Saturday, April 29, 2023

 

रंभागर्भु आकाशें / निघाला जैसा !

 रंभागर्भु आकाशें / निघाला जैसा


थांबा, लगेच स्पष्ट करून सांगायचा प्रयत्न करतो. अमृतानुभवातील पहिल्या प्रकर्णांत त्रेसष्ठ चौसष्ठाव्या ओंवीचा उत्तरार्ध आहे हा. एक सुंदर रूपक देतातरंभागर्भाचे’ .‘रंभागर्भम्हणजे केळीच्या बुंध्यातला अल्टिमेट भाग, जिथे पोकळीशिवाय काहीच नसते. केळीच्या बुंध्याचे एकएक सोपटें बाजूला करत गेले तर आंत काहीच उरलेले दिसत नाही. (काहीच नाही हे म्हणणे धार्ष्ट्याचे आहे, कारण तिथे किमानपोकळीतर असतेच ना ! ) या पोकळीला आपण थोडा वेळरंभागर्भम्हणूंया, आपल्या सोयीसाठी

तर, ज्ञानदेव म्हणतातरंभागर्भ आकाशें निघाला जैसा’. वास्तविक पोकळी पोकळीत विलीन झाली ! ती कुठेच आली गेली नाही, ती पोकळी म्हणूनच तरअस्तित्वांतहोतीच की


ज्ञानदेव ओंवीच्या पूर्वार्धात मीठाच्या खड्याचा दृष्टांत देतात. ते म्हणतात की आपला मीठपणाचा लोभ किंवा अहंकार टाकून ते जेव्हा सागरात प्रविष्ट होते त्याच क्षणी ते सागरा इतके विशाल होऊन जाते ! अगदी तसेच शिवशंभूने शंभूपणाचा अहंभाव  सोडतांच  शंभूच शांभवी अर्थात शिवशक्ती होऊन गेले ! अशा त्या एकरूप असलेल्या शिवशक्तीला मी वंदन केले, जसे रंभागर्भ आकाशांत विरून जातो. (माझा ना मी राहिलों ! ! ) 


आज हे सर्व तुम्हाला सांगण्याचे विशिष्ट कारण आहे. खरंतर ती संपूर्ण ओंवी दोनतीन दिवसांपासून वरचेवर कानात रूंजी घालत होती आणिमला सांग, मला सांगअशी भुणभूण करत होती. म्हटले सांगावीच ती तुम्हाला. खरंतर माझ्या अभ्यासाची तीच पद्धत आहे. मला सलग एकाच दिशेने अभ्यास करता येत नाही, पुंजक्या पुंजक्यांत लहान लहान घास करून खायला आवडते मला. (रवंथ करतो म्हणा हवे तर ! ) असो

मी सांगणार होतो विशिष्ट हेतू बद्दल. त्याचे असे आहे कीआजपासून अमृतानुभवाचा अभ्यास करूंयाअसं म्हणता म्हणतां कित्येक दशकें उलटून गेलीत कारण अमृतानुभव हा मुळांत ज्ञानदेवांचाआत्मसंवादआहे. त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती वडील बंधूंनी तशी आज्ञा केली म्हणून. ज्ञानेश्वरीतच असा उल्लेख आहे की कलियुगाच्या झळा सामान्य जनतेला सहन होत नाहीत, सबब त्यांना धीर देण्यासाठी सुंदर ग्रंथनिर्मिती कर ज्ञानदेवा - अशी त्यांच्या सद्गुरूंनी आज्ञा केली

आपल्यातील प्रत्येक चांगदेवासाठी पासष्ट ओंव्या सहज लिहून गेले त्याच कोऱ्या कागदावर

हरिपाठ सांगितले प्रत्येक मुमुक्षु भक्तासाठी, मात्र अमृतानुभव म्हणजे त्यांचे प्रत्यक्ष अनुभव असल्यानेस्वान्त: सुखायया भावनेने त्यांनी आत्मसंवाद साधला


आता मला सांगा, त्यांचे अनुभव-कथन आपल्याला केवळ वाचून कळतील काय ? अमृतानुभवाचीपारायणेंहोत असल्याचे निदान माझ्या तरी माहितीत नाही. तो विषय अतिशय शांतचित्ताने, खूप मनन चिंतन करीतअनुभवायलाहवा. प्रत्येक ओंवीचा शब्दश: अर्थ काढणे शक्य असले तरी गर्भितार्थ समजून घ्यायला कदाचित अनेक जन्म अपुरे पडतील

म्हणूनच तर म्हटले, धीरे धीरे ढाळे ढाळें एकेका शब्दाचा वा ओंवीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करूंया आपण !

रहाळकर

२९ एप्रिल २०२३




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?