Sunday, August 29, 2021

 

ग्रंथ नि ग्रंथी !

 ग्रंथ नि ग्रंथी ! -एक मुक्त, नव्हे स्वैर चिंतन ! ! 


ग्रंथ या शब्दाची उपपत्ती अचानक स्वस्थ बसूं देईना. ग्रंथ हे केवळ भली मोठी आणि अवजड पुस्तके नसून खरे तर दोन व्यक्तींमधील संवाद होय, मग तो गुरू-शिष्य स्वरूपात असो किंवा निखळ लेखक-वाचक स्वरूपांत. सहसा अनेक ग्रंथ अतिशय पूजनीय असतात, आपल्या सृजनातून एक वेगळे जग, प्रतिसृष्टी निर्माण करण्याची क्षमता असलेले. कित्येकांना गुरूसदृष योग्यता मिळते आणि त्यांना अक्षरश: डोईवर घेऊन मिरवले जाते. कित्येक ग्रंथ तर चक्क देवघरांत सापडतात


ग्रंथ निर्माण करणारा ग्रंथकार म्हटला जात असला तरी खरी ग्रंथनिर्मिती केवळ योगायोगाने घडते असे माझे प्रांजळ मत आहे. या जगात प्रत्येकालाच काही ना काही सांगत राहण्याची उपजत ऊर्मी असते, मग ती वकृत्वातून असेल, काव्यस्फूर्तीतून, शिल्प नि चित्रकलेतून किंवा ग्रंथनिर्मितीतून. काहींना ते ऐकण्या-वाचण्याची इच्छा होते तर काही तिकडे चक्क काणाडोळा करतील, कारण एखादाग्रंथकारतेवढ्या तोलामोलाचा किंवा ताकदीचा असेलच असे नाही


ग्रंथ आणि ग्रंथकारां बरोबरचग्रंथीनावाची एक कुळी असते. या शब्दाचे अनेक अर्थ प्रसंगोपात्त सांगता येतील. ग्रंथी म्हणजे ग्रंथांची पारायणे करणारा ; ग्रंथी म्हणजे ग्रंथाची देखभाल करणारा, संरक्षण करणारा ; ग्रंथी म्हणजे गाठ - गाठ सोडवणारा किंवा उकलणारा ! (म्हणजे ज्ञानदेव ग्रंथकार नि ग्रंथीही ! ! ) 

गुरूग्रंथ साहेबांच्या सेवेत असलेले ग्रंथी नि पसायदानांत वर्णिलेले ग्रंथोपजीविये म्हणजे ज्यांचा निर्वाह ग्रंथांवर होत असतो ते

जरा भरकटतेंय गाडी नेहमीसारखी, पण जसजसे शब्द कोलाहल करतात तसतसे ते भरभर उतरून काढले जातात. सबब या उतावीळपणा बद्दल  क्षमस्व

मला म्हणायचंय् ग्रंथ आणि ग्रंथींबद्दल. ग्रंथांची योग्यता काय हे माऊली बहारदारपणे सांगतात. (पहा पहिल्याच अध्यायातील महाभारत ग्रंथाविषयींचे निरूपण ! ) मुळात ग्रंथ कसा असावा ? माझ्या मतें असा की जो एकदा हातांत आला तर सहसा खाली ठेवावासा वाटूं नये असा ; ग्रिप्पिंग, जखडून ठेवणारा, मनमुराद आनंद नि समाधान देणारा. ग्रंथांत विलक्षण शक्ती असते माणसांत आमुलाग्र बदल घडवून आणण्याची, जीवनांत अग्रेसर राहण्यासाठी खूप मोलाचे असतात सदग्रंथ. कित्येकांजवळ अमाप ग्रंथसंपदा असते (मात्र बरेच वेळा ती आलमारीचे वैभव एवढ्या पुरती मर्यादित राहते - असा माझा स्वानुभव आहे - कारण सर्वच ग्रंथ वाचून पालथे घालण्यासाठी नसून अडीअडचणीचे वेळी संदर्भग्रंथ म्हणून उपयुक्त ठरतात) . काही ग्रंथ पुन:पुन्हा हाती घेतले जातात ; कित्येकांचा अक्षरश: कीस काढला जातो तर कित्येकांवर पिढ्यानपिढ्या चर्चा रंगत राहतात - निरूपणे, व्याख्याने, कीर्तनें वगैरे स्वरूपांत


मी मघा म्हटले की ग्रंथनिर्मिती योगायोगाने घडत असते. ‘मी आता एक ग्रंथ लिहायचे ठरवले आहेअसे म्हणत कुणी ठाण मांडून बसला तरी अनेक योग जुळून यावे लागतात. मुळांत काहीतरी आराखडा असावा लागतो मनांत, एक ब्ल्यूप्रिंट, एखादा सिध्दांत, एक विचार जो फुलवून सांगण्याची विविक्षित पध्दत किंवा धाटणी आंखून घ्यावी लागते. बरें, तर्कसंगतपण, एक विशिष्ट लय, झुळझुळ वाहणारे कथानक असे सर्व योग जुळून यावे लागतात. येरा गबाळाचे काम नव्हे ते


माझ्या माहितीत असे डझनावारी लेखक आहेत किंवा होऊन गेलेत ज्यांनी खंडीभर ग्रंथ रचलेत, मात्र देश-काल-परिस्थितींत टिकून राहिलेले खूपच विरळा. जवळजवळ प्रत्येकाला आपलेआत्मचरित्रलिहिण्याची ऊर्मी येत असते अधूनमधून ; काही लिहितात, काही पुढील जन्मीं असे म्हणत तो विचार झटकून टाकतात. मला सांगा, प्रत्येकालाच आपण आयुष्य किती सार्थकपणं जगलों हे सांगण्याचा खटाटोप कां करावासा वाटतो ? वास्तविक प्रत्येकाचे जग वेगळे असते इतर सर्वांहून. मग ते वेगळेपण सांगायचा तरी अट्टाहास काय म्हणून


गाडी खूपच डी-रेल होते आहे, तरी पण और सुनो


मला जर कुणी विचारलंच, सहसा कुणीच ते धार्ष्ट्य करीत नाही माझेशी - की तुझा आवडता ग्रंथ कुठला किंवा कुठले, तर मी त्याला खुळचट म्हणेन -हा काय प्रश्न आहे असे म्हणतअर्थातच मी म्हणेनइत्यादि इत्यादिवगैरे ! मग जर मी हाच प्रश्न तुम्हाला टाकला तर बावचळून जाऊं नका कारण तुम्हालाही ते सहज सांगतां येणारच नाही, ‘कांअसा माझा पुढील प्रश्न असणारच हे तुम्हाला ठाऊक आहे म्हणून


खूप झाले हे स्वैरचिंतन’ ! (जस्ट टाईमपास’ ! ) 


रहाळकर

२७ ऑगस्ट २०२१ 


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?