Saturday, March 25, 2023

 

ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे सत्तावीस

 ज्ञानेश्वरी सौंदर्य - भाग एकशे सत्तावीस


दैवासुर संपद्विभाग योगया सोळाव्या अध्यायातील आसुरी संपदेविषयीं आपण मागील भागांत विवेचन पाहिले. आता माऊली काम-क्रोध-लोभ या त्रिकुटाचा संहार करत दैवी गुणांचे संपादन कसे करता येईल त्याचे विवेचन करतात

ते म्हणतात

धर्मादिकां चौहीं आंतु पुरूषार्थाची तेचि मातु करावी जैं संघातु सांडील हा ’ - म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरूषार्थांपैकी एकाचा जरी अंगिकार करायचा असेल तर या कामक्रोधादि त्रिकुटाचा सर्वप्रथम बिंमोड करता आला पाहिजे

खरंतर भगवंत या ठिकाणी म्हणतात की या त्रिकुटाचा नायनाट केल्याशिवाय माणसाचे कल्याण झाल्याचे मी कधीही ऐकलेले नाही

जया आपणपें पढिये आत्मनाशा जो बिहे तेणे धरावी हे सोये (संगत) सावधु होइजे ’ (जो आपल्या स्वत:वर प्रेम करतो त्याला आत्मनाशाची भीती वाटणे साहाजिक असल्याने त्याने या त्रिकुटाची कधीच कास धरू नये. त्याने या बाबतींत नेहमीच सावध असले पाहिजे. ) 

माऊली विनोदाने म्हणतात की कोणी पोटाला धोंडा बांधून समुद्रात पोहायला शिरावा किंवा जेवणात जालीम विष कालवून खाण्यासारखे आहे ते

इहीं कामक्रोध लोभेंसी कार्यसिध्दी जाण तैसी म्हणोनि ठावोचि पुसीं ययांचा गा ! ’ 

पुढे म्हणतात,

जैं कहीं अवचटें (चुकून, कळत ) हे तिकडी सांखळ तुटे तैं सुखें आपुलिये वाटे चालों लाभे ’ (जेव्हा कधी या त्रिकुटाची साखळी मोडेल तेव्हाच आपल्या कल्याणाच्या वाटेवर सुखाने जाता येईल ). 


त्रिदोषीं सांडिले शरीर त्रिकुटीं फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय ’ ( असे पहा, वात पित्त कफ या त्रिदोषांनी मुक्त असे शरीर किंवा चोरी चहाडी तंटामुक्त अशा त्रिकुटापासून मुकत असे गाव अथवा आधिभौतिक आधिदैविक नि आध्यात्मिक या त्रि-तापांनी गांजलेले मन जसे समाधानी आणि सुखी असते, अगदी तसेच कामक्रोधमोहादि त्रिकुटाने मुक्त झालेला मनुष्य सुखी समाधानी होतो !

माऊली म्हणतात अशा माणसाला संतसज्जनांचा सहवास लाभतो आणि तो मोक्षमार्गावर अग्रेसर होतो

मग सत्संगें प्रबळें सच्छाशास्त्रांचेनि बळें जन्ममृत्यूंची निमाळें (पडीक जमीन ) निस्तरें रानें

ते वेळीं आत्मानंदें आघवे जे सदा वसले बरवें ते तैसेचि पाटण (स्थान) पावे गुरूकृपेचे  

ऐसा जो कामक्रोधलोभां झाडी करूनि ठाके उभा तोचि एवढिया लाभा गोसावी (परम पद ) होय ’ 

(क्रमश: ……..



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?