Saturday, October 09, 2021

 

श्री विष्णुसहस्रनाम सहा सात आठ नऊ

 ६).   “ओम् अप्रमेयो हृषीकेश: पद्मनाभो अमरप्रभु:      ।

         विष्वकर्मा मनुस्त्वष्ठा स्थविष्ठ: स्थविरोधृवा.    ॥६॥” 

ज्याला प्रमेय अर्थात प्रमाण, साक्ष किंवा पुराव्याची आवश्यकता नाही असा ‘अप्रमेयो’ असून ज्ञान-भक्तीने शब्दांशिवाय अनुभवाचा विषय आहे. ‘हृषीकेश’ म्हणजे इंद्रियांचा स्वामी. मानवी शरीराची इंद्रियें जशी मनाच्या हुकमती खालीं चालतात तसे अवघें विश्व महाविष्णुचे चैतन्यकिरणांमुळे कार्यरत राहते. असे म्हणतात की त्या विश्वकर्म्याला विश्वनिर्मितची उत्कट ‘इच्छा’ झाली आणि ओंकारनाद उमटला नि हे विश्वकमळ उमलले. त्या ओंकार बीजाला नाभिस्थान लाभले ! विश्वनिर्मिती बरोबरच विश्वसंहार करण्याचाही तो प्रलयकाळीं खेळ खेळतो, मात्र स्वत: कधीही लय पावत नाही - असा हा ‘अमरप्रभु:’ होय ! मानवी जीवांबरोबरच अखिल सृष्टीचा लय करणारा हा ‘मनुस्त्वष्टा’ आहे. ‘स्थविष्ट’ म्हणजे अतिविराट असून ‘ध्रृव:’ म्हणजे विचलित न होणारा, स्थिर. 

७).    “ओम् अग्राह्य: शाश्वत: कृष्णो लोहिताक्ष: प्रतर्दन:    ।
           प्रभूतस्त्रिक् कुब्धाम पवित्रं मंगलं परम्.                 ॥७॥” 

अग्राह्य म्हणजे आकलना पलीकडचा आहे कारण हा सूक्ष्मांतला सूक्ष्म आणि स्थूलांतील स्थूल असा अद्भुत ईश्वर आहे. कधीही नष्ट न होणारा असा ‘शाश्वत’ आहे. ‘कृष्ण’ म्हणजे सूक्ष्मांत राहून निखळ आनंददायी - जसे ‘राम’ म्हणजे मूर्तिमंत आनंदस्वरूप ! 
‘लोहिताक्ष’ म्हणजे तप्त लोखंडाप्रमाणे आरक्त वर्णीं नेत्र असलेला, तर प्रलयकालीं सर्व प्राणिमात्रांचे तर्दन म्हणजे नि:शेष करणारा हा ‘प्रतर्दन’ आहे ! 
‘प्रभूत’ म्हणजे महा ऐश्वर्यवान तर ‘स्त्रिककुब्धाम’ म्हणजे तिन्ही लोक नि दशदिशांचे आश्रयस्थान, (कुकुभ म्हणजे दिशा). 
पवित्रं, मंगलम्, परम् यांचा अर्थ विशद करण्याची आवश्यकता नाही ! 

८).   “ओम् ईशान प्राणद: प्राणो ज्येष्ठ: श्रेष्ठ: प्रजापती.      ।
          हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन:                        ॥८॥” 

‘ईशान’ चा अर्थ सर्व जगाचे नियमन नि पालन करणारा जगन्नियंता ! प्राणद: म्हणजे सर्व जीवमात्राला चैतन्यजीवन - जीवन्तपण- देणारा तसेच प्राण हरण करणाराही ! 
सर्वांत पुरातन, वरिष्ठ असल्याने ज्येष्ठ नि श्रेष्ठ आणि सर्वशक्तिशाली म्हणून प्रशंसनीय देखील होय. सर्व प्राणिमात्रांचा स्वामी असा हा प्रजापती आहे, तर ब्रह्मांडरूपी तेज:पुंज हिरण्यगर्भ आहे. 
इवल्याशा बीजामधें जसा संपूर्ण वृक्ष सामावलेला असतो तसे या हिरण्यगर्भांत अखिल विश्व समेटलेले असते - असे श्रुतिवचन आहे. 
पृथ्वीसह सर्व ग्रह तारे नक्षत्रें इत्यदि खगोल  हिरण्यगर्भात सामावली असल्याने याला ‘भूगर्भो’ म्हटले . माधव म्हणजे लक्ष्मीपती तर मधु नांवाचे दैत्याचे निर्दालन करणारा म्हणून मधुसूदन ! 
अशा या सर्वश्रेष्ठ सनातन पुराणपुरूषाला साष्टांग दंडवत ! 

९)     “ओम् ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रम: क्रम:     । 
          अनुत्तमो दुराधर्ष: कृतज्ञ: कृतिरात्मवान्.                ॥९॥” 

निर्गुण निराकार परब्रह्माचे एका अंशावर परमानंदाचे तरंग उमटले आणि तो आनंद द्विगुणीत करण्यासाठी त्या वर्तुळाकार तरंगाचे मध्यभागीं ‘एकोSहं बहूस्याम्’ ही लहर तेजबिंदु स्वरूपात प्रगट झाली आणि ती लहर महाशक्ती आदिमाया म्हणून ओंकारनाद स्वरूपांत ओळखली गेली (मायेचा ‘लहरीपणा’ प्रत्यहीं अनुभवास येतो ना ? ) 
तें परब्रह्मरूप आणि आदिमाया मिळून ‘ईश्वर’ ही संकल्पना रूढ झाली.
‘धन्वी’ म्हणजे धनुष्य धारण करणारा तर महापराक्रमी म्हणून ‘विक्रमो’. 
‘क्रम’ म्हणजे फिरणे, ओलांडणे, घावणे. मनुस्मृतींत गतिमानता म्हणजे श्रीविष्णु असे कोणीतरी म्हटल्याचे स्मरते - मला मनुस्मृती ज्ञात नाही ! 
‘मेधावी’ म्हणजे अतिशय बुध्दिमान हे आपल्याला ज्ञात आहेच, तर अनुत्तमो म्हणजे ज्याचेहून अन्य काहीच श्रेष्ठ नाही असा ! 
‘दुराधर्ष’ म्हणजे दैत्यादिकांना अवध्य, अजिंक्य असा.
‘कृतिरात्मवान’ म्हणजे सर्वांतर्यामी असल्याने प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून त्या जाणणारा आणि भक्तीचा स्वीकार करीत तिला यथार्थ साद देणारी ही  वात्सल्यमूर्ती होय ! 

क्रमश

Comments:
फारच अर्थपू्र्ण
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?