Thursday, February 15, 2018

 

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य-स्थळें (भाग १)

ज्ञानेश्वरी मधील सौंदर्य-स्थळें
गेली अनेक वर्षें ज्ञानेश्वरी वाचत असतांना प्रकर्षांने जाणवायचे ते तिचे विलक्षण लावण्य. खरंतर खूप वर्षांपूर्वीं इन्दौर येथील प्रा. प्र. गो. घाटे यांची रसाळ प्रवचनें ऐकून ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पडलो होतो. विशेषत: ते ज्ञानेश्वरीतील सौंदर्य-स्थळे इतकी खुलवून सांगत की ती ऐकतांना गीतेतले  गहन सिध्दांत साहाजिकच मागे पडत. कधीतरी आपण स्वत: गीता-ज्ञानेश्वरीचा अभ्यास करूं हे इतरांनाच नव्हे तर मलासुध्दां स्वप्नातही वाटले नसते. मात्र माझ्या निवृत्तीनंतरच्या काळात का होईना, ज्ञानेश्वरीसारखा भला मोठा खजिना हातीं आला ही केवळ पूर्वपुण्याई. असो.

आज सकाळीं माझ्या एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ स्नेह्याने आग्रहपूर्वक सूचना केली की ज्ञानेश्वरीतील तुम्हाला भावलेली सौंदर्यस्थळें तुमच्या भाषेंत सांगा. माझ्या मनांत तो विचार घर करून होताच, पण आजच्या संवादानंतर तो प्रत्यक्ष अंमलात येऊं म्हणतोय् !
मात्र प्रत्यक्ष आरंभ करतानाच जाणवतेय् ते असे कीं संपूर्ण ज्ञानेश्वरीच अतीव लावण्याची खाण आहे. कोणती रत्नें उचलावीत नि कुठली सोडून द्यावी हा संभ्रम कायम राहाणारच. तथापि, निदान प्रारंभ करण्यास्तव नमनापासून सुरूवात करूं. ओंकार-स्वरूप श्री गणेशाचे यथार्थ वर्णन केल्यावर श्री ज्ञानदेव सरस्वती शारदेचे वर्णन केवळ एकाच ओवींत पण किती समर्पकपणे करतात पहा. ‘आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थ कलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मियां ॥’

श्री शारदा ‘अभिनव’ आहे. अभिनव म्हणजे नित्य नूतन. खरे तर ती शक्ती आहे ईश्वराची, विविध रूपांनी प्रगटलेली संपूर्ण विश्वाचा कारभार चालवणारी, सतत बदलत राहणारी दिव्य शक्ती. तिला वाग्विलासिनी म्हटलें. सर्व प्रकारच्या वाचे वर म्हणजे बोलण्यावर मुक्त विहार करणारी. चार प्रकारच्या वाचा वर्णन केल्या आहेत, परा-पश्यंती-मध्यमा नि वैखरी. अधिक खोलात न शिरतां आपण वैखरीवर थोडे बोलू ! या बोलण्यामुळे खरं तर आपण व्यक्त होत असतो. लिहिणे हा देखील बोलण्याचाच प्रकार आहे म्हणा, मात्र लिहिलेले कुणी वाचलेच नाही तर तो निष्फळ खटाटोपच कीं ! असो.

तर, शारदेला वाग्विलासिनी म्हणाले ज्ञानदेव. एखाद्या उत्कृष्ठ वक्त्याचें वर्णन करतांना, ‘त्यांच्या जिभेवर प्रत्यक्ष सरस्वती नर्तन करते’ असे म्हटले जाते कारण ती सर्व विद्यांची अधिष्ठात्री देवता आहे. सर्व कलाप्रकारांची इष्टदेवता. अतिशय चतुर असलेली ही शारदा अखिल विश्वाला मोहवून टाकणारी आहे. खरें तर चारही पुरूषार्थांवर तिचीच सत्ता चालते. धर्म, अर्थ, काम नि मोक्ष तिच्याच अधिपत्त्याखाली प्राप्त करणे शक्य असते. अशा शारदेला ज्ञानदेव वंदन करतात.

सद्गुरूंच्या विषयीं लिहीताना ज्ञानदेवांची प्रतिभा विलक्षण जोमाने सळसळत जणूं उफाळून येते. त्यांना पूर्ण जाणीव आहे सद्गुरू अंतर्यामीं स्थिरावले असण्याची. आणि म्हणूनच अत्यंत आत्मविश्वासाने ते म्हणतात, ‘मज दृदयीं सद्गुरू । जेणें तारिलों हा संसारपूरू ।’ त्यांची सद्गुरूंवरील श्रध्दा अपरंपार आहे आणि स्वत: ज्ञानदेव ते पूर्णतृप्त झाल्याचे संपूर्ण श्रेय सद्गुरूंना देतात. विशेषेंकरून दहाव्या अध्यायापासून तर जवळजवळ प्रत्येकांत सद्गुरूंची स्तुती वाचत असतांना भक्तिभाव उचंबळून येणें क्रमप्राप्त ठरते. हा विषय आपण चर्चे दरम्यान अधिक विस्ताराने पुढे घेऊच.
‘महा-भारत’ या ग्रंथाविषयीं बोलतांना तर त्यांच्या वाणीला एक विलक्षण खुमारी चढते ! वेद-व्यासांच्या त्या अजरामर कृतीचे वर्णन करतांना उपमा-अलंकारांची ते अविरत उधळण करतात. या महान ग्रंथाला ते ‘विवेक-तरूं’ची असंख्य उद्यानें म्हणतात. सर्व सुखांचे आगर, सर्व प्रकारच्या चलनवळणाचें मूळ, सर्व रसांचे अमृतमय सागर, सगळे सिध्दांत किंवा पूर्ण ज्ञानाने परिपूर्ण असलेला हा ग्रंथ केवळ अजोड आहे असे ते आग्रहाने सांगतात. अनेकानेक कथांनी युक्त असलेली व्यास महर्षींच्या बुध्दीची ते मुक्तकंठाने स्तुती गातात. ते म्हणतात की हा ग्रंथ म्हणजे एक महाकाव्य असून श्री शारदेच्या शृंगारार्थ असलेल्या सर्व रत्नांचे भांडार आहे. सर्व धर्मांचे आश्रयस्थान नि संत-सत्पुरूषांचे तर ते प्रत्यक्ष हृद्यच आहे.
शब्दब्रह्माचे वर्णन केवळ बहारदार आहे. रसांचा रसाळपणा, शब्दांचा मऊसूत हळुवारपणा, महाबोधाची म्हणजेच आत्मज्ञानाची प्रचीती देणारा हा असामान्य ग्रंथ आहे असे ते आवर्जून सांगतात. हाच तो मोक्ष. येथे चातुर्य शाहाणे होते (म्हणजे चातुर्याला विवेकाची जोड मिळते), प्रमेयांना म्हणजे सिध्दांतांना अर्थ गवसतो आणि केवळ सुखाचाच अनुभव येतो. माधुर्याला अधिक गोडवा येतो, शृंगार केवळ कामुक न राहातां त्यातील सौंदर्य तेवढे शिल्लक राहते आणि जे जे योग्य नि उचित त्याला थोरपण लाभते. येथे कला अधिकच कुशल होते नि पुण्य विलक्षण तेजस्वी !
हा ग्रंथ केवळ श्रवण केल्याने जनमेजया कडून घडलेल्या मोठ्या पातकाचा (सर्पयज्ञ केल्यामुळे केलेली जीवहत्त्या) सहजगत्या समूळ परिहार झाला. इथें रंग अधिकच रंगतदार नि तेजस्वी दिसतात, तसेच सद्गुणांची थोरवी याच ग्रंथामुळे प्रकर्षांने जाणवते.
ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशाने त्रैलोक्य उजळून जाते अगदी तसेच व्यासबुध्दीच्या किमयेने अखिल ब्रह्मांड दैदिप्यमान झालेले आहे.
चांगली मशागत केलेल्या जमीनीत उत्तम बियाणे पेरल्यावर जसे उत्तम पीक घेतां येते, अगदी तसेच या ग्रंथाच्या परिशीलनाने आपल्याला हवा तसा परिणाम सहजसाध्य होतो. अथवा, एखाद्या मोठ्या शहरांत वस्ती केल्यावर अडाणीपण आपसूक जाऊन माणूस अधिक सुसंस्कृत नि अधिक व्यवहारी बनतो अगदी तसेच व्यासांच्या लिखाणांद्वारे माणसें अधिक प्रगल्भ होतात, समंजस होतात. तारूण्याच्या ऐन बहरांत एखादी षोडशा अधिकच सुंदर दिसते. (रहाळकरांनी या ओवीचे इंग्रजीत असे वर्णन केलेय् – A girl on the threshold of adulthood appears radiantly beautiful by virtue of adolescent charm !) असो !!
अथवा, वसंतऋतूचे आगमन होताच वनश्रीत विलक्षण नव्हाळी जाणवते. किंवा, सोन्याच्या लगडीचे दागिने होताच त्या सोन्याचे वेगळेपण सहज दृग्गोचर व्हावे, अगदी तसेच वेदव्यासांच्या उद्बोधनाने कुठल्याही वस्तूला विलक्षण सौंदर्य सहजगत्या प्राप्त होते.

श्री ज्ञानदेव म्हणतात की या भारतांत (महाभारत) व्यासोक्तीचे इतके सौंदर्य दडलेलें आहे कीं प्रत्यक्ष इतिहासाने सुध्दा याचा आश्रय घेतला असावा ! इतकेच नव्हे तर सगळी अठरा पुराणें देखील आपल्याला प्रतिष्ठा मिळावी म्हणून अतिशय लीनता धरीत याच ग्रंथाच्या आश्रयार्थ आख्यानांसाठीं आलीं असावीत !
खरें तर, जे काही या ग्रंथात सापडणार नाही ते त्रैलोक्यांत असणेच अशक्यप्राय होय.
आणि म्हणूनच संपूर्ण त्रैलोक्याला ‘व्यासोच्छिष्ट’ अशी संज्ञा अगदी यथार्थपणे प्राप्त झाली आहे. असे हे महाभारत परमार्थाचे उगमस्थान असून सर्वोत्तम, शुध्द, अनुपमेय, अद्वितीय नि मोक्षदायक आहे.
ही कथा मुनिवर्य वैशंपायन यांनी नृपराज जनमेजयाला सांगितली, जी खरे पाहतां महाभारताचा सुगंधित कमल-पराग म्हणजेच भगवद्गीता होय. यादवांचा राणा प्रभु कृष्णनाथ अर्जुनाशी संवाद साधतोय्. खरोखर, वेदव्यासांनी वेदांचा प्रचंड सागर ढवळून काढला नि हे गीतारूपी लोणी बाहेर काढले. या नवनीताला ज्ञानाग्नींत कढवून त्याचे सुगंधित साजूक  तूप तयार केले.
विरक्तांनी देखील ज्याची आस धरावी, संत-सज्जनांनी मनसोक्त भोगावे आणि जाणत्यांनी सोहं-भावांत दंग राहावे आणि जगाला अत्यंत वंदनीय असे आख्यान भक्तजनांनी श्रध्दापुर्वक श्रवण करावे. या संपूर्ण ग्रंथाचे सार भीष्मपर्वांत प्रसंगोपात्त आले आहे. प्रत्यक्ष भगवान् शिवशंभू आणि ब्रह्मदेवांनी वाखाणलेल्या या भागाचे नांव सुप्रसिध्द ‘भगवत् गीता’ असे आहे.
अतिशय आदरपूर्वक सनकादि मुनी याचे सेवन करतात.

मला अत्यंत आवडणारी ओवी म्हणजे –
“जैसे शारदीयेचे चंद्रकळे । माजीं अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ तियांपरीं श्रोतां । अनुभवावी हे कथा । अति हळुवारपण चित्ता । आणुनियां ॥
हे शब्देंविण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोला आदि झोंबिजे । प्रमेयांसी ॥”
वाहवा !
चकोरतलग म्हणजे चकोर पक्षाची पिलें, ज्यांच्या चोंची इतक्या नाजुक की त्या चोचींना काहीच धरतां येत नाही. आणि म्हणून पक्षीण आपल्या चोचीतले अन्नकण त्या पिलाच्या तोडीं अलगद भरवते. अशी आख्यायिका आहे की चकोर पक्षी फक्त चंद्रकिरणांचेच सेवन करतात. ही कविकल्पना असली तरी रम्य आहे हे निःसंशय.
शरद ऋतूत येते को-जागरी पौर्णिमा नि त्यावेळचे हवामान नि एकंदरच वातावरण अतिशय प्रसन्न आणि उत्साहवर्धक असते. अशा वेळीं घडलेली साधना खरोखर खूपच ‘एलीव्हेटिंग’ ठरते हे स्वानुभवावरून सांगतो.
माऊलींनी चकोर पिल्लांचा दाखला देताना अति हळुवारपणे ते अन्नकण गिळण्याचा दृष्टांत दिला आहे. कोणत्याही साधनेत घिसाडघाई नसावी, मग्रूरी नसावी, हेकटपणाही नसावा. निवांतपण निश्चितच फलदायी.
पुढे म्हणतात, ‘हें शब्देविण संवादिजे’. अचानक एका सिनेमातल्या पंक्ती आठवल्या माडगुळकरांच्या ! (डोळ्यात वाच माझ्या तूं गीत भावनांचे).
म्हणजेच शब्दांशिवाय संवाद घडू शकतो तर. ‘इंद्रियां नेणतां’ म्णजे कुठल्याही लुडबुडीविना साधलेला संवाद दिव्यत्वाशीं !

अगदी तशीच ही कथा ऐका मन एकाग्र करीत हळुवारपणे, माऊली विनवतात. म्हणजे मग बोलण्या आधीच निश्चित मतितार्थ तुम्हाला कळेल.
पुढे उदाहरण देतात कमलदलांवरून मध चाखणाऱ्या भुंग्याचे. तो इतक्या हळुवारपणे कमल दलावर बसतो की मधाबरोबर केसरसुध्दा गेल्याची बित्तंबातमी कमळाला राहात नाही ! तसेच कौशल्य गीता पाठकाने दाखवायला पाहिजे.
मग कुमुदिनीचे म्हणजे संध्याकाळीं विकसित होणाऱ्या कमळाच्या निर्व्याज, अपेक्षारहित प्रेमाचा दाखला देतात. आकाशांत चंद्र उगवताच ही कमलिनी विकसित होते, जणूं आपल्या जागीं स्थिर राहूनही ती चंद्राला आलिंगन देते आहे आणि हा प्रेमभाव खरोखर विलक्षणच म्हणायला हवा.
या ओवीचा मतितार्थ लगेच सांगतात, ‘ऐसेनि गंभीरपणे । थिरावलेनि अंत:करणे । आथिला तोचि जाणे । मानूं इये ॥’

संत-सज्जनांनो, आपल्याला अर्जुनाच्या पंक्तीला बसून हा बहुमोल ठेवा मिळतोय्, तेव्हा कृपा करून अवधान द्यावें ! मी ही सलगी करतोय कारण तुमचे अंतःकरण अत्यंत दयाळू आहे. मायबापांचा स्वभावच असा असतो की बाळ बोबडे बोलले तरी त्याचा त्यांना आनंद होत असतो.

पुढे म्हणतात, ‘या गीतार्थाची थोरवी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारौनी ॥’
गीतेची थोरवी प्रत्यक्ष भगवान् शंकर पार्वतीला सांगत असतांना तिला नवल वाटले, त्यावर तिच्या न विचारलेल्या प्रश्नाचे स्पष्टीकरण देत ते म्हणतात की हे देवी, जसे तुझे स्वरूप नित्य नवे असते तसाच गीतार्थ नित्य नूतन भासतो.
खरे तर देवी भवानी म्हणजेच माया. कायम बदलत राहणारी शक्ती. आणि गीता-ज्ञानेश्वरी वाचतांना दर वेळी आपल्यालाही नवनवीन अर्थ उमगतो हा सर्वांचाच अनुभव असतो.
पुढे म्हणतात, ‘वेदार्थसागरू । जया निद्रिताचा घोरू । तो स्वयें सर्वेश्वरू । प्रत्यक्ष अनुवादला ॥’
खरोखर, योगनिद्रेतील ईश्वराच्या घोरण्यातून ऋषींना वेद ऐकतां आले असे म्हणतात. इथें रणांगणावर उभे राहून तोच सर्वेसर्वा परमेश्वर अर्जुनाला स्वमुखें गीता सांगतोय ! आणि असे अगाध ज्ञान, जेथे वेदही मौनावतात तिथे माझ्यासारख्या मतिमंदाची काय कथा – असे कोण म्हणतंय् ? प्रत्यक्ष ज्ञानदेव !! पण तरीही अत्यंत लीनतेने सर्व श्रेय ते सद्गुरूंनाच देतात.
पुढे लोखंडाचे सोने करणाऱ्या परीसाचा दृष्टांत देताना ज्ञानदेव “वस्तुसामर्थ्या” चे महत्व सांगतात.
सरते शेवटीं, ‘तरी न्यून तें पुरतें । अधिक ते सरतें । करूनि घेयावें हें तुमतें । विनवित असे ॥’ या ओवीने श्री ज्ञानेश्वर महाराज प्रस्तावनेचा समारोप करतात.

ज्ञानेश्वरीतील सौंदर्य-स्थळें शोधावी लागतच नाहीत. पानोपानीं, ओवीगणिक तीं विखुरलेली आहेत याचा प्रत्यय प्रत्येक वाचकाला येतोच येतो. तथापि, केवळ पुनःप्रत्ययासाठी हा लेखनप्रपंच ! (क्रमश: पुढे……..!)


Comments:
भाव विभोर झाल्याशिवाय असे लिखाण करताच येणार नाही. तुमची ज्ञानेश्वरीवरील श्रद्धा आणि ज्ञानेश्वरीची गोडी दिसूनच येते. भाग्यवान आहात. कारण "भाग्यवंता छंद मनी | कोड कानी ऐकती | किंवा तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे | संसारी जन्मीजे याचितलागी ||
आनंद वाटला.
 
Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?