Saturday, July 02, 2022

 

इगतपुरीतल्या रम्य आठवणी !

 इगतपुरीतल्या रम्य आठवणी !

पुण्यातल्या माझ्या प्रदीर्घ वास्तव्यानंतर मी स्वेच्छा निवृत्ती घेऊन काही वर्षें बरेच ठिकाणी वैद्यकीय सेवा रूजू केली. पुट्टपर्थी, इचलकरंजी, नाशिक, शिरडी, वाघोली वगैरे फिरून झाल्यावर शेवटची दोन वर्षें इगतपुरी येथेमहिन्द्रकंपनीत फॅक्टरी डॉक्टर म्हणून काम पाहिले. ती दोन वर्षें अतिशय सुख समाधानांत व्यतीत झाली, परहॅप्स बेस्ट पीरियड टु रिलॅक्स ॲंड एन्जॉय ! नव्हे, हाताला काम नव्हते असे नाही, पण कामाचे कुठलेही टेन्शन असे नव्हते. नऊ ते पाच असे कारखान्याचे काम असले तरी ऑफ़िसर्सच्या कॉलनींत राहणाऱ्या अदमासे दीडशे कुटुंबांची मेडिकल देखभाल करणे ही जबाबदारी माझ्यावर अनुस्यूत होती. (अर्थात त्या पंचवीस महिन्यांत मला एकदाही रात्री बेरात्री उठून धावाधाव करावी लागली नाही. दररोज संध्याकाळी दीड दोन तास मी आमच्या इमारती समोरच असलेल्याक्लिनिकमधे निवान्त बसून गप्पा मारायला आलेल्या काही इंदिनियर्स सोबत मस्तपैकी वार्तालाप करीत असे. आठवड्यातले दोन दिवस काही तज्ज्ञ डॉक्टर्स कंपनीला भेट देत आणि संध्याकाळीक्लीनिकवर देखील फेरफटका मारीत. त्यावेळी कधीतरी त्यांना माझेकिस्सेऐकण्याची त्यांचीफर्माइशमी पूर्ण करीत असे. (अविश्वसनीय वाटत असले तरी सत्य तेंचि वदतो. कारण तेतज्ज्ञडाक्टर्स माझेहून वयाने किमान वीस वर्षें ज्यूनिअर होते आणिआमच्या वेळच्यामेडिकलॲडव्हेंचर्सबद्दल त्यांना कुतुहल वाटे. आणि मीही बऱ्यापैकी तिखटमीठ लावून त्यांची जिज्ञासा शमवीत असे ! ! ) असो


खूपच झकास होती महिन्द्रची कॉलोनी ! टेकडीवर वसवलेल्या त्या सुंदर परिसरांत अमाप वृक्षराजी, फळझाडें नि फुलझाडें, चोवीस तास अखंड वीज नि पाणी, उत्तम वाहन व्यवस्था, क्लब हाऊस, झक्कास कॅन्टीन (मोफत ! ) आणि जिम वगैरे सर्व अत्याधुनिक सोयी आम्हाला सहकुटुंब  मोफत उपलब्ध होत्या.  (आधी म्युनिसीपाल्टींत नि नंतर आश्रमांत किंवा वसतिगृहात राहून काम केलेल्या मला इगतपुरी हे नंदनवन वाटल्यास नवल नाही ! ) . ते असो

इगतपुरी हे खरोखरच एक हिल स्टेशन आहे. उन्हाळ्यांतही कायमकूल’ ! मात्र तिथे पाऊस लई भारी. घरात अक्षरश: ढग शिरत नि चुकून खिडक्या उघड्या राहिल्या तर सर्व जलमय होऊन जाई. इंदौरच्या थंडीनंतर इगतपुरीला तीव्र थंडी पुन्हा अनुभवली, इतकी की नव्याने रूम हीटर्स विकत घ्यावी लागली


कॉलनीच्या ज़रा पुढे अदमासे दोन किमी वर एक भलें मोठे तळें आहे. कॉलनीतली बहुतेक सर्व मंडळी गणपती विसर्जनासाठी तिथे वाजत गाजत जात. दरवर्षीं आनंदमेळावा भरवला जाई, ज्यांत सुगृहिणी आपापली व्यंजने भरपूर किंमतीत विकत असत. (तेव्हाच्या एका सीनियर रिटायर्ड कर्नलने बनवलेले चिकन सूप दहा मिनिटांत संपून गेले मात्र त्याने अगदी तस्सेच तीन वेळा पुन्हा बनवून आणले होते. उषाने मस्तपैकी दहीवडे केले होते ढेर सारे, पण तेही हातोहातखपले’ ! असो


इगतपुरी नजिक अंदाजे दहा किमी वरकपिलधारानांवाचे एक प्रख्यात आणि अतीव सुंदर असे तीर्थक्षेत्र आहे. आम्ही उभयतां तर तिथे अनेक वेळा जात असूच पण येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हमखास तेथील वारी घडवीत असूं. अखंड वाहणारीगोमुखीनि सुंदर घाट बांधलेले तळें, त्यांत फुललेल्या कुमुदिनी, मागल्या बाजूस तिथे वास्तव्यास असलेले साधू आणि त्यांचा हमखास मिळणारा सत्संग यांमुळे आम्ही जणू ओढले जात असूं त्या वातावरणात

एकूणच अतिशय रम्य होता सर्वच परिसर. शिवाय पंचवीस तीस किमी वरील जटायु समाघी परिसर देखील आम्हाला सतत खुणावत राही

इगतपुरीच्या आमच्या वास्तव्यांत अनेक सुहृद कायमचे जोडले गेले, दासबोध अभंग ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवताची मनोहर पारायणे या सर्व सुहृदां समवेत उत्तम प्रकारे करता आली आपल्या घरीं, त्यामुळे दररोज रात्री नऊ ते साडेदहा पर्यंत आम्ही जणू भक्तिरसांत न्हाऊन निघत असूं ! महेश उपासनी अतिशय सावकाश नि स्पष्टपणे ते ग्रंथ वाचत असत आणि अधूनमधून त्यांवर चर्चा रंगत असत. खरोखर स्वर्गसुख असे दुसरे काय असणार

आज अचानक इगतपुरीचा कुठेतरी संदर्भ ऐकला आणि हे सर्व झरझर लिहून काढावेसे वाटले ! क्षमस्व ! ! 

रहाळकर

जुलाय २०२२


Comments:
Atishay surekh lekh,Igatpuri cha tumacha sahvasane tumhi amhala smeudh kele.we can visualize nice pic of Igatpuri through ur article
 
Enjoyed reading..masta👌
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?