Monday, September 27, 2021

 

शिळोप्याच्या गप्पा !

 

शिळोप्याच्या गप्पा ! 
आज सकाळीं बाल्कनीत बसून उषा नि मी चहा घेत बसलो होतो निवान्त, नेहमीप्रमाणे  अक्षरही न बोलतां. मौन सोडत मी तिला ‘शिळोप्याच्या’ गप्पा या शब्दाचा अर्थ विचारला. त्यावर ती उत्तरली की तीं असतात गतकालीन आठवणींची उजळणी. पूर्ण पटले मला ते. 

खरेंतर आमच्याही आधीच्या पिढ्यांत सांजवेळेस देवापुढे दिवाबत्ती झाल्यावर ओसरीवर बसून गप्पा रंगत. दिवसभराची कामें उरकून हातपाय धुतल्यावर परवचा, रामरक्षा, भीमरूपी वगैरे स्तोत्रे म्हटल्यावर आज्जी दररोज नवनवीन गोष्टी सांगे, कधीकधी जास्त आवडलेल्या पुन्हा ऐकायचीही फर्माईश होई. पुन्हा चुलीजवळ जाण्या आधीं लेकीसुना गप्पाटप्पा करीत तर वडीलधारी मंडळी विडीकाडी ओढत गप्पांचा आनंद घेई. 

कालांतराने शहरी रीतीरिवाज अंगवळणी पडले, ‘सातव्या आंत घरांत’ या नियंमाचे कधीच तीनतेरा वाजले. शिणेमाच्या नि नटनट्यांच्या गप्पा अधिक रंगूं लागल्या. बिनाका गीतमाला न चुकतां ऐकली जाऊ लागली. कधी क्वचित गोवा मुक्तिसंग्रामाच्या बातम्या रेडिओवर ऐकल्या जात आणि त्याही चर्चा घरीदारीं रंगत. 

आणखी नंतर टीव्ही आले नि संपूर्ण संध्याकाळ त्या ‘मूर्ख पेटी’समोर अक्षरश: वायां जाऊ लागली आणि फालतू सीरियल्स नि वाहिन्यांची रेलचेल झाली. घराघरांतला आपसातला संवाद कधीच नामशेष झाला आणि  शिळोप्याच्या गप्पांचा अर्थ विचारण्याची नौबत आली ! 

शिळोप्याचा गप्पा राहू  देत, खराखुरा दिलखुलास सुसंवादही खूपच विरळ झालाय आतांशा. मोबाईल, किंवा खरेतर स्मार्टफोन्सनी प्रत्येकालाच जणू एक्कलकोंडा करून टाकले आहे. दररोजचे शेकडो मेसेजेस वाचायला चोवीस तास अपुरे पडूं लागलेत. चांगली पुस्तके नि ग्रंथ हातीं घेणे दुरापास्त होत चालले आहे. आपण आपला आवडता छंदही हळूहळू विसरत चालले आहोत की काय असे वाटूं लागले आहे.

तरीही मला या सर्वाचे वैषम्य वाटत नाही, अप्रूप तर नाहीच नाही. ‘कालाय तस्मै न म:’ असे म्हणत दीर्घ सुस्कारा न सोडताही मी तिकडे चक्क काणाडोळा करू शकतो. होय तेवढी परिपक्वता तरी  कमावली आहे मी एव्हाना ! 

या वरून एक गहन सिध्दान्त मांडायचे धारिष्ट्य करीन म्हणतो. असे पहा, क्षणोक्षणी वर्तमान काळ भुतकाळांत परिणत होतो आहे आणि या क्षणी अनुभवलेले पुढच्याच क्षणीं ते शिळे होते आहे. मात्र भविष्याचे तसे नाही. पुढचा क्षण अनुभवूंच याची शाश्वती नाही म्हणून येणारा प्रत्येक क्षण  नित्यनूतनच असणार, त्याला शिळेपण माहीतच नाही. म्हणूनच उषा म्हणाली तसे गतक्षणींच्या आठवणी किंवा अनुभवच बोलता येतात, सांगतां येतात. भविष्यकाळाचे केवळ स्वप्नरंजन होऊ शकते, त्यांत वास्तवाची वानवा अधिक. 
(यांत नवीन ते काय असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे, मात्र माझेसाठी हा विचार फार मोलाचा आहे, क्रांतिकारक आहे. एऱ्हवीं मी भविष्याची चिंता करत नाही पण भूतकाळ मला विसरता येत नाही. ‘वर्तमानात जगा’ हा उपदेश प्रयत्नसाध्य असला तरी मला जमलेला नाही. खरंतर मी फारसा प्रयत्नच केलेला नाही कारण मी अजूनही भूतकाळात अधिक रमतो. माझ्या ॲचीव्हमेंट्स वर आनंद मानीत नि फॉलीज वर स्वत:शी हंसत - कारण आता दोन्हीही भूतकाळात गडप झाल्यात, केवळ स्मृती मागे ठेवून ! ! ) 

रहाळकर
२७ सप्टेंबर २०२१

Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?