Friday, February 19, 2021

 

ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे सोळा ११६

 ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे सोळा 


श्री ज्ञानेश्वर महाराजपुरूषोत्तम योगाचा समारोप करताना म्हणाले की

 

श्रीहरीवक्त्रींची अक्षरें संजयो सांगितली आदरें तिहींअंधुतोही अवसरें सुखिया जाला ’ (श्रीहरीचे मुखातून आलेले शब्द संजय आदरपूर्वक अंध धृतराष्ट्राला सांगता झाला, जेणे करून अंतसमयीं तो अंध देखील सुखी झाला


तेंचि मऱ्हाटेनि विन्यासें मियां उन्मेषें ठसेंठोंबसें ती जाणें नेणें तैसें निरोपिलें (तेच श्रीकृष्ण वचनामृत मी मराठी भाषेंत ओबडधोबड रीतीने विस्तारपूर्वक आणि माझ्या बुध्दी नि कुवतीनुसार सांगितले आहे


सेवंतीये अरसिकांही आंग पाहतां विशेषु नाही परी सौरभ्य नेलें तिहीं भ्रमरीं जाणिजे (अरसिक माणसाला शेवंतीकडे ती कांटेरी असल्याने पाहाणे फारसे रुचत नाही, मात्र तिच्या फुलांचा दरवळणारा सुगंध भ्रमरालाच कळतो ! ) 


तैसें घडतें प्रमेय घेइजे उणें ते मज देइजे जे नेणणे हेचि सहजें रूप कीं बाळा (त्या प्रमाणे (या गीताग्रंथातील) जे सिध्दान्त स्वीकारार्ह वाटतील ते घ्यावे आणि न्यून वाटतील ते मला परत करावे ; कारण सर्वकाही समजणे हेच बालकाचे सहज स्वरूप आहे ! ) 


परी नेणतें जऱ्ही होये तऱ्ही देखोनि बाप की माये हर्ष केही समाये चोज करिती (तथापि ते बालक अज्ञानी असले तरी आई-बापांनी त्याला पाहतांच त्यांचा आनंद ओसंडून वाहतो आणि ते त्याचे कोडकौतुक करतात ! ) 


तैसें संत माहेर माझें तुम्ही मिनलिया मी लाडैजे तेंचि ग्रंथाचेनि व्याजें जाणिजो जी (तसे तुम्ही संत श्रोते माझे माहेर आहांत महाराज, आणि तुम्ही भेटलांत म्हणून या ग्रंथाच्या निमित्ताने मी तुमचेशी लडिवाळपणा केला हे कृपया लक्षात घ्यावे ! ) 


आतां विश्वात्मकु हा माझा स्वामी निवृत्तिराजा तो अवधारू वाक् पूजा ज्ञानदेवो म्हणे (आता विश्वरूप असलेले माझे सदगुरू निवृत्तिराय माझी वाणीरूप पूजा स्वीकारोत एवढीच या ज्ञानदेवाची प्रार्थना आहे ! ) 


किती किती सुंदर समारोप मागील अध्यायाचा ! तीच उन्मेषवाणी सोळाव्यादैवासुरसंपद् विभागयोगातील प्रास्ताविकांत अधिकच बहरलेली लक्षात येईल


श्री ज्ञानदेव आपली गुरूवंदना अतिशय रोमहर्षक शब्दांत आणि विलक्षण उपमा अलंकारांसह  मुखरित करतात, ‘कवीं कवीनांही उक्ती सार्थ करीत ! - (बहुतेक सर्व शब्द आता प्रचलित नाहीत म्हणून शब्दार्थ आवश्यक ठरतात. सांभाळून घ्यावे ही विनंती ! ) 


माळववीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी-विकाशु वंदूं आतां (ज्ञानदेवांनी येथे सदगुरूंवर ज्ञानसूर्याचे रूपक रचले आहे - विश्वाचा आभास नष्ट करणारा , अद्वैतरूपी कमलिनीचा विकास करणारा सूर्य मोठ्या दिमाखात उदय पावला आहे, त्याला मी वंदन करतो. ) 


जो अविद्यारातीं रूसोनियां गिळी ज्ञानाज्ञानचांदणियां जो सुदिनु करी ज्ञानियां स्वबोधाचा (जो ज्ञानरूप सूर्य अज्ञानरूपी रात्रीवररूसतोम्हणजे त्याला नष्ट करतो, तसेच जगांतील अज्ञान आणि ज्ञानरूपी देखील चांदण्यांना गिळून टाकतो ; जो ज्ञानीजनांना आत्मबोधाची चैतन्यरूप पहांट करून देतो ! ) 


जेणें विवळतिये (उगवल्यामुळे) सवळे (पक्षी) लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे सांडिती देहाहंतेची अविसाळें (घरटीं) जीवपक्षी (ज्ञानसूर्याच्या उदयामुळे जीवांचे आत्मज्ञानरूपी नेत्र उघडतात आणिमी देह आहेअशा अहंकाररूपी घरट्यांतून ते जीवपक्षी बाहेर पडतात ! ! )


लिंगदेह कमळाचा पोटीं वेंचु तया चिद्भ्रमराचा बंदिमोक्षु जयाचा उदैला होय (लिंगदेह रूपी कमळांत जो जीवरूपी भ्रमर अडकून पडला होता तो गुरूकृपेची पहांट होतांच सहज मोकळा होतो


शब्दाचिया आसकडीं (अडचणींत) भेदनदीच्या दोहीं थडीं आरडातें (ओरडते) विरहवेडीं बुध्दिबोधु  


(शब्दांच्या जंजाळात अडकलेले भेद-अभेद किंवा द्वैत अद्वैत, अथवा बुध्दी आणि बोधनदीच्या दोन्ही काठांवरून दोन पक्षी (चक्रवाक् जोडी) एकमेकांना विरहव्याकुळ होत साद घालतात.


(अवघड आहे हे समजायला, पण येथे चक्रवाक् पक्षाच्या जोडीचा संदर्भ आहे. कवि-कल्पनेनुसार या पक्षाचे नर-मादी दिवसां एकत्र असले तरी रात्रीं वेगवेगळे असतात आणि रात्रभर एकमेकांना साद घालत राहतात. श्री ज्ञानेश्वर महाराज या नर-मादीच्या जोडीलाद्वैत-अद्वैत’, ‘भेद-अभेदकिंवा बुध्दी नि बोध (आत्मज्ञान) असे संबोधतात.) 


तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चिद् गगन भुवनदिवा (त्या दोन पक्षांना मैथुनातून मिळणारे समाघान किंवा आनंद जो सूर्योदय मिळवून देतो (बुध्दी नि आत्मबोधाचे ऐक्य घडवून आणतो) तोच श्रीगुरूसूर्य चैतन्यरूपी आकाशांत लावलेला जणू दीप होय ! ) 


लई लई भारी होतंय् ! असो


जेणे पाहलिये पाहांटे भेदाची चोर-वेळ फिटे रिघती आत्मानुभव वाटे पांथिक योगी   (ज्या सूर्याचा पहांटे उदय होतांच अंधाराची चोर वेळ संपते आणि आत्मानुभव  मिळवण्यासाठी जीवरूपी पाथस्थ योगी मार्गक्रमण करू लागतात ). (वास्तविक आत्मज्ञान प्राप्त होतांच द्वैत नाहीसे झाल्याने  मुमुक्षु आत्मानंदांत रमून जातात ! ) 


श्री ज्ञानदेव सदगुरूंचे स्तवन करत असतांना इतक्या भावोत्कट स्थितींत असतात की त्याचे वर्णन शब्दांत करणे अशक्यप्राय व्हावे ! थोड्या विश्रांतीनंतर त्यांनीच सांगितलेले निरूपण पुढे लिहीन म्हणतो


क्रमश:.....



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?