Sunday, February 11, 2024

 

स्वभावो दुरतिक्रम: !

स्वभावो दुरतिक्रम:’ ! 

स्वभावाला औषध नाही असा सर्वसामान्य अर्थ काढला तरी स्वभावांत बदल करता येत नाही हा देखील अपप्रचार वाटतो मला, कारण माझ्यासकट इतर अनेक दाखले मी देऊ शकेन ज्यांचेस्व-भावआमुलाग्र बदलले आहेत. आज सकाळी अचानक माझ्या एका जुन्या स्नेह्याची याद आली आणि त्याचे तेव्हाचे विचार आणि वर्तणूक यांत कमालीचा बदल मला जाणवला. एकेकाळी अतिशयईझी गोईंगकाहीसा उच्छ्रुंकल उल्हास आठवला आणि त्याचे सांप्रतचे विचार नि लाईफस्टाईल पाहून चक्क अचंभित झालो मी ! त्याने काही वर्षांपूर्वी भगवी वस्त्रे धारण केली नि भारतभर भगवदगीतेवर प्रवचने द्यायला सुरूवात केली. वाल्याचा वाल्मिकी झाल्याचे उदाहरण प्रत्यक्षात पाहिलेंय मी. मात्र माणसाच्या स्वभावात इतका ठसठशीत बदल घडू शकतो हे अनुभवताना मला स्वत:ला खूप हायसे वाटले एवढे खरे


वास्तविक प्रत्येकाच्या स्वभावाची जडणघडण त्याचेवर घडणाऱ्या संस्कार आणि ज्ञानप्राप्तीवर अवलंबून असते, नेहमीच जन्मजात असते असे नव्हे. महाभारतातल्या प्रल्हादाचे उदाहरण बोलके आहे कारण दैत्यकुळांत जन्म घेतला असूनही तो एक श्रेष्ठतम भक्तराज म्हणून नावाजला जातो. फार लांब कशाला, माझ्यातला फरक मलाच कधीमधी चक्रावून टाकतो ! अतिशय आळशी, कामचुकार, सुखवस्तु असा मी, परिस्थितीला तोंड देत शनै शनै: अजिबात आलस्यहीन, कामसू आणि कोणत्याही कष्टाला ना म्हणणाराबदललो’, हे पत्नीच नव्हे तर सगेसोयरे नि मलाजाणून असणारेकधीच मान्य करणार नाहीत ! तरीही मी बदललो आहे असे माझे प्रांजळ मत आहे. असो


मुळात स्वभाव स्वभाव म्हणजे तरी नक्की काय असते हो ? प्रसंगानुरूप कोणीही प्रसंगोपात्त रिॲक्ट करतोच करतो ना. समोरून अचानक वाघ आला किंवा अंधारात अचानक झाडावरून आपल्यावर कोणी उडी मारली तर आपला स्वभाव राहतो बाजूला नि आपण चक्क पळ काढू पाहतो ! त्या वेळेस धैर्य, शौर्य, खंबीरपण वगैरे क्रियापदें किंवा लक्षणे पलायमान होतात आपल्याला निव्वळ गलितगात्र करीत. म्हणजेच मूळचा शूरवीर, धैर्यशील, विचारी माणूस विपरीत परिस्थितींत सहज डगमगतो आणि सर्व विवेक नामशेष होतो. तर मगस्वभावहा केवळ शांतिपर्वांतच  तग धरू शकतो, संकटसमयीं नव्हे. आता अर्जुनालाच पहा ना, एऱ्हवीं सर्वोत्तम, अतिशय पराक्रमी, विवेकी पुरूष असूनही केवळ आपल्याला आपल्याच लोकांशी लढायचे आहे या क्षुल्लक कारणाने व्यथित झाला आणि शस्त्रे टाकून बाजूला झाला. कुठे गेला त्याचा स्वधर्म, स्वाभिमान, शौर्य, विवेक नि मूळचा स्वभाव ? त्याला पुन्हा वठणीवर आणण्यासाठी भगवंताला सुद्धा काथ्याकूट करावाच लागला ना ? म्हणजेच, स्वभाव केव्हाही परमनंट नसतो, तो बदलणे हाच त्याचा मूळ स्वभाव म्हटला पाहिजे ! तर मग स्वभावाला औषध नाही हा दुष्प्रचार तरी काय म्हणून ? औषध निश्चितपणे असतेच असते, मग ते सदगुरूकृपारूप असो, सत्संगातून प्राप्त होणारे असो वा अनुभवांतीं मिळवलेले असो

आणि म्हणूनस्वभावो दुरतिक्रम:’ हे वचन कितपत ग्राह्य मानावें

रहाळकर

११ फेब्रुवारी २०२४



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?