Monday, September 19, 2022

 

उषा माय वाईफ !

 उषा माय वाईफ !

काल वसंत बापटांचासेतुहा काव्यसंग्रह चाळत होतो नि एक कविता सहज पुन्हा वाचली गेली -‘आज अचानक’  - “नव्हती लिहिली तुजवर कविता, आजही नसती लिहिली, नव्हतो कधि लिहिणार परन्तुआज अचानक…..” - आणि या पंक्ती वाचता वाचतां लक्षात आले की जिच्या बरोबर मी गेली छप्पन वर्षें (गोडी गुलाबीने) व्यतीत केली तिचेबद्दल मी अद्याप अवाक्षरहि लिहिलेले नाहीये ! अर्थात सर्वच भावभावना शब्दांतून पुरेशा व्यक्त करता येत नसल्या तरी असे वाटले की निदान आज वाटलेंय् ते उद्या लक्षात राहिलच असे नाही. सबब आभाळाची घडी पुन्हा उलगडून पाहीन म्हणतो


वास्तविकप्रथम तुज पाहतां….’ हे घडलें अदमासें पासष्ट वर्षांपूर्वी. माझ्या धाकट्या बहिणीला म्याट्रिक परिक्षेच्या पहिल्या दिवशींअहिल्याश्रमया शाळेंत तिला सोडायला गेलो होतो मीउषाला त्यांच्या हिलमन् कार मधून ऐटीत उतरतांना पाहिले. धाकटी बहीण सुधा नि उषा एकाच वर्गांत शिकणाऱ्या, बहुधा एकच बेंच शेअर करणाऱ्या. परिटघडीचा स्कर्ट, वर बांधलेल्या दोन वेण्या नि मोठे टपोरे डोळे (प्रत्येकीं पांचशे वॅटचे ! ) पाहून मी अवाक् झालो होतो खरा. नंतर हळदीकुंकवाची बोलावणी करण्याचे काम बहुधा माझ्यावर असत असल्याने दारातूनचआमच्या घरी उद्या हळदीकुंकवाला बोलावलंय्अशी हरळी देत मी धूम ठोकत असे. एकदा मात्र ती (बहुधा बीए ला असतांना ) समोरच्या हॉल मधे भल्या मोठ्या सोफ्यावर मांडी घालून एक जाडजूड ग्रंथ सांभाळीत जाड फ्रेमच्या चष्म्यातून वाचनात गर्क झालेली पाहिली. नेहमीप्रमाणेहरळीदेऊन मी सायकलवर टांग मारत असतांना मनांत विचार आला की ही मुलगी आपली जन्माची साथीदार म्हणून मिळाली तर कित्ती मजा येईल ! नियतीला ते मान्य झाले नि चार वर्षांनी तीच माझी वाईफ बनूनशान गेली


हे सगळे सविस्तर लिहिण्याचे कारण एवढेच की नियती किंवा प्राक्तन कसे आपल्या बरोबर सतत वाटचाल करत असते आणि योग्य वेळी कसा पॉझिटिव्ह हुंकार भरते तें ! नाही कळलं ? असू देत

मला असं म्हणायचंय की ही मनस्वी मुलगी एक सुयोग्य सून, प्रेमळ पत्नी, वात्सल्याची मूर्त अशी माता, उत्तम सुगृहिणी, आदरणीय भावजय नणंद वहिनी वगैरे आणि सन्माननीय काकू नि आतां आजी अशा विविध रूपांत नावलौकिक प्राप्त करती झाली. ॲकॅडॅमिक्स मधे हुषार मुलगी संसाराच्या सारीपाटावर अतिशय यशस्वी अशी व्यक्ती म्हणूनही नांवारूपास आलेली आहे. सर्व इष्ट आप्तेष्ट नातेवाईक इतकेच नव्हे तर सर्वच लहानथोरांशी ती नित्य संपर्कात असते. हा तिचा गुणविशेष मानतो मी

आता थोडे अधिक पर्सनल ! माझ्या साठी ती आता माझे सर्वस्व आहे. लेक-जांवई, मुलगा-सून, नातवंडे नि माझी सर्व भावंडें या वयातही आमची उत्तम प्रकारे काळजी घेतात, वेळीअवेळीं धावून येतात, खूप खूप माया करतात हे सर्व शंभर टक्के खरे असले तरी माय वाईफ कॅन हियर माय इन्नरमोस्ट व्हॉईस ॲंड थिंकिंग - इतकी समरस झालीय् ती माझ्याशी ! माझी आई आम्हाला सोडून गेल्याला आता पस्तीस वर्षे होऊन गेलींत पण तो रोल उषाने कधीच अंगिकारला आहे. अतिशयोक्ती नाही, पण अगदी आईसारखी माया ममता मिळतेय मला, इतकेच कृतज्ञतापूर्वक  नमूद करून आज थांबतो

रहाळकर

१९ सप्टेंबर २०२२


Comments:
Khup sundar
 
Khup sundar
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?