Monday, December 27, 2021

 

इम्पॉर्टंट -Important

 

इम्पॉर्रटंट ! 
कित्येक वर्षांपूर्वी आम्ही इटलीतील फ्लोरेन्स हे अतिशय सुंदर नि रम्य शहर व्यवस्थित पाहण्या साठी एक ‘पॉला’ नामक इतालियन गाईडची मदत घेतली होती. मात्र तिचे इंग्रजी उच्चार विलक्षण (नि मोहक ! ) होते. ‘र’ या शब्दाचा वापर ती ‘र्र’ असा वारंवार करत असे, जसे कर्रारा मार्बल किंवा व्हेर्री व्ह्रेर्री इम्पॉर्रंटंट . तुरूतुरू चालत एका हातात उंच धरलेले कागदी भेंडोळे मिरवित ती सर्व चमूला आपल्या मागे जणूं धावत नेई. तिला सहज प्रश्न केला की इथली सर्व शिल्पें नि कलाकृती नग्नावस्थेंत का दाखवली आहेत. दोन मुलें असलेल्या तिने त्याचे उत्तर अतिशय ‘आध्यात्मिक’ दिले. ती म्हणली की ते शिल्पकार किंवा चित्रकार आपली कला जोपासतांना स्त्री-पुरूष असा भेद न करता जणू कालातीत होत त्यांना परमेश्वरा इतकी विशाल दृष्टी लाभत असते ! (ते विश्लेषण ऐकून सर्वजण गुडिगुप्प ! ) असो. 

खरेतर आपण सर्वजण बालपणापासून ‘इंपार्टंट’ हा शब्द ‘आय एम् पी’ असा थोडक्यात वापरत आले आहोंत. पुस्तकांत किंवा वहीवर ठिकठिकाणी आपण Imp. असे लिहून ठेवले असेल. सर्कारी फाईल्स सुध्दा ‘महत्वाचे’ असे दर्शवण्यासाठी हिरव्या किंवा लाल टॅग्ज लावलेल्या आपण पाहिल्या आहेत. त्यांतही ‘अति महत्वाचे’ किंवा ‘टॉप प्रायॉरिटी’ अशाही चकत्या चिकटवलेल्या आपल्याला माहीत आहेत. 

आतां, महत्वाचे किंवा इम्पॉर्टंट कशाला म्हणावे, त्यांतही अति महत्वाचे काय असावे याचा खोलात विचार करण्याचे मज रिकामटेकड्याला वाटणे निव्वळ साहाजिक नव्हे काय ! मात्र मी लिहीत असलेले वाचणे तुम्हाला अजिबात महत्वाचे नाही हे माहीत असूनही मी असाच लिहिणार आहे ! 

खरेतर ‘महत्वाचे’ याचे निकष स्थळकालानुरूप बदलणारे असतात. काल परवां महत्वाचे असलेले आजमितीस इम्पार्टंट असेलच असे नाही. किंबहुना एकाला महत्वाचे वाटणारे इतरांना तसे वाटेलच अशी सुतराम शक्यता नसते. म्हणजेच स्थलकाल, व्यक्तिविशेष किंवा प्रसंगोपात्त महत्व कमीजास्त होऊ शकते तर. 
विद्यार्थी दशेंत, गृहस्थाश्रमांत, सेवानिवृत्ति नंतर आणि आतांशा माझ्या स्वत:च्या प्रायोरिटीज् बदलत गेल्या आहेत हे आता मागे वळून पाहतांना प्रकर्षांने जाणवते आहे. आज माझी प्राथमिकता ईश्वर प्राप्तीची आहे काय ? मुळी सुध्दा नाही ! कारण मला आता कळले आहे की ईश्वराला ‘प्राप्त करणे’ अशी प्राथमिकता मला झेपणारी नाही. मला आत्तां केवळ निरामय, शान्त जीवन जगायचे आहे. ‘न घडो कुणाचा मत्सर, न घडो कुणाचे अहित, न होवो कुणाचा अपमान, कुणीही दुखावले जाऊ नये एवढीच माझी आता प्रायोरिटी आहे (असे मला वाटते ! ) 
सरते शेवटीं - “सर्वे भवन्तु सुखिन: / सर्वे सन्तु निरामय: / सर्वे भद्राणि पश्यन्तु / मा कश्चिद् दु:खभाग्भवेत् //“ हीच प्रार्थना महत्वाची ! ! 

रहाळकर
२७ डिसेंबर २०२१ 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?