Thursday, November 30, 2023

 

आधा आधा ‘अध्धा’ !

 आधा आधाअध्धा’ ! 

खूप वर्षांपूर्वी इन्दौर ते महू (आताचे बाबासाहेब आंबेडकर नगर ) दरम्यान दिवसातून चार किंवा सहा वेळा एक शटल् किंवा अध्धा धावत असे तीन किंवा चार डब्यांचा. एकूण अंतर होते चौदा मैल नि थांबे असत तीन वा चार. बिजलपूर, राऊ, किशनगंज ही नावें स्पष्ट आठवतात. केवळ त्याअध्ध्यापुरता रेल्वे पास मिळत असे आणि विद्यार्थी तसेच छोटेमोठे व्यावसायिक त्याचा पुरेसा लाभ घेत. एऱ्हवीं त्या काळी इन्दोर रेल्वे स्टेशन वरून जेमतेम तीन गाड्या जा-ये करीत - अजमेर खांडवा एक्सप्रेस, महू-उज्जैन लोकल आणि आमचाअध्धा’ ! ( हे सर्व मार्ग होते मीटर-गेजचे ! ) आजचे इन्दौर रेल्वे स्टेशन आता भारतातील सर्व प्रांत आणि सर्व शहरांशी जोडले गेले आहे ब्रॉडगेजनेखरोखर अचंभित करणारे परिवर्तन आहे हे, अगदी आमच्या नजरेसमोर घडत गेलेले. तरीही गतकाळातील रम्य आठवणी अधिक सुखावह वाटतात हे निर्विवाद, कारण विलक्षण निवांतपण असे त्या काळी. कशाचीही घाईगर्दी किंवा धावपळ नसे, सबकुछ आरामसे हुवा करता था


याअध्ध्यावरून आठवला रामदास पाध्येंचाअर्धवट-रावनि पाडगावकरांचेसांगा कसं जगायचंमधला अर्धा पेला ! लगेच शांताराम बापूंच्या सिनेमातलेआधा है चंद्रमा रात आधीहे गीत. अर्धवट माहितीवर निर्णय घेणारे उतावळे लोक नि अर्ध्यावर संसार सोडून निघून जाणारे काही कमनशीबी लोक


याआधे अधूरेशब्दांची व्याप्ती खरंतर खूप मोठी आहे. ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी , अर्ध्यावरती डाव सोडला अधुरी एक कहाणी’  या पाडगावकरांच्या कवितेतला करूण भाव कसा गलबलून टाकतो नाही अंतरंगाला ! त्यातही अरूण दातेंनी किती भावोत्कट गाऊन टाकलंय् नाही ते गाणे ? हॅट्स ऑफ टु ऑल ऑफ देम . असो


वास्तविक या अर्ध्या निरूपणाचा शेवट ईशावास्योपनिषदांतीलपूर्णमदपूर्णमिदंया श्लोकाने किंवा किमान उल्लेखाने करणे अगत्याचे होते, पण काय करूं आमचे ज्ञान अजूनही अर्धवटच राहून गेलंय् ना भैय्या ! ! ! 

रहाळकर

३० नोव्हेंबर २०२३



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?