Tuesday, June 27, 2023

 

ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे चौतीस १३४

 ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे चौतीस १३४


श्रीज्ञानदेव तमोगुण-प्रधान मंडळींचे आचरण सांगत असताना काही ओंव्या आपल्याही अंगावर शहारे येतील अशा रीतीने लिहून गेले आहेत. म्हणतात तसा नवरस परिपूर्ण ग्रंथ आहे हा. आत्तां बीभत्स रस वर्णन करत आहेत.


अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जना:

  दंभाहंकारसंयुक्ता: कामरागबलान्विता॥५॥॥


(दंभ आणि अहंकार यांनी ग्रस्त असे जे लोक वासना नि आसक्ती यांचे आग्रहामुळे शास्त्रांना मान्य नसलेले घोर तपाचरण करतात ——) 


शास्त्राधारें आचरण करावे असे ज्यांना कधी वाटतच नाही किंवा शास्त्रज्ञानाला आपल्या जवळ फिरकूही देत नाहीत, अथवा थोर व्यक्तींच्या कार्याची जे थट्टा करतात आणि विद्वानांचा तिरस्कार करतात ; फार काय, आपल्या श्रीमंतीचा डांगोरा पिटवीत स्वत:चा बडेजाव मिरवितात, अशांना केवळ पाखंडी म्हणायला हवे -hypocrats ! , कारण ते अशी क्रूर कामें करतात ज्यांना शास्त्रांचा काहीच आधार नाही. उदाहरणार्थ, इतरांचे तसेच आपल्याही शरीराचे लचके तोडून ते यज्ञकुंडांत आहुती म्हणून अर्पण करतात किंवा नवजात बालकांची हत्त्या करून ते रक्तमांस पिशाच्च्याला बळी म्हणून वाहातात. म्हसोबासारख्या क्षुद्र देवतांना प्रसन्न करण्यासाठी स्वत: आठ आठ दिवस उपासाची अनुष्ठाने करतात. ते स्वत: तर असे शरीराला छळतातच, इतरांनाही तसाच त्रास देत राहतात देवाधर्माच्या नावावर

अशा रीतीने तमोगुण रूपी शेतांत पेरलेल्या बीजांचे फळही त्यांना साहाजिकच त्याच स्वरूपात मिळते. त्यांचेकडे समुद्र तरून जाण्याएवढे अंगीं बळ नसते आणि नौकेचा वापरही त्यांना नको असतो, मग दुसरे काय होणार ? किंवा, वैद्याला वैरी मानून त्याने देऊ केलेले औषध जो लाथाडून टाकतो त्याला रोगाच्या यातना सोसण्यापलीकडे अन्य काही पर्याय असतो काय ? अरे, इतरांच्या दृष्टीचा हेवा वाटून जो आपलेच डोळे फोडून टाकतो अशा अंधाला चार भिंतींत कुजत राहण्यावाचून काही पर्याय असतो काय

तैसी होय तयां / आसुरांची स्थिती / मोहें जे धांवती / भवारण्यीं (संसाररूपी रानांत ) //‘

सोडोनी सन्मार्ग / वागती ते स्वैर / निंदोनी साचार / वेदशास्त्रें //‘ 

अशा वेळी, ‘कामु करवी तें करती , क्रोधु मारवी तें मारिती, किंबहुना मातें पुरिती, दु:खाचा गुंडां ! ( मनाला येईल ते करतात, ज्यावर क्रोधित होतात त्याला मारतात, इतकेच नव्हे तर कटकट नको म्हणून मला, म्हणजे माझ्या मूर्तीला- गाडून टाकतात ! ) 

तथापि, स्वत:च्या नि इतरांच्या देहाला जे असा त्रास देतात तो वास्तविक सर्वांच्या अंतर्यामी सर्वत्र असलेल्या मलाच होत असतो

खरेतर अशा पापी लोकांविषयीं बोलून आपलीच वाणी विटाळणे बरे नव्हे. पण त्या आसुरी प्रवृत्तींचा त्याग करावा म्हणून ते बोलावे लागले

प्रेत बाहिरें घालिजे / कां अंत्यजू संभाषणीं त्यजिजे / हें असो हातीं क्षाळिजे / कश्मलातें //‘ ( असे पहा, प्रेत घराबाहेर काढावे लागते, दुष्ट माणसांशी संवाद टाळायचा असतो, इतकेच नव्हे तर हातावरील घाण काढण्यासाठी ते धुवावे लागतात ना - ) 

तेथ शुद्धीचिया आशा / तो लेपु मनवे जैसा / तयांते सांडावया तैसा / अनुवादु हा //‘ ( शुद्ध हेतूने केलेले हे भाष्य केवळ त्यागावे म्हणूनच दूषणास्पद नाही ! ) 


आणि म्हणूनच केवळ सात्विक श्रद्धेचेच परिशीलन केले पाहिजे. अर्जुना, जर कधी आसुरी तमाचा संपर्क होतोय असे तुला वाटलेच तर माझे स्मरण करत राहा कारण त्याचे वांचून दुसरा तरणोपाय नाही


आता सत्वगुणांची जोपासना कशी करता येईल त्याचे गुपित सांगतील श्रीज्ञानदेव.

क्रमश



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?