Sunday, September 26, 2021

 

अवधान, व्यवधान वगैरे…….!

 

‘अवधान एकलें दीजे । मग सर्व सुखांसी पात्र होईजे । हें प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका ॥’असे माऊली आश्वासन देतात. 
ही ओंवी गुणगुणत असताना अवधान, व्यवधान, अनुसंधान, अनुष्ठान वगैरे कित्येक शब्द मनांत रूंजी घालू लागले आणि प्रत्येक शब्दाचा मागोवा घ्यावासा वाटला. तुम्हालाही या धांडोळ्यात सहभागी करून घ्यावे असे मनापासून वाटले म्हणून तुम्हाला तसदी देतो आहे, जमल्यास अवश्य सामील व्हावे ही प्रार्थना , इति प्रस्तावना ! 

वास्तविक यांतले कोणतेच शब्द समानार्थी नाहीत ही जाणीव असली तरी त्यात एखादे समान सूत्र असलेच पाहिजे असे मला वाटते. असे पहा, अवधान असले तरी त्यांत व्यवधान हे कधी ना कधी येणारच  आणि ते व्यवधान दूर करण्यासाठी काही तरी मार्ग म्हणजे  अनुसंधान घडणे क्रमप्राप्त ठरते.  अनुष्ठान घडण्यास वरील तीन किंवा इतर किती तरी घटक एकवटून येणे अपरिहार्य असावेत (असे मला जाणवते आहे. पहा, हा केवळ शब्दभ्रम उभारतोय असे वाटत असेल तरी हरकत नाही, यू मे क्विट ! पण माझी खात्री आहे की मी पाजळत असलेले दिवे तुम्हाला दुरून का होईना, पाहावेसे वाटतील - असा माझा (फाजील) आत्मविश्वास आहे ! ) 

तर मला असं म्हणायचंय की सर्वप्रथम ‘अवधान’ म्हणजे काय. डिक्शनरी अर्थ आहे लक्ष देणे. माऊली वारंवार विनवितात, ‘अवधारिजो जी’. मात्र हे लक्ष देणे वरवरचे नसून एकाग्र होणे होय. ‘व्यवधान’ म्हणजे अडथळा आणणे, ब्रेक लावणे, थांबविणे किंवा रोखणे अथवा एक इंटरव्हल, ए गॅप ! अनुसंधान म्हणजे शोध लावणे, विशेषत: अनोळखी, अज्ञात वस्तूचा, तर अनुसरण म्हणजे मागोमाग जाणे , मागोवा घेणे किंवा ईव्हन प्रारंभ करणे ! अनुष्ठान म्हणजे व्रत घेऊन ते तडीस नेणे ! अजून एक शब्द आठवला - ‘अनवधान’ , म्हणजे न कळत -  इनॲडव्हर्टंट !

आतां मला सांगा, हे सगळे शब्द निरनिराळे अर्थ दाखवीत असले तरी त्यांत कांहीतरी समान धागा दिसतोय ना ? 
अवधानांत व्यत्यय आला की होते व्यवधान आणि तो दूर सारण्यासाठी जे अनुष्ठान करायचे ते साधत असते अनुसंधानाने ! याच अनुषंगाने , जरासे अनवधान झाले की पुन्हा ये रे माझ्या मागल्या ! 

खूप खूप घोळ होतोय् ना ? खरंतर ‘अवधान एकलें’ वर अनेक शब्दांचा भडीमार करून मी माझे (खरे) पितळ उघडे केले आहे. (मुळांत केवळ पितळ असलेल्या मला सुवर्ण असल्याचा माज होता, तो आज या निमित्ताने काहीसा दूर होईल अशी आशा करतो ! ) 

तथापि, शर्यत अजून संपलेली नाही. मी पुन्हा येईन काहीतरी चमचमीत घेऊन, वाट पहा अनवरत ! !

रहाळकर
२६ सप्टेंबर २०२१ 



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?