Sunday, September 29, 2019

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग पंचाहत्तर

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळें भाग पंचाहत्तर 

अनपेक्ष: शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथ:     
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्त: मे प्रिय१२/१६॥” 
( नि:स्पृह, अंतर्बाह्य पवित्र, दक्ष, उदासीन, निर्भय आणि फलाकांक्षा धरतां कर्म करणारा माझा भक्त मला अत्यंत प्रिय असतो). 

जयाचिया ठायीं पांडवा अपेक्षे नाही रिगावा (शिरणे) सुखासि चढावा (भर) जयाचे असणे  

असे पहा, काशीला गेल्यास मोक्षप्राप्ती होते हे खरे असले तरी तिथे देहत्याग घडतो. बरें, हिमालयाच्या यात्रेने पापक्षालन होत असले तरी तिथे मरणाचा धोका फार असतो. या उलट, सज्जनाचें पावित्र्य असे संकटग्रस्त नसते
गंगामाईचे पावित्र्य वादातीत आहे आणि तिथे पाप-ताप-क्षालन देखील होते, मात्र बुडण्याची भीती असतेच ना ! सज्जनरूपी तीर्थाच्या खोलीला थांग नसतो, पण भक्तांना तिथे बुडण्याची धास्ती नसते ! बुडतांही जीवंतपणींच मोक्ष ठरलेला
ज्या संतांच्या समागमाने गंगा देखील पवित्र होते, त्या संतांच्या पावित्र्या बद्दल काय सांगावेस

म्हणोनि जो ऐसा शुचित्वें तीर्था कुवासा (आश्रय) जेणें उलंघविलें दिशा मनोमळ (म्हणून ज्याचे पावित्र्याचा तीर्थांनीही आश्रय घ्यावा असा भक्त मनांतील सर्व किल्मिषें देशोधडीला लावतो). 

आंतु बाहेरी चोखाळू (शुध्द) सूर्य जैसा निर्मळु आणि तत्वार्थींचा पायाळु देखणा जो (पाहणारा) (सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य शुध्द आणि पायाळू माणसाप्रमाणे भूमीगत म्हणजेच गहन सिध्दांत सहज आकलन करू शकणारा (जो भक्त) - ) 

व्यापक आणि उदास (indifferent) जैसें कां आकाश तैसें जयाचें मानस सर्वत्र गा  
संसारव्यथें फिटला (मुक्त झाला) जो नैराश्यें (निरीच्छपणें) विनटला (शोभला) व्याधाहातोनि सुटला विहंगु जैसा (पक्षी)
तैसा सतत जो सुखें कोणतीही टवंच (टोचणी) देखे नेणिजे गतायुषें (मेलेला) लज्जा जेवीं !  
आणि कर्मारंभालागीं जया अहंकृती (अहंकार) नाही आंगीं जैसे निरिंधन (सरपणाशिवाय) आगीं विझोनि जाय  

अर्जुना, अशा भक्तांच्या प्राक्तनांत मोक्षाशी निगडित परम संतोषच लिहिलेला असतो. अशा प्रकारे ज्याची वृत्ती सदैव सोहंभावांत म्हणजेच आत्मस्वरूपांत कायम स्थिरावल्यामुळे द्वैताची भाषाच संपते. तथापि भक्तिसुख उपभोगण्यासाठी आपणच तिला सेव्य आणि सेवक अशा दोन भागांत विभागून सेवकपण स्वीकारतो. एक भाग म्हणजे मी ईश्वर नि दुसरा भक्त, जो आपल्या भक्तीने अभक्तांसमोर भक्तीचा आदर्श ठेवतो
अशा योगसंपन्न भक्तांचा मला छंद जडतो, मला त्याचेच ध्यान करावेसे वाटते ; फार काय सांगू, असा भक्त भेटल्यावरच माझे समाधान होते
तयालागीं मज रूपा येणे तयाचेनि मज येथे असणे तया लोण कीजे जीवेंप्राणें ऐसा पढिये (अर्जुना, तो माझा इतका लाडका असतो की त्याचेसाठींच मी अवतार घेतो, त्याचेसाठींच इथे राहतो. त्याचेवरून पंचप्राण ओवाळून टाकावेत इतका तो मला प्रिय असतो


क्रमश

Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?