Thursday, December 28, 2023

 

अर्धा रत्तल वगैरे !

 अर्धा रत्तल वगैरे !

आमच्या लहानपणी पाढे, परवचा, बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार  तसेच पावकी, निम्मकी, औटकी आणि शुभं करोति रामरक्षा भीमरूपी इत्यादि अनेक स्तोत्रे नि मनाचे श्लोक मुखोद्गत असणे अनिवार्य असे प्रत्येक मराठी कुटुंबात. फारसे पल्ले पडत नसले तरी एकम् दशम्  शतम् सहस्त्रम् वगैरे संस्कृत पाढेही मानगुटी बसत, सॉरी वदवून घेतले जात. मुम्बईला प्रथम आलो तेव्हा मावशीने अर्धा रत्तल आलेंलसूण आणायला पिटाळले होते मला आणि रत्तल म्हणजे किती हे माहीत नसलेल्या माझी चांगलीच टर उडवली होती. (आजच्या मऱ्हाटी पोट्ट्यांना यातले किती माहीत असेल याची कल्पनाच केलेली बरी ! ) असो

ते कसेही असले तरी त्या काळीं याच घोकंपट्टीमुळे पाठांतर छान होई अनेकांचे. आजही समवयस्क मंडळी एखादे कठीण स्तोत्र किंवा एखाद्या नाटकातील उतारा सहजपणे झरझर म्हणताना ऐकले की आपले तेवढे पाठांतर कधीच नव्हते याची किंचितशी खंत वाटून जाते

आजचा प्रचलित नि बहुचर्चित विषय म्हणजेआर्टिफिशियल इन्टिलिदन्सआणि तो चक्क मला टॅन्जेंट मारून आसमंतात विरून जातो. हे प्रकरण गूगल् वगैरेच्याही कित्येक मैल पुढचे आहे म्हणतात. ॲबसोल्यूटली अगाध, अनाकलनीय माझ्या सारख्यांसाठी ! एकवेळ माऊलींचे प्रगाढ शब्दांचा मागोवा घेता येईल कदाचित - अर्थात जाणकारांकडून  - मात्र झपाट्याने वाढत चाललेल्या विज्ञानाला गंवसणी घालायला आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतील हे वास्तव आहे


मी आत्तां म्हटलेविज्ञानाला’, मात्र ज्ञान आणि विज्ञान यांतील मूलभूत फरक आणि वास्तव भगवान श्रीकृष्णाने पाच साडेपाच हजार वर्षांपूर्वी सांगितले आणि माऊलींनी ते अधिक सोपे करून समजावले. मूलत: ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, स्व-रूपज्ञान, परमात्म-स्वरूपाचे शाश्वत असे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे सर्व प्रकारचे प्रापंचिक, दृष्य स्वरूपातील आणि नश्वर अशाश्वत ज्ञान अशी सुलभ परिभाषा सांगितली



माझ्या नातीशी या आर्टिफिशियल इंटिलिजन्स बद्दल चर्चा करत असतांना तिने काहीचौकानेवालीविधाने केली जी माझ्या आवाक्या बाहेरची भासली मला. मुख्य म्हणजे मानवी मेंदू सर्वोपरी सर्वोत्तम असल्याचे माझे मत तिने अतिशय प्रभावीपणे मोडून काढले. त्या विषयाच्या अतिशय गुंतागुंतीचा उहापोह या स्फुट लिखाणातून देणे अशक्य आहे, पण हल्लीची पीढी खरोखर किती प्रगल्भ होत चालली आहे हे प्रकर्षांने जाणवले आणि केवळ सांप्रतची पोट्टीसोट्टीपाठांतरातमागे आहेत काय ही विषण्णता तात्पुरती तरी दूर झाली

रहाळकर

२८ डिसेंबर २०२३



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?