Saturday, November 25, 2023

 

ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे एक्केचाळीस १४१

 ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे एक्केचाळीस १४१ 


मानसिक तपाची खासीयत सांगताना श्री ज्ञानदेव म्हणतात -

तरंगांशिवाय असलेले सरोवर, निरभ्र आकाश, सर्परहित चंदनवन, बदलणाऱ्या कलांचा चंद्रमा, चिंतामुक्त राजा अथवा मंदार पर्वतासारखे अडथळे नसलेल्या महासागराप्रमाणे जें मन संकल्प-विकल्पांरहित स्व-स्वरूपांत निमग्न असते. किंबहुना प्रखर ऊष्णतेविना असलेला प्रकाश, अंगावर येणारे भोजन अथवा पोकळी नसलेले अवकाशाप्रमाणे जे मन  आपला मूळ स्वभाव विसरून चांचल्य, संकल्प-विकल्प वगैरे बाजूला सारीत स्व-स्वरूपांत निश्चळ राहते त्या स्थितीला मानसिक तप म्हणावे


या ठिकाणी पुन्हा एक विलक्षण दृष्टांत देतात - “तैसी आपली सोय (स्वभाव) देखे / आणि आपलिया स्वभावा मुके /  “हिंवली (थंडी) जैसी आंगिकें / हिवो नेदी निजांग // अर्थात  स्वत:चे कल्याण साधून आपले आनंदमय स्वरूप पाहतो आणि जसे कडाक्याच्या थंडीने गारठून बधिर झालेली इंद्रियें ती थंडी जाणत नाहीत, तसे जो आपल्या स्वभावाला मुकतो किंवा कलंकरहित पूर्ण चंद्रबिंब जसे विलक्षण सुंदर दिसते तसे निर्मळ मन असणे म्हणजेच मानसिक तप होय


बुजली वैराग्याची वोरप (आकांक्षा) / जिराली मनाची धांपकांप ( चांचल्य आणि भय ) / तेथ केवळ जाली वाफ / निजबोधाची (आत्ज्ञानाची ) // 

(वैराग्यही नकोसे वाटावे, मनाचे चांचल्य आणि भय नामशेष व्हावे आणि केवळ आत्मज्ञान तेवढे  शिल्लक राहावे


म्हणौनि विचारावया शास्त्र / राहाटवावे जें वक्त्र / तें वाचेचेंही सूत्र / हातीं धरी /( म्हणून ज्या मुखाने केवळ शास्त्रविचार बोलावा त्या मुखाने बोलणे बंद करावे

तें स्व-लाभ लाभलेपणे / मन मनपणाही धरूं नेणे / शिवतलें जैसें लवणें / आपूले निज //  ( आत्मस्वरूपाचा लाभ होताच मनाचे मनपण मावळावें, जसे मीठाला सागर स्पर्ष होतांच आपले स्वरूप विरून तेच सागरस्वरूप होऊन जावे )


तेथ कें उठती ते भाव / जिहीं इंद्रियमार्गीं धांव / घेऊनि ठाकावें (प्राप्त करून घ्यावे ) गांव / विषयांचें ते // ( जिथे मनपणच शिल्लक राहात नाही तेथे इंद्रियजन्य विषयवासना कशा उठतील ? ) 


म्हणौनि तियें मानसीं / भावशुद्धीचि असे अपैसी (सहज) / रोमशुची जैसीतळहातासी // ( म्हणून त्या मनात केवळ शुद्ध भाव सहजगत्या नांदतो जसे तळव्यांवर रोम आढळत नाहीत


अधिक काय  सांगू अर्जुना, जेव्हा मनाची अशी निर्विकल्प अवस्था होते तेव्हाच ती मानस तप म्हटली जाते

अशाप्रकारें  देह, वाचा आणि चित्ताद्वारें जे त्रिविध तप सांगितले ते सामान्य तप या सदरांत मोडते. म्हणून आता त्रिगुणांच्या संसर्गामुळे हे तीनही प्रकारचे तप कसे विशेष ठरते तेही सांगतो, लक्षपूर्वक ऐक


क्रमश

      


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?