्यप्राप्ती नंतर कित्येक वर्षेप्रीव्ही पर्सया नावाने प्रत्येक संस्थानाला रोखमुआइजाआदा केला जात असे आणि त्या त्या संस्थानाच्या मालकीच्या वाहनांवर लाल नि सोनेरी नंबर- प्लेट्स आणि बोनेटवर संस्खानचा ध्वज मिरवण्यास परवानगी असे. इंदिरा गांधींनी ही सर्व प्रथा मोडीत काढली. असो


आज पुन्हा एकदासंस्थानिकया शब्दावर मीनोस्टॅल्जिकझालो नि मनात येईल तसे लिहीत सुटलो. श्रोत्यांनी या आगळिकीबद्दल क्षमा केली पाहिजे !

रहाळकर

१४ फेब्रुवारी २०२४ 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?