Thursday, July 28, 2022

 

स्वाभिमान !

 स्वाभिमान

अहंकार आणि अभिमान हे वरकरणी समानार्थी शब्द वाटत असले तरी त्यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे हे मज सामान्य माणसालाही सहज कळते. वास्तविक अहंकार हा कधीच एकट्याने प्रगट होत नसतो. त्याचे बरोबर ईर्षा, दंभ, दर्प, क्रोध, ‘मी नि माझे’, विषयांधता आणि भ्रांतिरूप प्रत्यक्ष आंधळेपण आपोआप व्यक्त होत राहतात. अहंकारावर खूप खूप सांगण्या-ऐकण्यासारखे असले तरी त्याचेच धाकटे भावंड अभिमान किंवा अस्मिता केव्हाही उजव्या ठरतात हे निर्विवाद

धाकट्या भावंडावरूनएक विचार सहज मनांत आला की रावण, त्याचे अनुयायी, मांडलिक नि कुंभकर्ण-शूर्पणखेसारखे निकटवर्तीय रावणासारखेच अति अहंकारी आणि क्रूर म्हणून ओळखले गेले, तर विभीषणासारखा सात्विक प्रवृत्तीचा धाकटा भाऊ किती निरहंकारी निफजला पहा

वास्तविक खरा ज्ञानी पुरूषच अनहंकारी असू शकतो जरी तोअहं ब्रह्मास्मिया बोधांत रमलेला असतो, जे केवळ दृढ आत्मविश्वासाचे प्रतीक म्हटले पाहिजे

दुसरे, ‘गर्व से कहो हम हिंदू हैंया उद्घोषांत केवळ अस्मिताच दृग्गोचर होते ना ? आपल्या कुलशीलाचा सार्थ अभिमान बाळगण्यांत मला तरी अहंकाराचा लवलेश दिसत नाही. आपले वाडवडील, पूर्वज, ऋषिमुनी - ज्यांचे गोत्र आपण श्रध्दा पूर्वक मिरवतो किंवा धारण करतो यांत कुठे दिसतो अहंकार ? किंवा मी भारतभूमीचा सुपुत्र आहे हा भाव केवळ अस्मिता म्हणूनच मानायला हवी की नाही

आपल्याला उत्तम शिक्षक लाभले, उत्कृष्ट शाळा किंवा महाविद्यालयांत शिकतां आले, सन्मानाने नोकरी-व्यवसाय करता आला वगैरे सर्व बाबतींत आपण कसे भाग्यशाली ठरलो हे सांगण्यात किंवा खरंतर अनुभवण्यांत जाणवणारा स्वाभिमान कौतुकास्पद नसावा काय

माफ करा, अहंकार नि स्वाभिमान यांतील ठळक फरक दाखवण्यासाठी एवढी मल्लीनाथी झाली

तथापि या सगळ्याची परिणती अहंकारांत होवू नये हीच ईश्वरचरणीं मनोभावें प्रार्थना आहे. मात्र केवळ प्रार्थना तोकडी पडू नये यासाठी विलक्षण शालीनता, ऋजुता, क्षमावृत्ती आणि दैवी संपदा गाठीशी असणे अत्यावश्यक नाही काय

रहाळकर

२८ जुलाय २०२२


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?