Sunday, February 11, 2018

 

प्रेमात पडावे असे शेर-वुड !

प्रेमात पडावं असे शेर वुड ! 
साधारण तीन वर्षांपूर्वी रॉबिनहूडच्या इंग्लंडमधल्या नॉटिंगहम् मधल्या शेरवुड जंगलांत मुद्दाम वसवलेल्या सेंटरपार्क्स मध्ये तीन चार दिवस राहण्याचा योग जुळून आला होता. त्या जंगल रिसॉर्टवर बेहद फ़िदा झालो होतो. 
मात्र गेला आठवडाभर बंगलोरच्या कॉंक्रीट जंगलमध्ये (मुद्दामच) वसवलेल्या शेरवुड पार्कमध्ये मनसोक्त राहण्याचा आनंद उपभोगला. तीन-साडेतीनशे वस्ती असलेलं हें रिसोर्ट किंवा हाउसिंग सोसायटी म्हणा हवं तर, खरोखरच भुरळ घालणारे निघाले. 
तुम्हाला एव्हाना माहीत असेलच की चि. रवि-सिध्दीने बंगलोरला आपले दुसरें घर थाटले आहे. म्हणजे ते आलटून पालटून मुंबई नि बंगलोरच्या ऑफिसचा कारभार तेथे राहून पाहणार आहेत. त्यांना तिकडे जाऊन जेमतेम महिनाही लोटलेला नाही, पण आम्ही उभयतांनी त्यांचे नवीन वास्तव्याला भेट द्यावीच या आग्रहाखातर आम्ही दोघे आठवडाभर तिथे राहून आलों. ही शेरवुड सोसायटी खरंच अतिशय सुंदर, नीटनेटकी, सर्व बाजूंनी परिपूर्ण अशी आहे. साडेतीनशे ते चारशे वाहने सहज सामावून घेणारा अंडरग्राऊंड पार्किंग परिसर असल्याने एकही वाहन सोसायटीचे आंत फिरकतही नाही. चक्राकार वॉकिंग प्लाझा इमारतींच्या मधोमध फिरत असतो (म्हणजे आपण त्यावरून फिरतो – जरा पिज्जे  !) इमारती दोन मजलीच असल्या तरी अंडरग्राऊंड पार्किंग पासून दुसऱ्या मजल्यापर्यंत प्रत्येक इमारतींला ‘लिफ्ट’ची सोय. बाकी सर्व ‘फॅसिलिटीज’ इतर कोणत्याही अत्याधुनिक सोसायटी प्रमाणेच उपलब्ध. मात्र तरीही अनेक प्रकारांमुळे वैशिष्ठ्यपूर्ण आहे हे “शेर वुड”. कितीतरी मराठी कुटुम्बं राहतात इथे नि तीनचार तर चक्क इन्दौरी ! गेले वर्षभरापासून दर रविवारी न चुकतां चालणारे ज्ञानेश्वरी अभ्यास मंडळ. पंचवीस तीस व्यक्तींचा सहभाग नि त्यातले निम्याहून अधिक पंचविशीतले ! आय टी प्रोफेशनल्स असूनही न चुकतां हजर राहणारे अभ्यासू साधक ! दिल बाग बाग हो गया ! त्यांना आपली इंग्रजी ज्ञानेश्वरी दिली नि काहींना तिची सीडी देखील. मुख्य म्हणजे अतिशय इंटर-ॲक्टिव्ह सेशन. मुख्य वक्ता स्वत: आय टी कंपनींत डायरेक्टर आहेत सबनिस आडनावांचे नि पन्नाशीच्या आतले. त्यांची पत्नी इंजिनियर ; आई उच्चशिक्षित नि गीता-ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व असलेली. मात्र सगळेच्या सगळे
विलक्षण नम्र नि मनमिळाऊ . ते सकाळचे दीडदोन तास नि संध्याकाळी अडीचतीन तास इंदौरी फाटक मंडळींसमवेत कसे गेले ते कळलेच नाही. मात्र त्यातलाही पाऊण वेळ शेरवुडची तारीफ ऐकण्यांत नि बोलण्यांत गेला! 

पुट्टपर्थीची ट्रिप खूपच छान झाली. गेल्या चाळीस वर्षांतल्या सुरम्य आठवणींनी मन मोहरून उठले. भजन-दर्शन मनसोक्त मिळाले. खरोखर कृतकृत्य झालों पुन्हा एकदां तिथे जाऊन. 
परतीच्या वाटेवर ‘लेपाक्षी’ आणि ‘नंदी-हिल्स’ चा थरार मजेशीर होता. थेट घाटमाथ्यावर रविने गाडी अत्यंत कौशल्याने नेली नि तेथून दिसणारा पॅनोरामिक व्ह्यू डोळ्यांचे पारणें फेडणारा होता हे निर्विवाद. 
मैसूर ची ट्रिपपण झकास झाली. खासकरून मैसूर पॅलेस नि चामुंडा हिल खूपच प्रेक्षणीय. 
रस्त्याच्या दुतर्फा नि लांबलांबवर दृष्टीपथात येणारी हजारोनी असलेली नारळी-पोफळी-केळीचीं अक्षरश: जंगलें नि त्यामुळे दृग्गोचर हिरवागार प्रदेश मन मोहरून टाकणारा. अतिशय रोमांचक हवापाणी, रवि-सिध्दीचें अगत्य नि हौस यामुळें ही बंगलोर वारी कायमची स्मरणांत राहील. 

तूर्त स्वल्पविराम ! 

८ फेब्रुवारी २०१८ पुणे

Best wishes,
Dr. Rahalkar

Visit my blog-site - http://prabhurahalkar.blogspot.com/

Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?