Wednesday, September 27, 2023

 

नॉक् नॉक् !

 नॉक् नॉक्


बायबल् मधे एक वचन येते - ‘नॉक्, ॲंड डोअर विल ओपन’ ! खरंतर कोणाच्याही घरात किंवा ऑफिस मध्ये शिरताना दारावर टकटक् करीत शिरणे हा एक चांगला शिष्ठाचार आहे, कारण आत असलेली व्यक्ती त्यामुळे जागृत होते, चौकन्ना होते. एखाद्या खोल चिंतनांत गढलेल्या मित्राला नाही का आपण त्याचे लक्ष वेधण्यासाठी गमतीने नॉक् करत ? खरंतर परमेश्वराला साद घालतानाही अशीच युक्ती करत आलोय आपण, मग ते ओंकार असोत वा भूपाळ्या

ज्ञानांचेही असेच आहे. टकटक् करून एक दार उघडले की इतर अनेक द्वारें नजरेस पडतात. आणि मानवी बुद्धीचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याला एकापाठोपाठ तीं दारें उघडावीशी वाटतात. ईश्वराला आळवण्यासाठी लागणारी तीव्रता, आर्तता आणि समर्पण भाव असेल तर तो निश्चितदेतो असे संत सांगतात


या निमित्त मी प्रत्यक्ष पाहिलेला एक प्रसंग सांगण्याचा मोह होतोय मला. कित्येक वर्षांपूर्वी, प्रशांति निलयमचे कॉन्क्रीटीकरण झाले नसतांना तेथील मऊसूत वाळूवरून चालत स्वामी दर्शन देत स्त्रियांच्या ओळींतून गणपती मूर्ती समोरून पुरूषांच्या ओळींकडे अतिशय संथ गतीने येत होते, जणू तरंगत. त्यावेळेस कोपऱ्यावरच्या लहान कमानीखाली एक खेडूत त्याच्या वर्ष-दीडवर्षाच्या बालकाला मांडीवर घेऊन बसला होता. त्या मुलाच्या नाका-तोंडात हास्पिटलच्या नळ्या घातलेल्या होत्या. साहाजिकच ते बालक गंभीर रित्या अत्यवस्थ होते. स्वामी तिकडे पाहून पाहिल्यासारखे संथपणे माझ्या पुढ्यातून चालत बरेच पुढे गेले होते. त्या खेडूताने राहवूनस्वामी sss’ अशी दीर्घ आरोळी ठोकली आणि त्याच क्षणी स्वामी गर्रकन् मागे फिरले, झपाझप चालत त्या खेडुतापर्यंत पोहोचले उजवी बाही वर सरकावत आणि हवेंत हात फिरवीत विभूती साक्षात करून ती त्यांनी बालकाच्या मुखात घातली, कपाळीं लावली नि उरलेली त्या खेडुताच्या ओंजळीत रिकामी केली. तो खेडूत साहाजिकच साष्टांग दंडवत घालता झाला कृतकृत्य होत्साता आनंदविभोर ! नंतर मागोवा घेताना समजले की ते बालक पूर्णपणे व्याधिमुक्त झाले होते या घटनेनंतर ! त्या प्रसंगात अजून एक अद्भुत अनुभवले होते मी, नि ते म्हणजे स्वामी पुन्हा माझ्या समोरून बालकाकडे झपझप चालताना आसमंतांत दरवळलेला दिव्य सुगंध ! होय, त्या सुगंधाचा मला अजूनही प्रत्यय येत राहतो अधूनमधून ! ! 


नाही, मला येथे स्वामींच्या चमत्काराचे वर्णन करायचे नसून त्या आर्त खेडूताच्या केविलवाण्या आरोळीचे आणि तद् नंतर मिळालेल्या प्रतिसादाला अधोरेखित करायचे आहे. खरंतर आपणही असे अनुभव घेत असतो पण योगायोग वगैरे म्हणत तिकडे दुर्लक्षही करत असतो. माझे एक ज्येष्ठ स्नेही नेहमी सांगत, ‘डाक्टर, सदा सर्वदा देव सन्नीध आहे हे विसरू नका. त्याला साद घाला अथवा घाला, तो कायम तुमचे हित करीतच असतो !’ 


मला वाटतंनॉक् नॉक्च्या निमित्ताने माझ्या स्मृतींची बंद कवाडें पुन्हा थोडी किलकिली झालींत आज

रहाळकर

२७ सप्टेंबर २०२३ 




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?