Tuesday, February 13, 2024

 

माझे पितामह !

 माझे पितामह

माझे पितामह म्हणजे मातोश्रींचे वडील अर्थात वासुदेवराव व्यंकटेश लेले हे तत्कालीन शिंदे म्हणजे सिंधिया राजघराण्यात अतिशय सन्माननीय आणि उच्च पदस्थ मनसुबदार होऊन गेले. आज त्यांची पुण्यतिथी असल्याचे ऐकल्यावर त्यांना भावसुमनांजली अर्पण करावी असे वाटले. त्याचे कारण असेही आहे की गतकालीन थोर मंडळींची व्यक्तिचित्रें कुठेतरी जतन केली जावींत ! आजचे तंत्रज्ञान विलक्षण झपाट्याने विकसित होत चालले आहे यात शंकाच नाही. कदाचित शेकडों वर्षांपूर्वीं शिवछत्रपतींना समर्थ श्रीरामदासांनी काय उपदेश केला ते प्रत्यक्ष संभाषण पुढच्या पीढीला ऐकता किंवा पाहतांही येईल ! तथापि आत्तां आपल्या मस्तकात विराजमान सुपर कंप्यूटरचा उपयोग करीत जमेल तितके लिखाण करून जाण्याचा मानस आहे. याहून अघिक विषयांतर होण्यापूर्वीं आजोबांबद्दल चार शब्द

खरंतर मी जेमतेम नऊदहा वर्षांचा असताना त्यांचे निधन झाले होते. तथापि उज्जैन या त्यांच्या वास्तव्यांत आम्ही अनेक वेळा आज्जोळीं जात असूं. तेव्हा ते नव्वदीच्या घरात असावे, मात्र त्यांचे निळेशार भेदक नि करारी डोळे माझ्या अजून स्मरणात आहेत, तसाच त्यांचा धीरगंभीर खणखणीत आवाज. (बहुतेक सर्व लेले कुटुंबियांना स्पष्ट खणखणीत आवाजाची जन्मजात देणगी मिळाली असावी ! ) 

त्यांची शारीरिक उंची जेमतेम पाच फूट दोन इंच असावी मात्र व्यक्तिमत्व म्हणजे आकाशा एवढे उत्तुंग ! एक अतिशय सहृदय, दानशूर व्यासंगी आणि मनमोकळा स्वभाव यांमुळे समाजातील प्रतिष्ठेबरोबरच त्यांचाही मित्रपरिवार प्रचंड होता. गोरेपान आणि तरतरीत नाक असलेले, विनोद आणि संगीतप्रेमी अशी त्यांची ख्याती माझे वडील बोलून दाखवीत. त्यांना सुगंधी अत्तरांचा विलक्षण शौक होता आणि वडिलांशी ते विविध अत्तरांची देवाणघेवाण करीत. कन्नोजच्या अत्तरवाल्यांचा त्यांचे घरी नित्य राबता असे. अतिशय रूपवान, ठेंगण्याठुसक्या रुबाबदार  माझ्या आज्जीबरोबरचा त्यांचा विनोदी वार्तालाप ज्यांनी कुणी ऐकला असेल तो ते कधीच विसरणे शक्य नाही. तीही लाजतबुजत त्यांना योग्य तो प्रतिसाद देत असे ! ( आज्जीचा सहवास आम्हाला बऱ्यापैकी घडला नंतरची तीसपस्तीस वर्षें आणि तिचेकडूनही थोडेबहुत ऐकता आले आजोबांबद्दल. मात्र एक विलक्षण गोष्ट म्हणजे आजोबांचा उल्लेख येताच तिचे लाजून चूर होणे, जे आताचे पीढीला माहीतही नसेल ! ! ) असो


खरंतर स्त्रीसुलभलाजणेया विषयावर खंडीभर लिहिण्यासारखे असले तरी ते आत्तां अप्रासंगिक ठरू नये म्हणून तूर्तास अल्पविराम ! !

रहाळकर

१३ फेब्रुवारी २०२४


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?