Thursday, August 06, 2020

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग शंभर

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग शंभर 


कर्मण: सुकृतस्य आहुसात्विकं निर्मलं फलम्  

रजसस्तु फलं दु:खम् अज्ञानं तमस: फलम्     १४/१६॥

(सात्विक कर्माचे सत्वप्रधान फल मिळते, राजस कर्माचे दु: आणि तामसिक कर्माचे फल अज्ञान असे जाणकार सांगतात


म्हणून सत्वगुणां पासून जे मिळते ते सुकृत (पुण्य) असे श्रुती सांगतात. त्या निर्मळ सत्वगुणांमुळे सुख आणि ज्ञान असे अपूर्व फल सहज प्राप्त होते. या उलट राजसिक क्रिया घडल्यास त्यांना कडुलिंबाच्या निंबोळ्यां प्रमाणे कडू फळें मिळतात. आणि विषारी अंकुराला जसे विषारी फल येते तसे तामस वृत्तीतून केवळ अज्ञान निफजते


सत्वात् संजायते ज्ञानं रजसो लोभ एव  

प्रमादमोहौ तमसो भजतो अज्ञान एव   १७॥” 

(सत्वगुणा पासून ज्ञान निफजते, रजोगुणातून लोभ नि तमोगुणातून प्रमाद आणि मोह निर्माण होतात


म्हणौनि बा रे अर्जुना येथ सत्वचि हेतु ज्ञाना जैसा कां दिनमाना (दिवसाला) सूर्य हा पैं  

आणि तैसेचि हे जाण लोभासि रज कारण आपले विस्मरण द्वैता जेवीं  

मोह-अज्ञान-प्रमादा ययां मैळेया दोषवृंदा पुढती पुढती प्रबुध्दा तमचि मूळ (मोह, अज्ञान नि प्रमाद या तीनही दोषांचा मेळावा मूळ तमोगुणाचेच द्योतक होय हे तुला पुन्हा पुन्हा निक्षून सांगतो, हे प्रबुध्द अर्जुना


अशा प्रकारे तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे तिन्ही गुणांचे स्वरूप तुला वेगवेगळे करून सांगितले. वास्तविक रज नि तम यांचा नि:पात करण्यासाठी सत्वगुणच प्रभावी आहे आणि तोच जीवाला ज्ञानाकडे नेतो. म्हणून आयुष्यभर सत्वगुणाचे जणू व्रत घेऊन कित्येक जण सर्वसंग परित्याग केलेल्या संन्याशा प्रमाणे आचरण करतात.


ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसा:  

जघन्यगुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा:     १८॥ 

(आयुष्यभर सत्वगुण जोपासणारे लोक स्वर्गलोकात  जातात, रजोगुणांत स्थिरावलेले मृत्युलोकांत परत येतात आणि तमोगुणांत रमलेले अतिशय घृणास्पद अशा नरकास प्राप्त होतात


तैसें सत्वाचेनि नटनाचें (उत्कर्षाने) असणे जाणें जयांचे ते तनुत्यागीं स्वर्गींचे राय होती  

इयाचि परि रजें जिहीं कां जीजे मरिजे (जगतात-मरतात) तिहीं मनुष्य होईजे मृत्युलोकीं  

तेथ सुखदु:खाचे खिचटें (खिचडी) जेविजे एकेंचि ताटें (ताटांत) जेथ इये मरणवाटे पडिले नुठी (उठत नाहीत)  

आणि तयाचि स्थिति तमीं जे वाढोनि निघती भोगक्षमीं (भोगासक्त जीव) ते घेती नरकभूमीं मूळपत्र (सनद) !  


अशा प्रकारें आत्म्यावर त्रिगुण कसे भारी पडतात ते तुला कारणांसह सांगितलेआणि या त्रिगुणांचे उत्तम, मध्यम नि कनिष्ठ असे जे भेद सांगितले, तेही खरेंतर वरवरचे दिखाऊ होत कारण आत्मवस्तु किंवा आत्मा मुळातच शुध्द असल्याने या तिन्ही गुणांपासून अलिप्त असतो. आकाशांतील चंद्रबिंब जसे पाण्यांत दिसत असूनही अलिप्त असते तसे हे त्रिगुण देहांतील आत्म्याला मलीन करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे जन्म, जरा, मरण वगैरे ज्या सहा स्थिती असतात त्या देहापुरत्याच मर्यादित राहतात


आतागुणातीताचेवर्णन करतात

मडके फुटून त्याच्या खापऱ्या झाल्या की मडक्यांतले आकाश महाकाश होते

तैसी देहबुध्दी जाये जैं (जेव्हा) आपणपां आठौ (जाणीव) होये तैं आन (निराळे) कांही आहे तेवांचुनी (आत्मस्वरूपा वांचून) ?  

येणें थोर बोधलेपणे (बोध होताच) तयासी गा देहांत असणे म्हणौनि तो मी म्हणे गुणातीत  


भगवंतांनी असे सांगताच पार्थ खरोखर सुखावला, जसा दाटून आलेले मेघ पाहून मोर आनंदाने थुईथुई नाचू लागतो


अर्जुनाची उत्कंठा वाढून त्याने भगवंताला प्रश्न केला की हे प्रभो अशा प्रकारेगुणातीतझालेल्या पुरूषाची लक्षणें कोणती नि त्याचे आचरण कसे असते तेही मला सविस्तर सांगावे


तेणें तोषें वीर पुसे जी कोण्ही चिन्हीं तो दिसे जयामाजीं वसे ऐसा बोधु  

तो निर्गुण काय आचरे कैसेनि गुण निस्तरे (निवारण करतो) हे सांगावे माहेरें कृपेचेनि (कृपेचे माहेरघर असलेल्या)  


श्री भगवान उवाच

प्रकाशं प्रवृत्तिं मोहमेव पाण्डव  

द्वेष्टि संप्रवृत्तानि निवृत्तानि कांक्षति   २२॥

(अर्जुना, सत्वगुणाचे द्योतक प्रकाश, रजोगुणीचा प्रवृत्ति, तर तमोगुणांत मोह द्योतक असतो. आणि ते मिळाले तर त्याचा विषाद नसतो नि मिळाले तर त्याची इच्छाही धरीत नाही


असे पहा, सकाळ दुपार वा संध्याकाळ यांतील भेद सूर्य जाणत नाही ; किंवा पावसाच्या पाण्याने काही समुद्र भरत नसतो, अथवा हिमालय बर्फाच्या गारव्यामुळे थरथरेल काय ? प्रखर उन्हाळ्यांत वणवा भस्मसात होईल काय

अगदी तसेच गुणांमुळे तो पुरूष विचलित होत नाही, गुणांपासून तो अलिप्त उदासीन असतो. मला सांग, मृगजळाच्या लाटांनी मेरूपर्वत ढासळेल , किंवा वाऱ्याने आकाश हेलावेल का ? अंधाराने सूर्याला गिळता येईल काय ? जागृत माणसाला स्वप्न जसे फसवू शकत नाही, तसा तो पुरूष (गुणातीत) गुणांनी बांधला जात नाही

अर्जुना, तो गुणातीत गुणांच्या तडाख्यांत तर सापडत नाहीच पण कळसूत्रीचे बाहुल्यांचा खेळ पाहावा तसे तो या सर्व गुणांचे चाळे एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे तटस्थपणे पाहत असतो

असे पहा, समुद्र उचंबळून येतो, चंद्रकांत मणि द्रवतो, चंद्रविकासी कमलिनी उमलतात, पण हे सगळे ज्यामुळे घडते तो चंद्र मात्रउगाअसतो

कां वाराचि वाजे विझे गगनें निश्चळ असिजे तैसा गुणाचिये गजबजे डोलेना जो  

अर्जुना येणे लक्षणें तो गुणातीतु जाणणें परिस आता आचरणे तयाची जी  


क्रमश:..... 


Comments:
you have wrote vajate bit its is vawate please correct that statement it will give huge worng defination towards reader:
-Shree krishna bhakt
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?