Wednesday, August 31, 2022

 

गोळ्या घेताय् ?

 गोळ्या घेताय्

खूप दिवसां पासून खूप खूप दिवसांसाठी गोळ्या घ्याव्या लागताहेत का आपल्याला ? मला ठाऊक आहे की ते नाईलाजास्तव करणे भाग पडते आहे कारण आपल्या जवळ अन्य पर्याय आत्तां तरी दिसत नाहीत. खरं सांगायचे तर मीही आत्तां त्याच मानसिकतेतून गुजरत आहे. तथापि, या निमित्ताने का होईना, आपण काहीतरी मध्यममार्ग काढायचा प्रयत्न करूंया

मी स्वत: ॲलोपॅथीचा उपासक असलो तरी इतर उपचार पध्दतींबद्दल माझ्या मनांत कायम आदरभाव जोपासलाय् मी. अत्यल्प प्रमाणांत होमिओपॅथीचा अभ्यास देखील घडलाय मागे कधीतरी. तथापि जी काही थोडीबहुत रूग्णसेवा करता आली ती केवळ ॲलोपॅथिक गोळ्या इन्जेक्शन्स द्वारेच. मात्र एक बाब प्रकर्षांने आठवतेंय ती म्हणजे मला सहसा चारपाच दिवस वा क्वचित् एकदोन आठवड्यांपलीकडे रूग्णांवर उपचार करावे लागले नाहीत. (साधा फॅमिली फिजिशियन होतो ना मी ! ) अर्थात काही क्षयरोग्यांना दीडएक वर्षे औषधोपचार केलेत मी, नि मोजक्या चारदोन कुष्टरोग्यांवरही. हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की मैं कभी लम्बी रेस का घोडा रहा ही नही


मात्र काही रूग्ण, नातेवाईक, सगेसोयरे, मित्र वगैरेंना औषधांच्या अति सेवनामुळे उद्भवलेले विकार मी प्रत्यक्ष पाहिलेत नि त्या व्यक्ती आणि त्यांचे हितचिंतक डॉक्टर्सना हतबल होतानाही पाहिले आहे. अर्थात त्या भेषजकांनी तशी पूर्व कल्पना आधीपासून दिली असली तरी रूग्णाला सहन करण्या शिवाय पर्याय नसतो ना


आज हे सर्वज्ञात असलेलेच पुन्हा पुन्हा का सांगतोय हा बाबा असे तुम्हाला वाटणे साहाजिक आहे. तथापि हा बाबा एकेकाळी बऱ्यापैकी यशस्वी भेषजही होता एवढी फुशारकी मारायला मला आत्तां तरी संकोच वाटत नाही

मित्रांनो, मला असं प्रतिपादन करायचं आहे की ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद वगैरे आरोग्यास अनुकूल अशा शाखा एकमेकांना पूरक असोत वा नसोत, त्या एकमेकींना छेद देत नाहीत एकमेकां विरूध्द असे सहसा करत नाहीत कारण मुळांत त्यांचे ध्येय एकच, आणि ते म्हणजे आजार मुक्ती, किमान वेदना निवृत्ती

आपण भारतीय या बाबतींत खरोखर भाग्यवान आहोत की आपल्याकडे केवळ विविध पर्यायच नसून त्यांतील अनेक तज्ञ मंडळी सहज उपलब्ध आहेत. क्वचित काही भोंदू वगळतां अनेक ख्यातनाम योगपरंपरा जपणारे आहेत. उत्तमोत्तमफिटनेस गुरूआहेत. अतिशय विलक्षण नि रमणीय अशी निसर्ग संपदा आहे. (शिवाय तेहेतीस कोटी देवी देवता तर आहेतच ! ! ) मात्र या सर्वांहून अधिक शक्तिशाली असाआत्मविश्वासबळकट करणारी सद्गुरू परंपरा नि अफाट संतसाहित्य आहे. (जरा भरकटतेय ना गाडी ? होय, लगेच रूळ बदलतो - ) ! ! ! 


मला असं सुचवायचंय की आपापल्या तज्ञ डाक्टरांना विश्वासात घेऊन वरील काही पर्याय चांचपण्याचा प्रयोग करून पाहायला हरकत नसावी. कोणी कितीही कंठशोष केला तरी काही हट्टी मंडळी तसे करणार नाहीत. पण मला सांगा, वर्षानुवर्षेंहाय बीपीच्या गोळ्या घेतल्यावर किती जणांनापार्किन्सनझालेला पाहिलाय तुम्ही ? किती जण कायमहायपर ॲसिडिटीसहन करत आलेत ? किती जण मनस्वी नि एकलकोंडे झालेत ? कितीॲलर्जीने त्रस्त आहेत ? किती जणांना हास्पिटल डाक्टर औषधांचेच व्यसन जडलंय ? किती जण खुट्ट झाले कीतपासण्यांच्या जंजाळांत विनाकारण ओढले जातात नि अखेर त्यासोनेरी सांपळ्यांत’ ? 

नव्हे, मला असे नकारात्मक चित्र उभे करायचे नाही. मात्र आपले हातीं असलेले अनमोल आयुष्य आपण अधिक सुखासमाधानांत, अधिक आनंदांत, अधिक चैतन्यांत, अधिक खेळीमेळीने घालवायला हवे - घालवूं शकतो इतके भान बाळगता आले तर खरंच आयुष्याचे सोनें होईल असा मला तरी दुर्दम्य विश्वास वाटतो. पहा तर खरं पतिपत्नी, लेकसून, लेकजांवई, नातवंडे पतवंडें, मित्रमैत्रिणी, आलागेल्याशी  विचारपूस सुसंवाद करून आपण किती भारी ऊर्जा मिळवतो ते

आपला नित्यनेम आपण खरंच कौशल्यपूर्वक आचरत आहोत काय, नियमित व्यायाम परिमित खाणे सांभाळत आहोत काय याची झाडाझडती आपणच आपल्याशी करायची आहे - सेल्फ ऑडिट ! करून तर पहा, मी करतोय हल्ली पुन्हापुन्हा आणि मलाच माझे गुणदोष आपोआप दिसू लागलेत. यालाच मीलाईफस्टाईल मॅनेजमेंट म्हणेन. करून पाहाण्यासारखा असू शकतो हा पर्याय, टनावेरी गोळ्या खाण्या ऐवजी

गणपति बाप्पा मोरया ! ! 

रहाळकर

श्रीगणेश चतुर्थी

३१ ऑगस्ट २०२२


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?