Monday, September 18, 2023

 

माळ्याच्या मळ्यामंदी……!

 माळ्याच्या मळ्यामंदी……!


एक खूप जुने गाणे सहज आठवलें - ‘माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पानी जातं, गुलाब जाईजुई मोगरा फुलवितवगैरे. पण मग लगेचच पुन्हा आठवला मामाच्या उंडासा गांवचा बहरलेला मळा - खूप खूप लहानपणीं पाहिलेला नि त्यात भरपूर हुडदुस घातलेला देखील. अर्थात त्या मळ्यात फुलझाडें फारशी नसली तरी बरीचशी फळझाडें नि गहूं हरभऱ्याच्या ओंब्या लटकलेल्या स्पष्ट आठवतात. परवांच मंजिरीताईंनी सुचवले की काकामाळिये जेऊतें नेले…..’ या ओंवीवर काहीतरी लिहा कारण परमार्थाचे त्या ओंवीत जणू सार भरलेले आहे. ती ओंवी शोधून काढायला फार प्रयास करावे लागले नाहीत कारण मला प्रिय अशा ओव्या किंवा पुस्तकातली वचनें अधोरेखित करून ठेवण्याची माझी जुनी खोड आहे. मी वाचलेले ग्रंथ असे नेहमीच कित्येक रेषा, प्रश्नचिन्हे वा उद्गारचिन्हांनी बरबटलेले तुम्ही सहज पाहू शकाल. ते असो, कारण हरदासाची कथामीवर अडकून पडायला नको


माऊलींची मला नि माझ्या तीर्थरूपांना विशेष आवडलेली ओंवी म्हणजे - ‘माळिये जेउतें नेलें / तेउतें निवांतचि गेलें / तया पाणिया ऐसे केलें / हो आवें गा //‘ - अध्याय बारा ओवी क्र. १२० 

वास्तविक त्या आधीं भगवंत आपल्यातील प्रत्येक अर्जुनाला सायुज्य मुक्तीचे गुपित सांगत आहेत, परब्रह्माशी एकरूप होण्याच्या क्लुप्ती - अर्थात त्याची आपल्याला निकड भासत असेल तरच. वरवर दिसायला सोपे पण प्रत्यक्ष आचरण करायला अवघड असे काही मार्ग सांगून झाल्यावर भगवंत म्हणतात की अर्जुना, तुझे मन नि बुद्धी कायम माझ्यावर खिळून राहू देत. मात्र तुला हेही करायला कठीण जात असेल तर निदानमोटकें निमिषभरी देतु जाय’ ! निमिषभर, डोळ्याची उघडझाप करण्या इतके क्षणिक देखील माझे स्मरण कर ! तेवढे क्षण तरी मन विषयांपासून दूर राहील, त्यांचे आकर्षण  राहणार नाही

तैसे भोगांआतुनि निगतां / चित्त मजमाजीं रिगतां / हळूहळूं पंडुसुता / मीचि होईल // 

अगा अभ्यासयोगु म्हणिजे / तो हा एकु जाणिजे / - याने प्राप्त होत नाही असे काहीच नाही

अर्जुना, या अभ्यासयोगाच्या सामर्थ्याने काही योगी अंतरिक्षांतही संचार करतात, तर काही वाघ सर्प अशा हिंस्त्र प्राण्यांना सुद्धा आपले मित्र करून टाकतात. काही हलाहल पचवितात, काही पाण्यावरून चालत जातात तर काहींना या अभ्यासयोगापुढे वेदही अपुरे वाटतात

म्हणौनि अभ्यासासि काही / सर्वथा दुष्कर ( अशक्य ) नाही / या लागीं माझ्याठायीं / अभ्यासें मीळ //‘ 

तथापि, या अभ्यासासाठी जर तुझ्यांत तेवढे सामर्थ्य नसेल तर तू जसा आहेस तसाच राहा. इंद्रियांना कोंडूं नकोस, भोगांना अव्हेरू नकोस, स्वजातीचा अभिमान सोडू नकोस. कुलधर्माचे पालन कर, विधिनिषेधांचे यथायोग्य पालन कर, तुला ती मोकळीक आहे

परि मनें वाचा देहें / जैसा जो व्यापारू होये / तोमीकरतु  आहे / ऐसें म्हण ! ! ! //

करणें का करणें / हे आघवेंतोचिजाणे / विश्व चळतसे जेणें / परमात्मेनि // 


कमी अधिक घडलेल्या कर्माविषयीं खेद बाळगतां आपले जीवनत्याच्यास्वाधीन करून ठेव. अरे, माळी जिकडे पाटाचे पाणी वळवेल तिकडे ते जसे निमूटपणे वाहात राहते तसे आपल्या कडून जे जे काही घडेल तीत्याचीसत्ता समजावी. असे केले की प्रवृत्ती किंवा निवृत्तीचे ओझे बुद्धी आपल्या शिरावर घेणार नाही, कारण आपल्या चित्तवृत्ती अखंडपणेत्याचेठायीं जडून राहतात


एऱ्हवीं तरी सुभटा / उजू कां अव्हांटा / रथु काई खटपटा / करितु असे ? //

आणि जे जे कर्म निपजे / ते थोडेबहु म्हणें / निवांतचि अर्पिजे / माझ्या ठायीं //

ऐसिया मद्भावना / तनुत्यागीं अर्जुना / तूंसायुज्य सदना “ / माझिया येसी // 


ओम् तत् सत् ब्रह्मार्पणमस्तु” ! ! ! 

रहाळकर

१८ सप्टेंबर २०२३ 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?