Thursday, March 31, 2022

 

अमृतानुभव - प्रकरण दुसरे - प्रास्ताविक

 अमृतानुभव - प्रकरण दुसरें - प्रास्ताविक 

अमृतानुभव - प्रकरण दुसरे - श्रीगुरूस्तवन 

शिवशक्तीशी एकरूप होण्याआधी आपल्या सर्व अहंभावाचा त्याग करीत करीत त्यांना वंदन करताना आपण त्यांच्यांत विलीन होऊन गेलो आहोत असे ज्ञानदेवांनी म्हटले आहे

वास्तविक अहंभावाचा त्याग करणे सोपे नाही. एकवेळ सर्व काही त्यागणे शक्य आहे पण अहंभाव सोडणे महाकठीण खरेच. बरें, हा अहंभाव तरी कसा तर स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत आणि अज्ञान दशेपासून ते ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत त्याचे पदर एकामागे एक दडलेले असतात, इतकेच नव्हे तर आपण अहंकाराचा त्याग केला अशा अतिसूक्ष्म जाणीवेच्या रूपांतही तो चित्तांत लपून राहतोच ! तस्मात्, अहंकाराचे पदर असे एकामागे एक नाहीसे करावे लागतात. ज्ञानदेवांनी केळीच्या बुंध्याचे एकएक सोपटे काढून टाकता टाकतां त्या सोपट्यांनी लपविलेले मर्यादित आकाश हळू हळू विशाल आकाशांत प्रविष्ट होते, तसा माझ्या अहंभावाचा त्याग करीत करीत शिवशक्तींत समाविष्ट होत आपण त्यांना वंदन केले, असे म्हटले आहे. त्यांचे शिवशक्तिवंदन अद्वैतांत अशा रीतीने परावर्तित होते ! (‘रंभागर्भु आकाशें निघाला जैसा ! ! ) 


दुसऱ्या प्रकरणांत गुरूचा महिमा सुंदर ओंव्यांत व्यक्त करतात श्री ज्ञानदेव. खरेंतर ज्ञानेश्वरींत आपल्या गुरूंचा महिमा त्यांनी अनेक स्थळीं आणि निरनिराळ्या प्रकारांनी वर्णिला आहे. तेराव्या अध्यायांतआचार्योपासनम्या पदावरील त्यांचे सविस्तर भाष्य अजरामर तर आहेच, पण गुरूमहिमा गातांना त्यांनी अनेक ठिकाणी काव्यात्म वर्णने केली आहेत तर काही ठिकाणी रूपकांचा आश्रय केला आहे.

अगदी अनुभवामृतांत देखील जे गुरुवंदन येते त्यांत अर्ध्याहून अधिक भाग काव्यपूर्ण वर्णनाचा आहे. गुरू हाउपायवनवसन्तु’, आज्ञेचाअहेवतन्तूआणिकारूण्याचा मूर्त अविष्कारअसे म्हटलेंय. एवढेच नव्हे तरअविद्यारूपी अरण्यांत जीवपणाचे फेरे भोगत असलेल्या (जन्म-मृत्युचे फेरे ) जीवात्म्याला साहाय्य करण्यासाठी गुरू धांवून येतो आणि मायारूप हत्तीचा नाश करून त्याला मोक्षरूपी मोत्यांचा चारा जेवूं घालतो ! त्याने शिष्याला उपदेश केला की प्राप्त होणाऱ्या आत्मज्ञानाच्या कला पौर्णिमेच्या चंद्राची शोभा धारण करतात. गुरूची भेट होताच द्रष्टा नि नानारूपें असलेल्या दृष्य्यांचा मुखवटा गळून पडतो आणि नामरूपात्मक विश्वाचा सगळा आभास नामशेष होतो

उपासनेसाठी कष्ट करीत असलेल्या शिष्याच्या खटपटीला गुरूच्या शब्दामुळे अपार फळ प्राप्त होते. फलभाराने ज्याच्या फांद्या जमीनीपर्यंत टेकल्या आहेत अशा वृक्षाशीच त्याची तुलना होऊं शकते

तथापि, गुरूकृपा-दृष्टीरूप वसंतऋतुचा प्रवेशनिगमवनांत’, म्हणजे वेदांनी सांगितलेल्या ज्ञानांत होत नाही तो पर्यंत भक्ताला इष्ट फळाची प्राप्ती होत नाही

केवळनिरवयवअसलेले आकाशसावेवहोण्याचीहावधरते, म्हणजेच आपल्याला साकार रूप प्राप्त व्हावे अशी इच्छा धरते. गुरू म्हणजेकोण्ही एक भरीव आकाशआहे ! शीतल प्रकाश असलेला चंद्र गुरूमुळे अस्तित्वांत आला आहे, तर सूर्याला त्याचे तेज गुरूमुळे प्राप्त झाले आहे एवढेच म्हणून ज्ञानदेव थांबत नाहीत, तरसामर्थ्याचेनि बिकें / शिवतेंही गुरूत्वें जिंकेम्हणजे सामर्थ्याचे दृष्टीने विचार केला तर गुरू साक्षात शिवाला जिंकतो असे ते म्हणतात

गुरूकृपा झाल्यावर आत्मवस्तुचे अनुभवाच्या दृष्टीने जीवाची इतकी प्रगती होते कीजें शिवपणही वोविळें (ओंवळे)  / आंगी लावी //“ ; 

अथवा, आपली मूळ सच्चिदानन्द अवस्था पुन: प्राप्त करून घेण्यासाठीशिऊ मुहूर्त पुसे / जया जोशियातें ! // “ , असे उल्लेख ज्ञानदेव करतात आणि गुरूचे स्थान शिवाहूनही वरचे आहे असे ठणकावून सांगतात


वरील सर्व विवरण अर्थातच काव्यपूर्ण वर्णनाचे आहेत हे जाणकारांना वेगळ्याने सांगण्याची गरज नाही ! मात्र तेही वर्णन श्रीज्ञानदेवांनी परब्रह्म-भावानेच केले आहे हेही त्रिवार सत्य आहे


प्रत्यक्ष गुरूस्तवनाचे प्रकरण सुरू करण्यापूर्वीं प्रारंभीच मंगलाचरणांत आलेल्या दोन श्लोकांचा पुन्हा परामर्ष घेणे उचित ठरेल


क्रमश


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?