Sunday, May 14, 2023

 

अवचिता परिमळु……!

 अवचिता परिमळु……! 


आज अवचितपणे ज्ञानदेवांची ही विरहिणी कानीं पडली आणि मन सैरभैर जाहले. या संतश्रेष्ठाच्या अंत:करणातील भगवद् भाव खरोखर शब्दात मांडण्यासारखा नाही कारण तेच प्रत्यक्ष भगवंत आहेत याची प्रचीती वारंवार येत राहते. तथापि, जसे स्वामी म्हणत, ‘I separated Myself from Myself in order to Love Myself !’ ,  ज्ञानदेवांच्या विरहिणी तशाच असाव्यात


आधी ते समग्र कवन पाहूया नि मग जमल्यास त्यातले तात्पर्य किंवा गर्भितार्थ . ते म्हणतात,


अवचिता परिमळु झुळकला अळुमाळु मी म्हणे गोपाळु आला गे माये चांचरती चांचरती बाहेरी निघालें ठकचि मी ठेलें काय करूं   

मज करा कां उपकारू अधिक ताप भारू सखिये सारंगधरू भेटवा कां

तो सांवळा सुंदरू कासे पीतांबरू लावण्य मनोहरू   देखियेला

भरलिया दृष्टी जंव डोळां न्याहाळी तंव कोठे वनमाळी गेला गे माये

बोधुनी ठेलें मन तंव आलें आन सोकोनि घेतले प्राण माझे गे माये

बापरखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा तेणे कायामनेंवाचा वेधियेलें ‘ 


स्वैर भावांतर

मी आपल्या मंदिरांत असतांना सुगंध शीतल वायूची सहज झुळुक आली नि माझ्या मनाला असे वाटले की हा वारा नाही हो, गोकुळातला गोपाळच आहे ! म्हणून त्याला पाहावे या इच्छेने चाचपडत चाचपडत हलकेंच बाहेर आल्यें. परन्तु मी चक्क ठकल्यासारखी  झाल्यें काय करूं ! खरेतर मी शांत व्हावे म्हणून तुम्ही उपचार करताय सख्यांनो, पण त्या पासून मला अधिकच ताप होतोय् ना ! मला तो शारंगधर वनमाली  आणून भेटवा हो ……!  काय त्याचे वर्णन सांगूं, तो सांवळा सुंदर सकंकणु, कंबरेवर पितांबर नेसलेला, लावण्याची तर जणू खाणचनि पाहताक्षणीं चित्त चोरून घेणारा

आणि अशा मनोहारी श्रीकृष्ण परमात्म्याला डोळे भरून पाहू म्हटले तेव्हा तो कोणीकडे गेला कळे, त्याने मला दर्शन देऊन माझे मन आपल्या स्वरूपात बांधून ठेवल्यामुळे माझ्या शरीरातील प्राणच शोषून घेतले गे माये ! ! 

शिवाय रखुमादेवीवर, सुखस्वरूप बाप श्री विठ्ठलाने तर माझे शरीर, मन नि वाणीही वेधून टाकली की गो माये ! ! ‘ 

अद्वैतातून द्वैतात नि द्वैतातून पुन्हा अद्वैतात शिरण्याची हातोटी किती सहज दाखवून जातात नाही श्री ज्ञानेश्वर महाराज ! त्यांच्याविराण्यासुध्दा किती उत्कट, भावपूर्ण आणि आनंददायी असतात हे वेगळ्याने सांगण्याची अजिबात गरज नाही, म्हणून स्वल्पविराम

रहाळकर

१४ मे २०२३







Comments:
खूप सुंदर लिहलत काका ...प्रणाम -- गोपी भालेकर
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?