Wednesday, March 30, 2022

 

अमृतानुभव - पुष्प सव्वीसावें

 अमृतानुभव - पुष्प सव्वीसावें 

प्रकरण पहिले

ओंवी क्र. एकोणसाठ

अहो ! ऐक्याचे मुद्दल ढळे / आणि साजिरेपणाचा लाभु मिळे / तरी स्वतरंगाची मुकुळें / तुरंबु का पाणी //५९//‘ 


(साजिरेपण = सुशोभित ; मुकुळ = पुष्प, कमळ ; तुरंबु = वास घेणे, परिधान करणे


आपल्या ऐकत्वाला धक्का लागता पाण्याला जर आपल्याच तरंगांनी शोभा येत असेल, तर पाण्याने आपल्या तरंगांचा आस्वाद का घेऊ नये ? म्हणूनच एकत्व मोडता जर विलास घडत असेल तर त्यांत विशेष ते काय


निज ऐक्या धक्का नसतां तरंग शोभा तत्वतां भोगण्यास्तव मिळत असतां कां सांगा भोगावी ?

तरंग रूपी कमळास भोगूनि घेई त्याचा वास जल आपल्या जलपणास उणीव नाणतां थोडीही ’ 


मोडिता कांही, आपले अद्वैत, होय शोभा प्राप्त, पाणियासी

तरी लाटारूप, कळ्यांचा सुगंध, होवोनि स्वच्छंद, बागडो तें.   ” 



ओंवी क्र. साठ

म्हणौनि भूतेशु भवानी / वंदिली करूनि सिनानी / मी रिघालों नमनीं / ते हें ऐसे //६०//‘ 


(सिनानी = वेगळाली ; रिघालों = उद्युक्त झालो


म्हणून शिव आणि शक्ती यांना अभिन्न मानून मी वंदन करतो. - असा हा माझा वंदनाचा सोहळा आहे


ह्या शिवशक्ति प्रत त्यांच्यांत आणि माझ्यांत आणिकीं किमपि द्वैत मीं तीं उभयतां वंदिलीं

जेवीं सूर्यप्रभेने वंदणें सूर्याकारणें वा जलें जलासी न्हाणणें तैसेच हे


शिवशक्ती लागीं, म्हणोनि अभिन्न, जाणोनि वंदन, केलें ऐसे ” 


ओंवी क्र. एकसष्ट

दर्पणाचेनि त्यागें/ प्रतिबिंब बिंबी रिगे / कां बुडी दीजे तरंगे / वायूचा ठेला //६१//‘ 


(वायूचा ठेला = वायूचे थांबणे

आरशांत मुखाचे प्रतिबिंब दिसते आणि तो दूर झाला की प्रतिबिंब मूळ मुखांत मिसळून जाते, जसे वाऱ्यामुळे पाण्यावर लाटा दिसतात मात्र वारा थांबतांच त्या पाण्यात विरून जातात


दूर केल्या दर्पणातें प्रतिबिंब बिंबीं मिळते वा तरंग विरती जलातें वायू बंद होतांची ।।

येथें वायू आरसा द्वैतपण मी प्रतिबिंब लहरीसमान तें द्वैत गेल्या निघून मी निजबिंबीं मिसळलों


जैसें प्रतिबिंब, बिंबीं होय लीन, सारितां दर्पण, एकीकडे

नातरी तरंग, सागरीं विलीन, वाहता पवन, थांबतां चि.    ” 


ओंवी क्र. बासष्ट

नातरी नीद जातखेवों / पावे आपुल्या ठावो / तैशी बुध्दित्यागे देवीदेवो / वंदिलीं मियां //६२//‘


(नीद = निद्रा ; जातखेवों = जाताक्षणीं


त्याप्रमाणे शिवशक्तिच्या एकरूपतेचा विचार केला असतां द्रष्टा नि दृष्य दोन्हीही उरत नाहीत. अशा अंतर्बाह्य एकरूप शिवशक्तिला माझे वंदन असो


निद्रा जीवभावाची सरतां शिवपण जागृतीची प्राप्ती तात्काळ होते साची लागतां येक क्षण

म्हणून स्वप्नस्थितीचे भान जें सुखदु:खादि मी तूं पण त्याचे होय निरसन निद्रेचिया बरोबरी

ही चि जागृतीची प्रचीती कीं मी आणि शिवशक्ती एकरूप निश्चिती एकपणें एक असूं ’ 


किंवा जैसी निद्रा, संपतांचि साच, मूळ जागृतीच, प्राप्त होय

तैसी अहंबुध्दि, सांडूनि स्वभावें, वंदिली मी भावें, देवोदेवी” 


ओंवी क्र. त्रेसष्ठ 

सांडुनी मीठपणाचा लोभु / मिठें सिंधुत्वाचा घेतला लाभु / तेवीं अहं देऊनि शंभू- / शांभवी झाला //६३//‘ 


मीठाने आपल्या वेगळेपणाचा लोभ सोडून जसा सागराशी एकरूपतेचा लाभ घ्यावा, त्याप्रमाणे मी माझेअहंपणत्यागून त्या शिवशक्ति-स्वरूपात विलीन झालों


मिठें मीठपणाचा लोभ सोडोनि सिंधुचा लाफ घेतल्या साचा सिंधुएवढें ते होई

आतां मिठाचे मीठपण ते तत् ठायींचे काठिण्य काठिण्याची हीच खूण कीं पातळीचें घन झाले

तेव्हांच मिठाचा मीठपणा आला प्रचीतीस जाणा घनत्व या अभिमाना धारण केले पातळानें


मिठें मीठपण, आपुलें सांडोन, रहावें होवोन, सागर चि  

तैसा झालों मी हि , शिवशक्तिरूप, मुळीं होतां लोप, अहंतेचा ” 


ओंवी क्र. चौसष्ठ 

शिवशक्ती समावेशें / नमन केलें म्यां ऐसें / रंभागर्भ आकाशें / रिगाला जैसा //६४//‘ 


(रंभागर्भ = केळीचा गाभा


केळीच्या गर्भांत आकाशाशिवाय काहीच नसते .त्याप्रमाणे माझ्या अहं आणि ममतेची सालपटें काढून टाकून माझे जे गर्भरूप शिवशक्ति आहे, त्यांत विलीन होत माझे हे वंदन आहे


काढितां सोपटे, केळीतील गाभा, जाय जैसा नभा, मिळोनियां

शिवशक्ति-रूपीं, एकत्वें वंदन, अहंता सांडोन, केले तैसें.   ” 


इति श्रीमत् अमृतानुभवे शिवशक्ति समावेशन नाम प्रथमोध्याय: परिपूर्णते” 

                  हरये नमो, हरये नमो, हरये नम



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?