Thursday, February 01, 2024

 

आह चाफळ !

 आह चाफळ

कालचा दिवस अभूतपूर्व म्हटला पाहिजे आमच्यासाठी कारण गेली कित्येक वर्षे मनात  दबून राहिलेली सुप्त इच्छा अचानक पूर्ण झाली. तसे पाहिले तर आठदहा वर्षांपूर्वी कोकणांत उतरताना दोन वेळा चाफळचे श्रीरामाचे देऊळ पाहिले होते आणि अतिशय सुंदर, सुडौल, मनमोहक संगमरवरी मूर्ती पाहून डोळे दिपून गेले होते. मात्र मंदिर परिसरांत भल्या मोठ्या मनमोहक पारिजातकाच्या झाडा व्यतिरिक्त तुटक्या फुटक्या फरशांवरून चालणे किंचित अवघड जात होते नि पायऱ्याही किंचित उंचसखल अशा होत्या. मात्र काल पाहिलेले तेच श्रीरामांचे देऊळ सर्वच बाबतींत आल्हादक आणि व्यवस्थितरित्या परिपूर्ण जाणवले. तेथील आमूलाग्र बदल पाहून खूप प्रसन्न वाटले. मुळात अतिशय सुंदर मूर्तींची प्रतिष्ठापना एका भव्य दिव्य तरीही माफक गजबजाटीचे स्वरूपात पाहून मनही शांतशांत जाहले


वास्तविक जांवई नि लेकीने आम्हाला आधी महाबळेश्वरची सफर घडवून आणली. तेथील महिन्द्र क्लबचे शेरवुड संकुलात दीड दिवस मनसोक्त शाही पाहुणचार घेऊन आम्ही मेढा मार्गें थेट सातारला नि तेथून श्रीक्षेत्र चाफळला पोहोचलो. खरंतर गेले अडीचतीन महिने पुण्याबाहेर पडलो नसल्याने या ही प्रवासात माझ्यातला हरवत चाललेला बालक पुन्हा एकदा साकार झाला आणि त्याच मानसिकतेंत मी अख्खा प्रदेश आधाशासारखा नजरेत भरून घेत होतो. आधीच पश्चिम महाराष्ट्रातली भरपूर हिरवळ नि डोंगराळ भाग मोहून टाकणारा नि त्यातून आता पुढे कितपत जमेल या हुरहुरीपोटी डोळे थकत असले तरी मिटावेसे वाटत नसलेला मी

खरंच मेढा मार्गें जाणे किंवा येणे एक विलक्षण अनुभव देतो नेहमीच्या वाई-पसरणी घाटा ऐवजी. अतिशय सुरम्य अशी निसर्गशोभा पाहतांना आणि नगण्य ट्रॅफिक ओलांडताना कितीतरी वेळ आपणच आपले असतो. या मार्गावरची लॅंडस्केप्स कोणत्याही चित्रकाराला मजबूर करतील नवनवीन चित्रें रेखाटायला, कवींना अफलातून कल्पना रंगवायला, स्वप्ने पाहणाऱ्या स्वप्नवेड्यांना गुंग करीत माझ्यासारख्या फुटकळाला काही ना काही बडबडायला लावत ! ! असो.

चाफळला लागूनच समर्थांनी वसविलेली तीन मारूती मंदिरे साधी सरळसोट असली तरी त्यांतील हनुमंतांच्या मूर्तींचे मुखवटे विलक्षण सारखे जाणवले आणि मारूतराय आपल्याकडे रोखून पण प्रेमळ नजरेने पाहात असलेले पाहून मन निर्धास्त जाहले ! ! 

श्रीराम लछुमन सीता यांच्या मूर्ती पाहता पाहतां डोळे असे भरून आले की कितीतरी वेळ ते पुसायचे भानही राहिले नाही. खूप खूप लहानपणापासून माझे आराध्य दैवत राहिलेत प्रभु श्रीराम. त्यातून नुकत्याच पार पडलेल्या भव्यदिव्य सोहोळ्यापासून तर अख्खे जग श्रीराम मय झालेले आपण अनुभवत आहोत. तिथे बसून रामरक्षा म्हणत असताना हीच काशी, हीच अयोध्या, हेच रामेश्वरम्, हेच प्रशांतिनिलयम असल्याची विलक्षण संवेदना झाली आणि मन नि गात्रें मुहुर्मुहू जाहली ! ! ! 

रहाळकर

फेब्रुवारी २०२४


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?