Thursday, October 20, 2022

 

अष्टावक्र गीतासार !

 अष्टावक्र गीतासार

परवां माझे धाकट्या बंधूंनी अचानक प्रश्न केला की तुला अष्टावक्र गीतेबद्दल काय माहिती आहे. मी अचंभित झालो कारण परवांच पहाटे मला अष्टावक्र मुनींचे लहानपणीकल्याणमासिकात पाहिलेले चित्र आठवले होते. हा एक विलक्षण योगायोग मानून मी लगोलग नेर्लेकर बुक डेपोकडे कूच केले नि हातीं लागले ते पुस्तक घेऊन घरी आलो. त्याच दिवशी संध्याकाळी हेही समजले की श्रीश्री रविशंकर महाराजांनी याचे छान विवेचन केले आहे. पुढेमागे ते हाती आलेच तर त्याचाही परामर्ष नक्कीच घेईन, तथापि आज तरी मला कळले तेवढे सांगून मोकळा होईन म्हणतो


अष्टावक्र यांनामुनीअसं संबोधले जाते, म्हणून आधी ऋषी आणि मुनी यांतील पाठभेद समजून घेणे हितावह ठरेल. वसिष्ठ, विश्वामित्र किंवा इतर सर्व सप्तर्षी वगैरे ऋषी या कॅटेगरींतले, तर वेदव्यास नारद तुंबर शुक वगैरे मंडळींना  मुनी म्हटले जाते. मुळांत ऋषी म्हणजे सिद्धावस्स्था प्राप्त होण्यासाठी कठोर तपाचरण करणारे तीव्र संवेगी साधक, ज्यांचे षडविकार अद्याप पूर्णत: संपलेले नाहीत, तरमुनीम्हणजे आत्मज्ञान प्राप्त झालेले सिध्द म्हणून नावलौकिक मिळवलेले ! भूल चूक लेनी देनी ! ! 

असो.

मुळांत अष्टावक्र मुनींचा उपदेश जनक राजासाठी होता, जे आत्मज्ञान किंवा आत्मबोध होण्यासाठी अतिशय उत्कंठित अवस्थेंत लीन झालेले होते


आध्यात्मिक क्षेत्रांत तीन निष्ठा महत्त्वाच्या असतात - कर्म, ज्ञान आणि भक्ती, तर एक पाश्चात्य मनोवैज्ञानिक नि गहन तर्कशास्त्री कार्ल यंग मनुष्याची दोन प्रकारांत विभागणी करतो - एक बहिर्मुख नि दुसरे अंतर्मुख. बहिर्मुख लोक कर्म नि भक्तीचा सहसा आश्रय घेतात आणि अंतर्मुख मंडळी बहुधा ध्यान धारणा आणि ज्ञान प्राप्तीसाठी अनुकूल असतात. बहिर्मुख व्यक्तीला ज्ञानमार्ग सहजगत्या उमगत नाही तर सहसा बुध्दिवान आणि चैतन्य तत्वाचा परिचय असणारे ज्ञानमार्गाची कास धरतात. कदाचित म्हणूनच सामान्य माणसांच्या जीवनांत अष्टावक्र मुनींचे तत्वज्ञान आणि उपदेश फारसा प्रचलित झालाच नाही

अष्टावक्र मुनींच्या तत्वज्ञानांत कोणत्याही बाह्य उपचारांची वा सोपस्कारांची आवश्यकता नाही, तर अक्रिय राहून केवळ आत्मबोध म्हणजेच आपण शरीर, मन, बुध्दी अहंकार नसून आपण निव्वळ चैतन्यरूप आत्मतत्व आहोत ही जाण जाणीव निरंतर प्रस्फुटित राहते

भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद् गीतेंत ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा समन्वय असला तरी मुख्य भर अर्जुनाला युध्दप्रवण म्हणजेचकर्मावर झुकते माप देणारा आहे. खरेतर भगवंताचा उपदेश सर्वसामान्य प्रापंचिकां साठी आहे पण अष्टावक्रांचा उपदेश केवळ मोक्षप्राप्तीच्या मुमुक्षूंसाठी आहे. कदाचित म्हणून सर्वसामान्य माणूस  तिकडे ओढला जात नाही, निव्वळ ज्ञानप्राप्तीची  (आत्मज्ञान) उत्कंठा असणाऱ्यांसाठी अष्टावक्र मुनींचा उपदेश अभिप्रेत आहे. श्रीकृष्णाप्रमाणे ते अनेक मार्गांचे विवेचन करत नाहीत तर केवळबोध’ (आत्मबोध) जो अद्वितीय, भावातीत, देश-कालातीत आहे, जो कोणत्याही दृष्टांतांशिवाय तर्कवितर्काच्या पलीकडचा सूत्रबध्द असा अविष्कार आहे. तो निव्वळ ऐकण्या-बोलण्याचा विषय नसून आत्मसात करण्यासाठी आहे हे विसरता कामा नये


प्रखर वैराग्य अंगीं बाणविणे ही या मार्गाची पहिली पायरी आहे ! वैराग्य, अहंकार-शून्यता हीच ज्ञानप्राप्ती आणि अखेरमुक्तीची गुरूकिल्ली, अष्टावक्र गीतेचे सार  असल्याचे सर्व सूत्रें पाहिल्यावर आपसूक कळून येईल

जनक महाराजांनी  अष्टावक्र मुनींना विचारलेल्या प्रश्नांचा, शंकांचा संवाद म्हणूनजनक-अष्टावक्र-संवादस्वरूपात अष्टावक्र गीता प्रसिध्दीस आली आहे


जनक राजाला तरी आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी कोणती पात्रता होती याचा विचार केला तर अहंकार-शून्यता, संपूर्ण शरणागत भाव, देहासक्तीचा समूळ अभाव आणि सर्व बाह्योपचारांचा त्याग हीच त्यांच्यापात्रतेची गमक म्हणायला हवीत

महर्षी पातंजलींनी चित्तवृत्तींचा निरोध म्हणजेच योग असे सूत्र सांगितले, म्हणजेच निर्विकार असणे, साक्षीभाव जोपासणे असले तरी त्यांत यम-नियमादि सोपस्कार वा विधी नाहीत. खरेतर कोणत्याहीक्रियांची बंधनेच अधिक छळत राहतात, त्यांत फलाशा आलीच, अपेक्षा नि प्रतिक्रिया तर जणू हातात हात घालून आलेल्या ! इतकेच नव्हे तर अष्टावक्र मुनीसमाधीला सुध्दा मुक्तीला बाधा आणणारी असे मानतात ! कारण त्यांचा उपदेशजागरणाचा आहे, आपल्या स्व-स्वरूपाबद्दल जागरूक राहण्याचा ! ! त्या आत्मचैतन्याचाबोधहोणे हीच मुळांत मुक्ती होय. विषयांची आसक्ती विषाप्रमाणे त्याज्य झाली कीमोक्षहाताशी आला असे मानायला हरकत नाही

इति शम् ! ! 

रहाळकर

३० ऑक्टोबर २०२२


Comments:
I have also seen astavkra Muni's photo some days ago and today I came across this article.....there must be connection.....
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?