Friday, November 27, 2020

 

ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे दहा ११०

 ज्ञानेश्वरी सौंदर्य भाग एकशे दहा ११० 


शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वर:     

गृहीत्वैतानि संयाति वायुर्गन्धानिवाशयात्    ॥१५/८॥” 


(ज्या प्रमाणे वारा फुलांतील सुगंध वाहून नेतो तसे शरीर सोडतांना जीवात्मा आपल्या बरोबर वासना, मन आणि पाचही इंद्रियांचे विषय म्हणजे शब्द स्पर्ष रूप रस गंधादि तन्मात्रा लिंगदेह स्वरूपात घेऊन जातो


जीव जेव्हा एखाद्या शरीरांत प्रवेश करतो तेव्हाच त्याला कर्ता किंवा भोक्ता असे म्हटले जाते. असे पहा, कोणी व्यक्ती आपल्या सर्व परिवारासह एका मोठ्या राजवाड्यात राहायला जाते तेव्हा ती श्रीमंत किंवा विलासी मानली जाते. अगदी तसेच धनंजया, स्थूल देहात प्रवेश करताच विषयभोगांचा धुमाकूळ आणि कतृत्वाचा अहंकार वाढू लागतो. आणि जुना देह सोडून दुसऱ्या देहात शिरतांना तो जीव सर्व वासना आपल्या बरोबर घेऊन जातो

जसा अपमान झालेला अतीथि आपल्या बरोबर यजमानाने मिळवलेले सुकृत किंवा पुण्य घेऊन जातो. अथवा कळसुत्री बाहुल्यांचा खेळ सुरू असतांना अचानक दोरी तुटावी, अथवा सूर्यास्त होतांच अंधारात दिसेनासे होते, किंवा वाऱ्याच्या झोताबरोबर फुलांचा सुगंध घेऊन जातो -तसेदेहराजजीवात्मा जेव्हा शरीर सोडून बाहेर पडतो तेव्हा मनासकट सहाही इंद्रियें बरोबर घेऊन जातो


श्रोत्रं चक्षु: स्पर्षनं रसनं घ्राणमेव    

अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते     ॥१५/९॥


(हा जीवात्मा कान, डोळे, त्वचा, जीभ, नाक आणि मनाच्या साहाय्यानेच विषयांचा उपभोग घेतो


मग येथ अथवा स्वर्गीं जेथ जे देह आपंगीं (अंगिकारतो) तेथ तैसेचि पुढती पांगीं (विस्तारतो) मनादिक  

जैसा मालवलिया दिवा प्रभेसि जाय पांडवा मग उजळिजे तेथ तेधवां तैसाचि फांके  

(या मृत्युलोकात किंवा स्वर्गात हा आत्मा जेव्हा देह धारण करतो तेव्हा मनासह सर्व इंद्रियें पुन्हा कार्यरत होतात. असे पहा, दिवा मालवल्यावर त्याचा उजेड नाहीसा होतो नि पुन्हा प्रज्वलित करतांच प्रकाशमान होतो.) 


अविवेकी, मूढ लोकांच्या दृष्टीने जन्म-मृत्यूची राहाटी   किंवा सुखोपभोग आत्मा सोसतो असे त्यांना वाटते. खरेतर येणेजाणे किंवा सुखोपभोग घेणे हे प्रकृती, मायेमुळे देह भोगतो ज्याचा आत्म्याशी तिळमात्र संबंध नसतो


उत्क्रामन्तं स्थितं वापि भुन्जानं वा गुणान्वितम्  

विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुष:    ॥१०॥” 

यतन्तो योगिनश्चैनं पश्यंत्यात्मन्यवस्थितम्

यतन्तोsप्यकृतात्मानो नैनं पश्यंत्यचेतस:    ॥११॥


(देह सोडताना किंवा देहात असताना, गुणांनुरूप भोग भोगताना अज्ञानी लोकांना जीवात्मा कळत नाही, पण ज्ञानदृष्टी असलेले त्याला जाणतात. )


असे पहा, नुकतेच जन्मलेले बाळ जेव्हा हालचाल करू लागते तेव्हा एक जीवआलाअसे मानले जाते. आणि इंद्रियांद्वारे जेव्हा तो जीव विविध भोग भोगतो तेव्हा त्याचा आत्मा ते भोग भोगतो असे वाटते

मग तेच भोग जेव्हा क्षीण होऊ लागतात आणि इंद्रियें शांत होतात तेव्हा तोगेला गेलाअशी बोंबाबोंब होते

अरे, झाडें जेव्हा हलताना दिसतात तेव्हा वाऱ्यामुळे तसे दिसते असे म्हणतात. पण जर तिथे वृक्षच नसेल तर वाराही नाही असे म्हणतां येईल का ? किंवा आरश्यांत आपले प्रतिबिंब पाहून आपणआहोतअसे वाटले तर आरसा  पालथा केल्यावर आपण नसतो काय

वास्तविकशब्दहा आकाशाचा गुणधर्म आहे, पण ढगांचा गडगडाट ढगांमुळे आरोपिला जातो ना ? किंवा, मेघांच्या पळण्यामुळे चंद्र धावतोय असे वाटते की नाही


तेसें होईजे जाइजे देहें ते आत्मसत्ते अविक्रिये निष्टंकिती गा मोहें आंधळे ते (त्याप्रमाणे शरीराचे येणे जाणे हे वास्तविक अक्रिय असलेल्या आत्म्यामुळे घडते असे ज्यांना वाटते, ते अज्ञानी आंधळे होत !) 

येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं देखिजे देहींचा धर्मु देहीं ऐसे देखणें ते पाहीं आन आहाती (वेगळेच असतात)  


ज्या प्रमाणे उन्हाळ्यातल्या प्रखर सूर्यकिरणांना ढग अडवू शकत नाहीत, तसे ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यावर शरीराचे बाह्य आकार कोलमडून पडतात आणि सद्सद्विवेक बुध्दीचे साहाय्याने तो ज्ञानी केवळ आत्मतत्व अनुभवतो. अरे, आकाशातील तारांगण जरी सागरात पडलेले दिसत असले तरी ते काही तिथे तुटून पडले नसते  हे स्पष्टपणे कळतेच ना

असे पहा, जरी आकाश सागरांत प्रतिबिंब म्हणून भासत  असले तरी ते आपल्या ठिकाणी स्थिर असते. अगदी तसेचशरीरात चैतन्य सळसळताना दिसत असले तरी आत्मा शरीराहून वेगळा आहे हे ज्ञानी पुरूष जाणतात. खळाळणाऱ्या पाण्यांत चांदणेही खळाळत असल्याचे दिसते, पण वास्तविक ते आकाशात चंद्राबरोबरच मश्गूल असते ! किंवा, डबक्यांत दिसत असलेले सूर्यबिंब डबके वाळून जाताच दिसेनासे होते, तसे देह जावो अथवा राहो, ज्ञानी पुरूष केवळ आत्मरूपाने मला पाहतात


घटु मठु घडले तेचि पाठीं मोडले परि आकाश तें संचलें असतचि असे (घागर किंवा घर तयार केले आणि ते तोडून टाकले तरी त्यांतले आकाश जसे आहे तसेच राहते !) 

तैसे अखंडें आत्मसत्ते अज्ञानदृष्टी कल्पितें हे देहचि होते जाते जाणती फुडें (यथार्थपणे)  

चैतन्य चढे ना वोहटे चेष्टवी ना चेष्टे ऐसे आत्मज्ञानें चोखटें जाणती ते  


क्रमश



Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?