Tuesday, August 30, 2022

 

चारशे चाळीस !

 चारशे चाळीस ! ! 

काल पाठवलेल्याश्री ४२०नंतर आज चारशे चाळीसने डोक्यात ठाण मांडले ! पूर्वी विजेच्या प्रत्येक लहान मोठ्या उपकरण किंवा तारांच्या जंजाळात हा आकडा मानवी कवटी नि दोन हाडक्यां सोबतडेन्जरया शब्दांत रंगवलेला दिसत असे काळ्या पिवळ्या पाटीवर. त्यातून किती जणांना त्याचा बोध होत असेल  नकळे, पण शक्यतो त्याच्या फार जवळ जाणे टाळावे इतपत सामान्यज्ञान त्यांना नक्कीच असेल.


ते असो, मला या चारशे चाळीस व्होल्ट बद्दल जरासे ज्ञान पाजळावेसे वाटले कुणास ठाऊक कां ते ! खरंतर कोणी जाणकार इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा लाईनमन देखील त्यावर मनांत आणले तर प्रकाश टाकायला सरसावेलही ! तथापि माझा उद्देश तत्सम महानुभावांना डिंवचण्याचा अजिबात नाही, कारण मला या निमित्त एक आगळावेगळा सिध्दान्त मांडायचा आहे हे तुमच्या चाणाक्ष नि चोखंदळ नजरेतून सुटले नसणारच म्हणा


तर, चारशे चाळीस व्होल्ट ! खूप वर्षांपूर्वी पुलंनी त्यांच्या एका नाटकांत याचा खूपच ओझरता उल्लेख केल्याचे मला स्पष्टपणे आठवतेंय्. अगदी चारशेचाळीस व्होल्ट हा शब्द नसला तरी एकेका डोळ्याने पाचपाचशे कॅन्डलचा प्रकाशझोत फेकणाऱ्या काही ललनांचा त्यांनी मिस्किलपणे  केलेला उल्लेख सहज म्हणून तरळून गेला मनांत

तेही असू देत कारण विनाकारण वटवट टाळायची असा आज माझा निर्धार आहे

भल्या पहांटे आज जाग आली ती एक विलक्षण दृष्य पाहात असताना. एक अतिशय तेज:पुंज मात्र सुखावह असा सरळसोट उभा दंड, अदमासे पाचसहा फूट रूंद नि जमीनीपासून आकाश, नव्हे अगदी अवकाशापर्यंत पसरलेला पारदर्शक लंबगोल पाहतांना आधी धास्तावलेला मी चक्क त्या विलक्षण दृष्यांत हरवून गेलों ! किती वेळ त्या सुखद अनुभवांत रमलो होतो ते माहीत नाही, मात्र तो खोलवर रूतून बसला हे निर्विवाद ! म्हणूनच तर म्हटले, डोक्यात ठाण मांडून बसलाय तो चारशे चाळीस व्होल्टचा प्रकाश

सकाळी पूर्ण जागा असताना मनीं सहज विचार केला की भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवायला सुरुवात केल्यावर त्याला माझ्या सारखाच अनुभव आला असेल काय ? (किती वेडगळ विचार - कुठे कृष्णार्जुन नि कुठे माझी साखरझोप ! तरी बरें, मी साखरझोपेत असल्याचे मला निदान खात्रीपूर्वक माहीत होते ! ! ) असो असो


काय म्हणतां अजून कालची कॉफी संपली नाही काय ? अहो, मी कॉफी बंद केलीय होमिओपॅथी खाऊं लागल्या पासून. होय, काल दिवसां अकरावा अध्याय वाचत होतो एवढे मात्र खरे. दोन्हींची संगती लावायची माझीच जबाबदारी काय म्हणून

रहाळकर

३० ऑगस्ट २०२२


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?