Thursday, November 23, 2017

 

आरोग्य धाम (खंड सहावा)

आरोग्य धाम (खंड सहावा)
जीवन महाशयांना स्पष्टपणे आठवतोय दोन प्रतिस्पर्ध्यां मधला वैरभाव. दोघेही जलद वाढणाऱ्या वृक्षांसारखे – एक दणकट साग वृक्षासारखा नि दुसरा कोंवळा तमाल वृक्ष जणू. पण तो नाजुक मुलगा भित्रा नक्कीच नव्हता !
नवग्रामच्या प्राथमिक शाळेतून जीवन कांदी गांवी गेला आणि कांदी राज हायस्कूलमधे भरती झाला प्रवेश परिक्षेची तयारी करण्यासाठी, ज्यायोगें त्याला बर्दवान्च्या मेडिकल स्कूलमधे ॲडमिशन घेतां आली असती. त्या काळीं स्वप्न होते जीवनचे – डॉक्टर रंगलाल सारखे डॉक्टर होऊन त्यांचेप्रमाणेच पांढऱ्याशुभ्र घोड्यावर स्वार होत्साता, उंच कॉलरवाला लांब कोट घातलेला, खिशांत सोन्याची चेन असलेले सोन्याचे घड्याळ बाळगणारा नि सोबत डॉक्टरी बॅग लटकावलेला डॉक्टर जीवन दत्त !
सुदैवाने वडिलांची त्याचेवर माया होती नि घरात लक्ष्मी नांदत होती, म्हणून पैशांची वानवा नव्हतीं. उत्तम आरोग्य होते नि भीतीचा लवलेश नव्हता. शाळेतला रम्य काळ छान जात असला तरी त्याने आपले उद्दिष्ट कधीच नजरेआड होवूं दिले नाही. आपल्या खोलीतल्या कॉटवर पडल्या पडल्या तो आपण डॉक्टर जीवन दत्त झाल्याची दिवास्वप्ने रंगवीत राही.

मात्र आयुष्याला कलाटणी देणाऱ्या अशा काही घडामोडी घडूं लागल्या की जीवन त्यांत गुरफटून गेले. एका गरीब शिक्षकाच्या मुलीच्या प्रेमांत जीवन अडकले ! त्यांचे वय तेव्हा होते अठरा नि ती फक्त बारा वर्षांची. त्याकाळीं मुलगी चौदा वर्षांची झाली की विवाहयोग्य मानली जायची, आत्ताच्या मॉडर्न सतरा वर्षांच्या मुली इतकी ! ही मुलगी खरं तर वयाच्या मानाने थोराड होती पण जीवनच्या दृष्टीने ती अकाली प्रौढ नक्कीच नव्हती. किंचित लवकर उमललेली, एवढेंच ! शिवाय पूर्ण स्त्री झाल्याची लक्षणेही तिच्यांत नव्हती.
तारूण्याची नव्हाळी तिच्या अंगप्रत्यंगांवर भरपूर प्रमाणात दिसायला लागली होती नि कॉलेज मधील षोडशा म्हणून ती सहज खपली असती. खांद्यापर्यंतच रूळणारे केस तिचे खरे वय सांगू शकले असते. षोडशीचे  केस कंबरेपर्यंत पोहोचल्याशिवीय तिचे वय दर्शवत नाहीत. मंजरी त्याला साक्षात लक्ष्मीसारखी भासली मागे केलेल्या डेकोरेशनविना असलेली लक्ष्मी!

कदाचित् अतिरंजित होतंय् हे. एखाद्या देवीसारखी ती दिसे हे खरे असले तरी रंगाने मात्र ती खूपच सावळी होती, ए ब्लॅक ब्युटी ! कदाचित् म्हणूनच ती आवडली होती जीवनला. खरं तर ती होती फांदीवर उमलूं पाहणाऱ्या चंपक कळ्यांसारखी.
किंचित थोराड असल्याने षोडषा भासणाऱ्या मंजरीला तिच्या आईने घरकाम तर शिकवले होतेच पण तिनेसुध्दा काही निवडक कला हस्तगत केल्या होत्या. वडिलांनी सुरूवातीला बंगाली भाषा शिकवली नि नंतर तिने बंगाली प्रायमर आत्मसात केले. इतकेच नाही तर तिने रामायण आणि महाभारत सुध्दा वाचून काढले होते. या व्यतिरिक्त घरीं असलेल्या जुन्या हस्तलिखितां मधून तिने जुन्या वैष्णव कवींची उत्तम काव्यें थेट भरत चंद्रां पर्यंत वाचली होती. लवकरच तिला बंकिमचंद्रांच्या साहित्याची गोडी लागली. तिचे कोंवळे मन प्रताप नि शैबालिनी तसेच जगत सिंह आणि आयेशा यांच्या व्यक्तिमत्तेवर पोसले गेले होते. बंकिम चंद्रांच्या कादंबऱ्या  प्रथम तिच्या बंकिम नावाच्याच भावाने आणून दिल्या होत्या.

हाच बंकिम शाळेत जीवन बरोबर शिकत होता. जीवनला ख़र्च करण्यासाठी नुकतेच भरपूर पैसे मिळूं लागले असल्याने तो पहिल्या वहिल्या उन्मेषाने पैशांची उधळण करत सुटला होता नि त्यामुळे मित्रमंडळ बरेच वाढले होते. त्यातून उंची तंबाखूची ओढ बंकिमला जीवनकडे आपसूक घेऊन आली. महागड्या तंबाखूमुळे दोघांची गट्टी जमली. त्याच्या हे देखील लक्षात आले कीं जीवनशीं त्याचे लांबचे नाते आहे म्हणून त्याने जीवनची आपल्या वडील नवकृष्ण सिन्हांशी ओळख करून दिली. त्यांना या नवीन नात्याचे काहीही अप्रूप नव्हते ; तथापि या मुलाचे त्यांनी कौतुक मात्र केले.
‘तूं दीनबंधू दत्त यांचा नातू नि जगत् महाशयांचा मुलगा आहेस तर ! वाहवा ! तुला ठाऊक आहे तूं मोशाय कुटुंबातला आहेस ते ? आणि आयर्वेद तर तुमचा खानदानी व्यवसाय आहे. मी असेही ऐकलेंय् की तुझे वडील आतां जमीनदार पण झालेत.’
अशी प्रशंसा ऐकून जीवनला बरे वाटले नि तो आदरपूर्वक गप्प राहिला.
नवकृष्ण बोलत राहिले, ‘आमचे सुध्दा त्या भागांत पिढीजात घर आहे. पण मी इथे काम करत असल्याने वर्षातून एखाद वेळींच पूजेच्या निमित्ताने  तिकडे जाणे होते. नाहीतर तुम्हा लोकांची ओळख झाली असती. ते राहूं देत, तुला भेटून बरं वाटलं. पण—’ ते किंचित त्रासून उद्गारले, ‘पण तूं इंग्रजी काय म्हणून शिकतो आहेस ?’
जीवनला त्यांच्या बोलण्याचा रोख कळला नाही. ‘क्षमा करा, मी नाही समजलो’ तो म्हणाला.
‘अरे, आयुर्वेद आता तुमचा वारसा आहे, आणि तोच मार्ग तू चोखाळला पाहिजेस. त्यासाठी तुला संस्कृत शिकणे अनिवार्य आहे बाळा. तुला इंग्रजीकडे कां वळावसं वाटलं ? आयुर्वेद म्हणजे निव्वळ ज्ञानाचे भांडार नसून तुम्हाला मिळालेल्या सर्व गोष्टींचा मूळ स्त्रोत आहे तो; तुमची संपदा, ‘महाशय’ हे बिरूद वगैरे सर्व.’
‘मला मेडिकलचा अभ्यास करायचाय्.’
‘छान, खूपच छान’ नवकृष्ण प्रभावित झालेसे वाटले. ‘हे तर उत्तमच आहे. बंकिम, याला तुझ्या आईकडे घेऊन जा. ती खरी नातेवाईक आहे याची नि तिच्यामुळे आपण. जा, आंत जा.’
आतल्या अंगणांत मंजरी तिच्या धाकट्या भावाशीं खेळत होती. दोघे खूप जोरात गोलगोल गिरक्या घेत होते एका गाण्याच्या चालीवर. मंजरी खूपच जोरात गिरक्या घेत असतांनाच जीवन बंकिमसोबत तिथे पोंचले. आपला भाऊ बंकिम समजून ती जीवनच्या अंगावर धाड्कन आपटली गिरकी घेतांना. मात्र आपली फजिती झालेली पाहून ती चांगलीच बावरली नि लाजून तिने घरांत पळ काढला. इकडे जीवन त्या अचानक घडलेल्या हल्ल्याने अचंभित झाले आणि आतून येणाऱ्या तिच्या हंसण्याने चक्क घायाळ झाले ! त्या काळी पौगंडावस्थेत प्रणयाची स्वप्नें दाखवायला असे प्रसंग पुरेसे असत !
तथापि हे सगळे तेवढ्यावरच थांबले नाही. बंकिमने आपल्या मित्राची आईशी ओळख करून दिली. जीवन जेव्हा तिला वाकून नमस्कार करू लागले तेव्हा तिने त्याला रोखले नि म्हणाली, ‘नात्याने तूं माझ्यापेक्षा वडील आहेस. असं पहा, तुझ्या आत्त्याच्या नातीबरोबर माझ्या भावाने लग्न केलंय् ; म्हणजे तूं माझ्यापेक्षा वरिष्ठ ठरतोस, कदाचित् माझा सासरा ! पण वयाने मी मोठी असल्याने आपण दोघेही एकमेकांन् नमस्कार करायला नको. ये, बसून घे.’
या नवीन शोधामुळे बंकिमला हर्ष झाला. जीवन जर माझ्या आईचा सासरा असेल तर माझीही पदोन्नती झाली की ! तो आजोबा नि मी नातू, म्हणजे नातू मैत्रीच्या अंगाने आजोबांच्या खोड्या काढू शकतो !
बंकिमची आई नाष्टा आणण्यासाठी किचन मधे गेली तसा बंकिमने मंजरीला तिच्या लपायच्या जागेवरून बाहेर बोलावले. जीवनला त्या दोघांतील संवाद ऐकू आला.
‘चल बाहेर मूर्ख कुठली ! आपल्या आजोबांशी तुझी ओळख करून देतो.’
‘कुणाला भेटायचंय् ?’ तिने हलक्या आवाजात विचारले.
‘तुझे आजोबा !’
‘शी:, तो तर डुक्करासारखा दिसतोय, लठ्ठ नि काळाकभिन्न!’
‘ओह गप्प बस. लाज वाटते मला तुझी. तो माझा चांगला मित्र आहे नि ते सुध्दा मोठा खानदानी.’
‘मग खानदानी मुलगा गलेलठ्ठ डुकरासारखा कां दिसावा ?’
‘मूर्खासारखं बडबडूं नकोस. तो पुरूष आहे, एक बलदंड पुरूष. तो रोज भरपूर व्यायाम करतो.’
‘तर मग त्याने नाटक मंडळीत फिरून भीमाचा रोल करावा ना. शाळेत कशाला जायला पाहिजे ? आपल्याला मस्त गदायुध्द पाहता आले असते. मी नाही भेटण्यार त्याला.’
बंकिम बाहेर आला रागाने धुसफुसत.
अपमानित झालेला जीवन डुकरासारखा बसून राहिला. ते शब्द नक्कीच निरूत्साही करणारे होते, विशेषत: त्या संवेदनशील वयात. त्याने निघण्याची तयारी केली, ‘मला जरा काम आहे’ असे म्हणत.पण तेवढ्यात फराळाची ताटली घेऊन आई बाहेर आल्या. त्या म्हणाल्या, ‘मंजरी, आतून पाण्याचा ग्लास घेऊन ये’. त्यांचे व्यक्तिमत्व चांगलेच प्रभावी होते. जीवन नकार देऊ शकले नाही. इतकेच नव्हे तर हट्टी मंजरीला सुध्दा बाहेर यावे लागले, हातांत पाण्याचा ग्लास घेऊन. ‘त्यांना नमस्कार कर मंजरी’, आईने फर्मावले, ‘ते आजोबा आहेत तुझे’. मंजरी साडूचे टोक तोंडांत धरून हसत सुटली.
‘कां हसते आहेस अशी ? जा, नमस्कार कर त्यांना.’
‘आजोबा आहेत हे ?’
‘होतं असं कधी कधीं. काका आपट्याहून लहान असून शकतो. त्याने काय बिघडले ? तुळशीचं पान नेहमीच पवित्र असतं.’
तिने वाकून नमस्कार केला नि पुन्हा हसूं लागली.
‘पुरे आता मंजरी’, तिची आई रागावून म्हणाली. ती हसतच आत निघून गेली.
आमचा तरूण जीवन क्लीन-बोल्ड झाला होता; त्याला ती अचानक आवडून गेली होती ! पण वाटेत काटे विखुरले आहेत.

अशा रीतीने सुरू झाला एक संग्राम, ज्यामुळे त्याचा संपूर्ण जीवनक्रम ढवळून निघाला. त्याचा प्रतिस्पर्धी होता भूपतीकुमार बोस, जो भप्पी बोस म्हणून ओळखला जाई. तो होता एका अति-श्रीमंत बापाचा लेक नि त्या भागातला दादा ! त्याची चालण्याची ढब मस्तवाल हत्त्तीसारखी होती, डुलतडुलत संथ. एक पाऊल दमदारपणे टाकत तो चालायला लागला की लोक आपसूक बाजूला होत.
उंचापुरा नि देखण्या भप्पीने मुद्दाम वाढवलेले केस छानपैकी वळविलेले असत. तो देखील बंकिमचा मित्र होता नि मंजरीवर त्याचा डोळा होताच.

हे सरळ सरळ आव्हान होते वाघ नि अस्वला मधलें. मंजरी त्या दोघांना याच नांवाने संबोधणार आहे. दैवापाशीं खरोखर विलक्षण विनोद-बुध्दी असते हेच खरें !
आणि नाटकाचा पडदा वर गेला.

(क्रमश:…….


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?