Sunday, February 25, 2018

 

ज्ञानेश्वरी मधील सौंदर्य स्थळें (भाग दुसरा)

ज्ञानेश्वरी मधील सौंदर्य-स्थळे (भाग दुसरा)
माझ्या एका ज्येष्ठ स्नेह्याला मी काही वर्षांपूर्वी म्हटले होते की ज्ञानेश्वरीतील निवडक सौंदर्यस्थळें वाचकांसमोर ठेवावीत. त्या स्नेह्याचा  व्यासंग दांडगा आहे. मात्र या विषयावर प्रस्थापितांनी शेकडोंनी पुस्तके लिहिली आहेत असे त्यांनी सांगितल्यावर जरासा खट्टू होत्साता तो विचार मी झटकून टाकला होता. पण परवांच अठरावा अध्याय पुन्हा वाचून संपवताना एक ओवी रूंजी घालत राहिली – “राजहंसाचें चालणें । भूतळीं  जालिया शहाणें । आणिकें काय कोणें । चालावें चि ना ? ॥१७१३॥”
राजहंसाचे दिसणे नि चालणे अतिशय सुंदर आणि डौलदार असते हे खरें; पण म्हणून इतरांनी चालूंच नये काय ?
आणि अचानक मुरारीबापूंची आवडती फ्रेज आठवली – “स्वान्त: सुखाय श्री रघुनाथ गाथा”. आपल्या स्वत:च्या आनंदासाठी ‘निकल पडो’, ज्यांना इच्छा होईल ते सहभागी होतीलच. नि हां हां म्हणता पहिला भाग लिहून पण झाला. खूप रसास्वाद घेतला त्या ओव्यांचा पुन्हा एकदा ! असो.
इति प्रास्ताविक.
गीतेच्या पहिल्या अध्यायाला अर्जुन-विषाद-योग म्हणतात. ज्ञानदेवांनी प्रथम मंगलाचरणाच्या ओव्या लिहिल्यानंतर केलेले प्रास्ताविकाचे बहारदार वर्णन आपण पहिल्या भागांत संक्षिप्त स्वरूपात पाहिले. पुढे गीतार्थ विशद करताना रणांगणावरच्या एकंदर परिस्थितीचे वर्णन ज्ञानदेवांनी अतिशय विस्ताराने नि काहीशा भयभीत करणाऱ्या शब्दात केले, मात्र त्याचबरोबर त्यांची विनोदाची तऱ्हा देखील जाणवते, विशेशत: कौरव सैनिकांच्या घाबरगुंडीबद्दल.
धृतराष्ट्राच्या अवाजवी पुत्र-स्नेहाबद्दल ते परखडपणे म्हणतात, ‘तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु ।’ . पुत्रप्रेमामुळे भ्रांतिष्ट झालेल्या  त्याला रणांगणावर काय चाललेय् याची उत्कंठा आहे. महाभारतातील हा धृतराष्ट्र अंतर्बाह्य आंधळा आहे. आपले शंभर पुत्र अविवेकाने आणि दुष्टपणे वागत आहेत हे त्याला माहीत होते. शिवाय गांधारीनेही आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली, म्हणजेच तिने सुध्दां मुलांच्या गैरवर्तणुकी कडे काणाडोळा केला होता. अशावेळी केवळ पुत्रप्रेम किंवा पतीप्रेमाची तरफदारी करता येत नाही. कारण प्रत्यक्ष सद्सद्विवेक बुध्दीचा पराभव येथे प्रकर्षांने जाणवतो. असो.
रणांगणावरील युध्दाच्या तयारीचे वर्णन ज्ञानदेव तपशीलवार देतात. मात्र तसे करताना ते उपमा-अलंकारांचा भरपूर वापर करतात. युध्दप्रवण तसेच शस्त्रप्रवीण योध्दयांचे कौतुक त्यांच्या विशेषणांवरून स्पष्टपणे दिसून येतेच, पण भीष्म-द्रोणांबद्दलचे त्यांचे गौरवोद्गार वाचताना आपणही कृतार्थ झाल्याची जाणीव सुखद असते.
गंगासुत भीष्माचार्यांच्या सामर्थ्याविषयी  लिहिताना ज्ञानदेव म्हणतात की जसा समुद्र तरून जाणे अवघड असते नि त्यांतही जर वडवानल पेटलेला असेल ; किंवा, महाप्रलयात भयंकर सोसाट्याचा वारा सुटावा तसे आहेत भीष्म पितामह ! त्यांना उपमा देतात प्रतापतेजस्वी भानुची म्हणजे सूर्याची. आणि कर्णाला म्हटले – ‘रिपुगजपंचाननू’ म्हणजे शत्रूरूपी हत्तीचा नाश करणारा सिंह. कृपाचार्य तर एकटेच पुरेसे आहेत केवळ आपल्या संकल्पाने विश्वसंहार करू शकणारे.
अर्जुनाच्या रथाचे वर्णन तर लाजबाब आहे. महातेजस्वी असा तो रथ जणू गरूडाच्या दिमाखात चपळाइने वावरत होता. चार पांढरे शुभ्र घोडे जुंपलेला हा रथ उडणाऱ्या मेरू पर्वताप्रमाणे संपूर्ण सैन्यदळांत शोभून दिसत होता. आणि अश्व-वाहकु म्हणजे सारथी आहे वैकुंठाचा राणा भगवान श्रीकृष्ण. अशा रथाचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. ध्वजस्तंभावर विराजमान आहेत मारूतीराय, जे प्रत्यक्ष भगवान श्री शंकर होत. सारथ्य करणाऱ्या प्रभूचे नवल पहा, भक्ताच्या अद्भुत प्रेमाखातर आपण स्वत: पुढे राहिला सर्व आक्रमणांना तोंड द्यायला नि आपल्या भक्ताला मागे बसविले त्याच्या सुखरूपतेसाठी !
युध्दाला सज्ज असलेल्या अर्जुनाच्या एकंदरच बदलत गेलेल्या मन:स्थितीचे बहारदार वर्णन पुढे येते. सर्व सैन्यांवर ओझरती नजर टाकल्यावर युध्दात कोणाकोणशी लढायचे आहे या उद्देशाने तो श्रीकृष्णाला जणू फर्मावतो की देवा, रथाला दोन्ही सैन्यांच्या बरोबर मधोमध नेऊन उभा कर म्हणजे मी क्षणभर कुणाशी लढायचंय् ते पाहीन. खरंतर हे कौरव अतिशय उतावळे, दुष्टबुध्दीचे आणि पराक्रम नसूनही लढण्याची खुमखुमी असलेले आहेत.
श्रीकृष्णाने रथ तिथे नेतांच त्याला समोर भीष्म, द्रोण नि इतर राजे दृष्टीस पडले. त्याने सगळ्या सैन्याकडे कुतुहलाने पाहिले नि म्हणाला,
‘कृष्णा बघ बघ ! हे तर आमचे सर्व गोत्रज आणि गुरू आहेत.’ हे शब्द ऐकून श्रीकृष्ण क्षणभर अचंबित झाले. त्यांच्या मनांत आले की हे काय नवीनच काढलंय् अर्जुनाने ; काहीतरी अनाकलनीय आहे एवढे मात्र खरे ! अर्जुनाच्या मनातील खळबळ त्या हृदयस्थ ईश्वराने लगेच जाणली पण त्यावेळी तो स्तब्ध राहिला.
इकडे अर्जुनाला समोर उभे असलेले भीष्मादि योध्दे केवळ प्रतिस्पर्धी न वाटता आपले चुलते, आजोबा, गुरू, बंधू, मामा दिसले. तसेच आपले इष्टमित्र, कुळातील तरूण नि मुले दिसूं लागली. त्याला त्यांत जिवलग मित्र, सासरे, पुत्र, नातू, तसेच ज्यांच्यावर उपकार केले असे सर्व दिसले.

आणि त्याची मन:स्थिती अचानक बदलली. विलक्षण करूणेने तो व्याकूळ झाला. मात्र त्याचवेळी अपमानित झालेली त्याची वीरवृत्ती त्याला सोडून गेली. या प्रसंगांचे वर्णन करतांना ज्ञानदेव एक विलक्षण उपमा देतात. ते लिहितात की ‘ज्या स्त्रिया उच्च कुळातल्या असतात, सद्गुण आणि सौंदर्याने परिपूर्ण असतात, त्यांना अंगच्या तेजस्वीपणामुळे दुसऱ्या स्त्रीचे वर्चस्व सहन होत नाही. नवयौवनाचा बहर असलेल्या नव्या स्त्रीच्या प्रेमांत कामुक पुरूष स्वत:च्या पत्नीला विसरतो, आणि त्या स्त्रीची योग्यता न पाहता वेडा होऊन बेतालपणे तिच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. किंवा तप:सामर्थ्याने ऐश्वर्य प्राप्त झाले असतां वैराग्यसंपन्न पुरूषाची बुध्दि भ्रष्ट होते आणि त्याला वैराग्य नि मोक्षसिध्दीची स्मृती उरत नाही.’ “तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरूषत्व गेलें । जे अंत:करण दिधलें । कारूण्यासी ॥”
किंवा, आधीचा मंत्रनिपुण असलेला मांत्रिक जर मंत्रोच्चारांत चुकला, तर त्यालाच उलट भूतबाधा होते. अगदी तसाच अर्जुन या महामोहाच्या बाधेने वेढला गेला. अतिस्नेहामुळे भ्रमित झालेला अर्जुन आता कृष्णाला अजीजीने विचारेल.”

किती सुंदर प्रसंगचित्रण आहे हे. हाच तो अर्जुन विषाद !

(क्रमश: …….)






Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?