Thursday, January 27, 2022

 

त्यागार्थ बोलिजेल काही ! !

  

‘त्यागार्थ बोलिजेल काही ! ! ‘
आज उषाने मला पूजनीय गुलाबराव महाराजांचा एक दृष्टांत सांगितला. कोणी पांगारकर नावाचे सद् गृहस्थ विठ्ठल प्रतिमेचे पंचामृत पूजन करीत होते. दुसऱ्या खोलींत महाराज बसले होते ते अचानक पूजास्थानी आले नि म्हणाले की अहो प्रतिमेला हलक्या हातांनी स्नान घाला, तुमच्या जोरात मर्दनाने आणि अंगठीमुळे मूर्तीवर पहा कसे ओरखडे आलेत, रक्तबंबाळ झाली आहे ती ! पांगारकरांनी मागे वळून प्रज्ञाचक्षु महाराजांकडे पाहिले आणि ते अचंभित झाले - गुलाबराव महाराजांचे अंगावर ओरखडे उठले होते नि काही ठिकाणी रक्तही आलेले होते. 
भक्त नि परमेश्वराचे ऐक्य तर त्यांनी दाखविलेच, पण माझ्या मनांत विचारांचे रान पेटवून दिले. 
असे पहा, आपण कळत न कळत इतरांना किती सहज दुखावून जातो नाही ? प्रत्यक्ष नसले तरी अपरोक्ष किती तरी वेळा आपण दुसऱ्यां विषयीं विनाकारण बोलतो, त्यांची निंदा केली नाही तरी त्यांचेतील अवगुण किंवा दोष बोलून मोकळे होतो ! आपल्याला इतरांचे दोष दाखवण्यांत किंवा बोलून दाखविण्यांत इतका रस का असतो ? 
मागे कधीतरी ‘अपैशून्य’ नि ‘पैशुन’ वर आपण चर्चा केली आहे. परनिंदा न करणे या सद् गुणाला अपैशून्य म्हणतात आणि त्यावर माऊलींनी बरेच काही सांगितले असले  आणि त्यावर भरपूर चर्चा आपण करत असलों, तरी आपल्यातील किती जण त्याचे प्रत्यक्ष आचरण करतात ? माझ्या पासूनच सुरूवात करायची तर मी म्हणेन की मला तें अद्याप साध्य झालेले नाही. मुळांत मला इतरांतील दोष दिसतात कारण ते माझ्यात भरपूर प्रमाणात आहेत ! ते दोष मुळातून गेले तर मला इतरांतील केवळ दोष न दिसतां त्यांचे गुण अधिक प्रकर्षांने जाणवतील आणि मी फक्त गुणांचेच गुणगान करीन ! 

अवघड आहे ते, हे खरे असले तरी वरील दृष्टांत ऐकल्यावर तरी मी त्या दृष्टीने काही पाउलें टाकीन. ‘काया-वाचा-मनेन’ असे आपण सहज बोलून जातो, मात्र वाचा नि मन यांवर नियंत्रण ठेवत नाही. आधी वाचेवर नियंत्रण आणले तरच मनाला लगाम घालता येईल ! 
पहा कितपत साध्य होईल ते, पण इतरांचे दोषांची वाच्यता तरी नक्कीच टाळतां येईल ना ? खरेतर तोच आध्यात्मिक प्रगतीचा राजमार्ग म्हणता येईल ! 

आज कोणतेही प्रवचन देण्याचा हेतु नव्हता, केवळ एक लहानसा दृष्टांत ऐकून जे काही मनांत खदखदत होते खूप दिसांपासून ते उतरून काढले एवढेच ! क्षमाप्रार्थी हूं मै ! ! 
Best wishes, 
Dr. Rahalkar
 
Visit my blog-site - http://prabhurahalkar.blogspot.com/


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?