Sunday, November 19, 2017

 

आरोग्य धाम (खंड पाचवा)

आरोग्य धाम (खंड पाचवा)
परण खानची बायको आता बरी आहे, अर्थात् डॉक्टरांच्या अपेक्षेनुसार जरा कमी. तिची लक्षणे नाडीप्रमाणे नाहीत. खरं तर आजारापेक्षा ती अधिक चिंताग्रस्त आहे. पोटात दुखणं, सर्व अंग ठणकणं वगैरे अनेक तक्रारी. हे लोक तर तिला अंथरूणावरून उठूंच देत नाहीत. गमतीची गोष्ट म्हणजे डॉक्टरला ती जितकी सुधारलेली दिसते तितकी ती आजारी असल्याचं भासवते ! आणि ही बाब त्यांच्या वैद्यक ज्ञानाच्या आवाक्यांतली नाही. खरं तर तिलाच बरे व्हायचे नाहीये. तिला कौटुंबिक जबाबदारी नको आहे; कदाचित नवऱ्याशी तिचे पटत नसावे. म्हणूनच डॉक्टरांना प्रसंगावधान ठेऊन कौशल्याने परिस्थिती हाताळावी लागते. ती आता बरी झाली आहे असे डॉक्टरही सांगत नाहीत, कारण वयस्क खानला खरे काय ते सांगितले तर तो तिच्यावरच भडकेल. शेवटी कौटुंबिक तणाव कुठल्याच लग्न झालेल्या जोडप्यासाठी सुखावह नसतो. डॉक्टर स्वत:च त्या आगींत होरपळलेले आहेत नि अजूनही त्या झळा सोसत आहेत. आजसुध्दा घरी पोहोचताच त्यांना त्या वणव्याची चाहूल लागली. पण त्या संतापाची त्यांना कल्पनाही नाही.
अतर बहू स्वत:शीच पुटपुटत बसल्या होत्या, मात्र त्या पुटपुटण्यांत जहर जाणवतंय्. आणि निशाण्यावर आहेत ते स्वत: नि भोंदू वैद्य शशी ! म्हणजे आज शशीने तेल ओतलंय् आगींत !! डॉक्टर व्हिजिटला गेले असतांना तो आला नि भरपूर तिखटमीठ लावून गावगप्पा करून गेलाय्. वऱ्हांड्यात त्याने ओढलेल्या विड्यांची थोटकं पडलीत. त्याने नक्कीच सकाळी झालेल्या डॉक्टरांच्या अपमानाबद्दल सांगितले असणार अतर बहूला !
खरं तर शशीने जीवन महाशयांकडून बरेच वैद्यक उचलले होते आणि त्याच्या आयष्याची सुरूवात इथूनच झाली नि नंतर बर्दवान् ला जाऊन त्याने कंपांऊंडरी ची परिक्षा दिली होती.  नवग्रामच्या खैराती दवाखान्याचा तो पहिला कंपांऊंडर. आपलं काम तो चोखपणे करी आणि वेळ पडल्यास उपचार पण.  नाडी परिक्षेवरून निदान करण्याचे कसब जीवन महाशयांनीच त्याला शिकवले होते. मात्र शशीच्या संवई फारच गलिच्छ ; दाढी करायचा त्याला विलक्षण कंटाळा. तो आंघोळ क्वचितच करी नि दात कधीच घासलेले नसत. आपले कपडे तर तो पंधरापंधरा दिवस बदलत नसे नि ते देखील दुर्गंधी सुटेपर्यंत ! तो सतत विड्या फुंके नि दारूचे पण त्याला व्यसन होते. विडीकाडीमुळे त्याची नवग्रामची नोकरी गेली. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. हुक्का नि त्याचे सर्व साहित्य तो कायम जवळ बाळगत असे आणि वर दिमाखात सांगत असे, ‘तुम्हाला माहीत आहे हुक्का ओढयला मला कोणी शिकवले ते ? माझ्या प्रत्यक्ष आजोबांनी ! मला त्याची लाजबीज वाटत नाही, सर्व काही खुल्लमखुल्ला ! मी तर माझ्या मुलांना पण सांगून ठेवलंय् की मी जेव्हा मरेन तेव्हा माझ्याशेजारी हुक्का नि तंबाखू ठेवायला विसरू नका. काडेपेटी नाही ठेवली तरी चालेल. मी चितेच्या अग्नीवर काम भागवीन !’
नोकरी सुटल्यावर आपल्या तुटपुंज्या वैद्यकीवर तो थोडोफार कमावून धेई. आणि जरूर पडेल तेव्हा जीवन महाशयांचा सल्ला अवश्य घेत असे. त्यांना तो ‘गुरूजी’ म्हणून संबोधायचा.
काय करतोय शशी इथे ? मोतीच्या आईबद्दल सांगून त्याने अतर बहू ला काय म्हणून विचलित केलंय् ? जीवन यांना चांगलाच मनस्ताप होतोय. त्यांना माहीत आहे की या बातमीनुळे तिचा जुना राग पुन्हा उफाळून येईल. ‘हा म्हातारा कधीच शिकणार नाहीये काय ?’ तिची गुरगुर सुरू झाली होती. ‘ अहंकारी माणूस ! असले दु:खद् निर्णय सांगून काय मिळते यांना ? आणि ते काही उच्चशिक्षित डॉक्टर नाहीत. स्वत:च स्वत: शिकलेले एक वैदू आहेत हे. खूप कमीपणा नाही का हा ? त्यांनी नवग्रामचे डॉक्टर त्यांच्याबद्दल काय बोलतात ते ऐकायला हवे. अन् तो शशी ! मूर्ख कुठला. त्याची हिम्मत तर पहा या सगळ्याला बोगस म्हणण्याची !’

तर शशी त्यांना बोगस म्हणतोय ! जीवन महाशयांना वाटले त्याने तसे म्हणायला नको होते. त्यांच्या अडाणी पत्नीने त्या इंग्रजी शब्दाचा  दूरान्वयाने अर्थ काढलाय् नि तो तिला चांगलाच झोंबलाय्.
पण शशीला दोष देण्यांत काही हंशील नाही. कोणाजवळ बोलण्यावांचून त्याला तसेही राहवायचे नाही. त्या तरूण डॉक्टर प्रद्योत ने चांगलंच वादळ उडवून दिलंय्. शेवटी अन्यायाविरूध्द उभे राहण्याचा मानवी स्वभाव आहे नि एक उठला की बाकीचे त्याला येवून मिळतातच की.

नवग्रामच्या सर्व डॉक्टर्स साठी प्रद्योतने आपला इरादा स्पष्ट करून टाकला आहे नि त्यांच्यामार्फतच तो बाजारांत चर्चेचा विषय झालाय्. कुणाला तू लवकरच मरणार आहेस असे सांगणे म्हणजे रानटीपणाची परिसीमा झाली. मृत्यूशिवाय अधिक भयानक काय असू शकते ? तो अजूनही एक अनभिज्ञ प्रांत आहे. लोक तर रोजच मरतात पण मृत्यूची चाहूलसुध्दा बेचैन करतेच ना ? मृत्यूचे गूढ कोणाला उकलले आहे ? अजूनपर्यंत नक्कीच नाही. ‘तूं आतां मरणार’ असे इतर कुणी म्हटले तर ते धमकावणे आहे असे मानले जाणार नाही. पण तेच डॉक्टरने पेशंटला म्हटले तर ती मृत्युदंडाचीच शिक्षा ऐकणे नव्हे काय ?
नेमका हाच मुद्दा डॉक्टर प्रद्योत ने उचलून धरला होता. त्याला या असंवेदनशीलतेचा धक्का बसला होता. तर मग एका सामान्य मारेकऱ्यात नि या भोंदूबाबात काय फरक राहिला हा स्वाभाविक प्रश्न त्याला स्वस्थ बसूं देईना. त्याने या बाबतींत एक तक्रार-अर्ज जिल्हा न्यायाधिशांकडे देण्यासाठी डॉक्टर मंडळींकडून सह्या गोळा करायला सुरूवात केली होती.
डिग्रीप्राप्त असे तीन डॉक्टर्स नवग्राम मधे प्रॅक्टिस करीत होते नि प्रद्योतची नेमणूक सरकारी हॉस्पिटलात होती. उरलेल्या दोघातला डॉक्टर हरेन हा प्रद्योतला दोन वर्षांनी सीनियर नि या गावाचाच होता. मेडिकल स्कूलमधून पास झाल्यावर त्याने गावातच स्वत:चा दवाखाना सुरू केला होता. दुसरे डॉक्टर चारू बाबू हे सगळ्यांत वरिष्ठ.
आता पन्नाशी पार केलेले चारू बाबू पंचवीस वर्षांपूर्वी  आले नि स्थानिक रूग्णालयांत रूजूं झाले. गावातील डॉक्टर्स पैकीं एम्. बी. ही डिग्री मिळालेले ते एकमेव. दहा वर्षांपूर्वी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी स्वत:चा खासगी व्यवसाय सुरू केला. आता तर त्यांनी प्रॅक्टिस सोडून यूनियन नि स्कूलबोर्ड च्या कामावरच सर्व लक्ष केंद्रित केलंय्. लोक तर असं म्हणतात की प्रॅक्टिस विशेष चालत नसल्याने त्यांनी हा मार्ग चोखाळलाय् तोंड लपवण्यासाठी ! त्यांचा मोठा मुलगा वरिष्ठ सरकारी अधिकारी आहे नि धाकटा मेडिकल स्कूलमधे शिकतोय्. तसे डॉक्टर चारू चांगले आहेत, मात्र अंमळ कंजूष ! दररोज संध्याकाळी ते दोन औंस ब्रॅंडी अगदी मोजून ग्लासातून घेतात.
बहुतेक डॉक्टर्सना पेशंट्स कडून काहीना काही येणे आहे पण चारू बाबू  त्याला अपवाद आहेत. त्यांचे अकाउंट पुस्तक अद्यावत असे. कुणालाच ते उधार औषध देत नसत. एक महिन्या आड त्यांचा कंपांउंडर युनियन कोर्टात जाऊन खटला दाखल करीत असे. निष्ठूरपणाचा कुणी आरोप केला तर ते जीवन महाशयांचा दाखला देत. ‘त्यांच्याकडे पहा. त्या म्हाताऱ्यानेच मला धडा दिलाय्. पन्नास हजार रुपये तो वसूल करू शकला नाही. त्याच्या हिशेबाच्या वह्या सडताहेत ; वाळवी लागलीय् त्यांना. मला वाटतं चूकभूल घ्यावीद्यावी या शिकवणीच्या बाहेर आलोंय मी.’
आणिक एक चक्रधर बाबू या नावाचे डॉक्टर होते एल्. एम्. एफ्. झालेले, बरेच वरिष्ठ. त्यांनी प्रॅक्टिस कधीच बंद केली होती नि ते खरेखुरे संन्यस्त जीवन जगताहेत भगव्या वस्त्रांचा अंगिकार करीत.
जेव्हा कधी एखादा पेशंट आपली नाडी तपासून घ्यायला येई तेव्हा ते नकार देत. ‘काय उपयोग आहे त्याचा’, ते उद्गारत. ‘डॉक्टरांना सगळे कळते असे कां वाटते तुला ,’ ते विचारीत. ‘खरं तर तो केवळ अंदाज असतो, एक अटकळ. ती खरी निघाली तर छानच, नाहीतर ईश्वरेच्छा ! डॉक्टरची फी काही बुडत नाही !! एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा ; आजार सहसा आपोआप बरे होत असतात. शरीर रचनाच तशी असते. डॉक्टर लोक महागडी नि जालीम औषधें वापरतात आपल्या ठोकताळ्यांवरून आणि पेशंटला वाटते औषधांमुळे गुण आला. अर्थात् असेही काही गुणी डॉक्टर आहेत जे निश्चित रोगनिदान करूं शकतात.’
हुक्का ओढतां ओढतां डॉक्टर चक्रधारींना त्या काळातल्या जुन्या प्रथितयश डॉक्टरांची आठवण झाली. सर नीलरतन, डॉक्टर बिधानचंद्र रॉय, डॉक्टर नलिनी सेनगुप्ता आणि इतर काही. काय दिवस होते ते ! आणि इथे या गावात मला पहायचे भाग्य लाभले डॉक्टर रंगलाल यांना !  कसला माणूस होता तो. अर्थात् जीवन महाशयांचे निदान अगदीं अचूक. त्यांचा मुलगा डॉक्टर वनविहारी, आमचा चांगला मित्र नि चांगला डॉक्टरसुध्दा. खूप मजा करायचे आम्ही, नि नशापण ! तो आजारी पडला मरणासन्न अवस्थेत. आम्हाला नाही उमगले ते, पण जीवन महाशयांना आधीच कळले होते……‘

त्यांचे अविरत बोलणे ऐकून पेशंट कंटाळून निघून जात. ते नुसतेच हंसत. ‘गोविंद गोविंद. फुकट नाडी तपासू ? खूप केलंय आधीं, आता नाही. ‘

मात्र प्रद्योत त्यांना मुळात डॉक्टर मानायला तयार नाही. त्याच्या मते गावात तीनच पात्र असे डाक्टर आहेत. हरेन आणि चारू बाबूंना डॉक्टर प्रद्योतचा मुद्दा कांहीसा पटतोय् पण ते गप्प राहणे सोयिस्कर मानतात. खरं तर एखाद्या आजारी माणसाला तो मरणार आहे असे सांगणे नक्कीच संवेदन शून्यता आहे हे त्यांनाही पटतेंय. असं काही ऐकून रोग्याला  जगण्याची आशाच शिल्लक राहणार नाही. हरेनला प्रद्योतचा राग समजूं शकतो पण तो मान्य करायला धजावत नाहीये.
प्रद्योतने हरेनला खडसावून विचारले, ‘ तू स्पष्टपणे का बोलत नाहीस ? डॉक्टर म्हणून तुझे काही पवित्र कर्तव्य आहे की नाही ? तुला या मृत्यूबद्दलची भविष्यवाणी आणि साधा ज्योतिष सांगणाऱ्यात काहीच फरक वाटत नाही का ? माझ्या मतें हे चक्क चेटूक होय.’
ही सरबत्ती चालू असतांना हरेन पूर्ण वेळ दोन्ही हात जोडून उभा होता.
‘क्षमा करा, पण मी त्यांच्या गावाचा आहे. खरं तर त्यांचे माझ्यावर उपकारच आहेत. मी लहान असतांना त्यांनी माझे प्राण वाचवले आहेत.’ थोडे थांबून तो पुन्हा बोलू लागला, ‘ एकेकाळीं ते विलक्षण यशस्वी डॉक्टर म्हणून नावारूपाला आले होते. माझ्या तुटपुंज्या वैद्यकीय ज्ञानाच्या आधारें मी निश्चितपणे सांगू शकतो की त्यांचे रोगनिदान केवळ अद्भूत होते. आणि ते सुध्दां नुसत्या नाडी परिक्षेवरून ! आता म्हातारपणामुळे कदाचित् ते कौशल्य थोडे कमी झाले असेलही. असं म्हणतात ना, की मोठाल्या ऋषींकडून देखील चुका होवूं शकतात ते !  शिवाय किशोर दा सुध्दां बाहेरगांवी गेलेत. ते परत आल्यावर आपण निर्णय घेऊया. ‘

‘किशोर बाबू !’ प्रद्योतला संताप अनावर झाला. ‘कोण आहे हा तुझा किशोर बाबू ?’ तो ताड्कन उद्गारत चालायला लागला.
 ‘तूं तापट तरूण आहेस’, चारू बाबू म्हणाले. ‘इथे स्थायिक होणे तुझ्यासाठी अवघड आहे. तुझी लवकरच बदली होईल इथून नि मग तू जाशील परदेशांत निघून, उच्च शिक्षण घेण्यासाठी. मला वाटतं तू इथे फक्त अनुभव घ्यायला आला आहेस सांसर्गिक रोगांचा उपचार करण्याच्या निमित्ताने. तुला त्या वयस्क डॉक्टरशी बंगा घेणे शोभत नाही. तू हे सर्व विसरून जायला हवे. तुझ्या त्या तक्रार अर्जामुळे त्यांचे तर नुकसान होईलच, पण इतरांनाही त्याचा फटका बसेल. असं म्हणतात की एक डॉक्टर व्हायला शंभर जणांना मारावे लागते नि चांगला डॉक्टर होण्यासाछी हजार जणांना ! एखादा भोंदू आपल्या परीने काही थोडे कमवीत असेलही, पण काही जणांना तर त्याचा फायदा होतोच ना . करू देत की त्यांना हवे तें, तूं का त्रास करून घेतोस ? तुझी इच्छा असेल तर मी सांगतो त्यांना भविष्यांत असे भाकीत न वर्तवण्याविषयीं . तुला माहीत आहे, जुन्या काळीं एक गाणे खूप गाजले होते – “तुम्हाला जे काही करायचे असेल ते काळवेळ पाहून करा !”
‘फार उतावळेपणा बरा नाही, त्याने गोष्टी बिघडूं शकतात,’ चारू बाबू मनापासून हंसत बोलले.

प्रद्योतला हा सद्गृहस्थ आवडला. तो इथे येताच त्यांच्याशी जुजबी ओळख झाली होती त्याची पण आत्तापर्यंत निव्वळ हाय-हॅलोपुरती. चारू बाबू आज जरा जास्तच प्रेमात आलेले भासले त्याला. त्यांचे ते गाणेसुध्दा आवडले त्याला. “जे काही करायचे ते काळवेळ पाहून करा”. वाहवा !

तो जरा नरम पडला नि किंचित् लज्जायमान पण. खरं तर चारू बाबुंनी योग्य तेच सांगितलंय्. त्याने त्या वयस्क डॉक्टरांवर इतका राग धरायला नकोच.
‘ठीक आहे, मी तुमच्या सांगण्याप्रमाणे वागायला तयार आहे, पण एका बिंदूपर्यंतच,’ प्रद्योत म्हणाला, ‘ते जे काही करताहेत ते नक्कीच निष्ठूर आहे नि अवैज्ञानिक सुध्दा. आणि त्यांना ताकीदपण द्या. काय मूर्खपणा आहे हा ! म्हणें वात, पित्त, कफ, श्लेष्म, नि नुसता हात पाहून सांगितलेली मृत्यूची भविष्यवाणी ! ‘
‘ तर मग मलाही काही सांगू देत. एक काळ असा होता की त्यांची ती भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरत असे,’ चारू बाबू सावकाशपणे बोलू लागले, ‘नि तसे अजूनही घडतेंय्.’ त्यांनी आपला स्वर अजून खालीं आणला, ‘तूं जरा काळजी घे. मला वाटतं तूं ठरवल्याप्रमाणे मोतीच्या आईला बर्दवान् किंवा कलकत्त्याला पाठवायला हवे. त्यांची भविष्यवाणी खरी ठरण्यापूर्वीं !’
‘तसे नक्कीच घडणार नाही’ प्रद्योतने ठासून सांगितले. सायकलवर बसतां बसताच त्याने निश्चय करून टाकला त्या भोंदूचे बिंग फोडण्याचा. हे तर सरळ सरळ चेटुक आहे. तो आपला मुद्दा नक्की सिध्द करणार. शेवटी त्याचे कर्तव्य आहे ते. नुसते पैसे मिळवण्यासाठी डॉक्टर झालेला नाही तो.

ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, ‘डॉक्टर प्रद्योत जीवन महाशयांना जेलमधे धाडणार ! जीवन महाशयांनी मोतीच्या आईला एक बिघडलेली केस म्हणून जाहीर करून टाकलंय्, तिचा मृत्यू नजीक आलाय नि तसे त्यांनी तिला सांगून पण टाकलंय्. पण प्रद्योत डॉक्टर तिला वाचवणार आहे. गरज पडली तर तो खटला दाखल करेल मॅजिस्ट्रेट कडे अर्ज करून. कदाचित कमिशनर साहेब किंवा थेट मंत्री महोदयांकडे देखील ! अर्जात सर्व प्रकारच्या भोंदू वैद्यांवर कायमची बंदी घालण्याची मागणी केली जाईल.’
या बातमीमुळे बी.के.मेडिकल स्टोर मधे चांगलीच खळबळ उडवून दिली.

बिनॉय च्या मालकीचे बी.के.मेडिकल स्टोर या भागातले अतिशय भरभराट झालेले दुकान. या भागातले सर्व डॉक्टर्स बिनॉयच्या दुकानातून एकगठ्ठा औषधें खरेदी करतात. स्टोरचा नावलौकिक पण चांगला होता.
बिनॉय काही डॉक्टर बिक्टर नव्हता पण तो सगळ्या डॉक्टर मंडळींना आणि कवीराजांना अंतर्बाह्य ओळखत असे. शिवाय कुटाळक्या नि लावालावी करण्यात तर त्याचा हातखंडा होता. त्याने शशीला हरिजन वस्तीकडे जातांना पाहिलं नि त्याला हाक मारली. ‘या डॉक्टर, आंत या ! एकेक झुरका होऊन जाऊ देत.’ ‘आतां तुमचे दिवस भरत आलेत हे कळले असेल ना तुम्हाला ? ‘ त्याने हवेंत बाण मारला. ‘तुला माहिताय् डॉक्टर प्रद्योत काय म्हणालाय ते ? तुम्हा सगळ्यांना तो भिकेला लावणार आहे, त्याच्या मतें भोंदूंना ! तुम्हाला खरं तर जेलमधे टाकायला हवे असे म्हणाला तो.’ त्यानंतरची चर्चा बरीच तापली.
काही वेळातच ही बातमी जीवन महाशयांच्या पत्नीला, अतर बहूच्या कानांवर शशीने घातली. ‘इतरांचे मरण कधी येणार वगैरे सांगायची, तेही फुकटात, काय गरज आहे यांना. मोतीच्या आईला हे सांगून काय मिळवले यांनी ? शेवटी आता विज्ञानयुगात वावरतेय हे जग, उच्च शिक्षित डॉक्टरांचा जमाना आलाय. एकें काळी ते वात, पित्त, कफ वगैरें वरचे उपचार चालून जात असत, पण आता नाही. काळ बदललाय्. आश्चर्य म्हणजे महाशयांना तें उमगत नाही.’

हाच एक कच्चा दुवा आहे जीवन महाशयांच्या आयुष्यांतला, जिथून नैराश्य उफाळून येते एखाद्या ठसठसणाऱ्या व्रणासारखे. इथून सुरूवात होते संसर्गाची नि शरीरभर ते पसरायला लागते. हे नक्कीच विधिलिखित असले पाहिजे. अन्यथा त्याचे स्पष्टीकरण दुसरे काय असणार ?
ते आपली डॉक्टरीची डिग्री नक्कीच मिळवू शकले असते ; इतपत त्यांची बुध्दी नि पैसा देखील भरपूर होता. पण त्यांना मधेच तो अभ्यासक्रम सोडून द्यावा लागला. पूर्ण डिग्रीप्राप्त डॉक्टर झाले असते तर कितीतरी फरक पडला असता नि अतर बहू तूं माझ्या आयुष्यांत आलीच नसतीस !


तो एक विलक्षण प्रसंग होता. त्यांनी दीर्घ नि:श्वास सोडला.

ती स्त्री होती, एक जीवघेणी लबाड बाई, जिने त्यांच्या आयुष्याचा खेळखंडोबा केलाय्. तिच्यावरूनच त्यांनी एका श्रीमंत, बिघडलेल्या मुलाशी वैर विकत घेतले होते. तो मुलगा त्यांच्याच कायस्थ जातीतला होता जमीनदार कुटुंबातला.

ओह ! तरूण वयातल्या त्या घोडचुका ! हातांत लुटुपुटीची लाकडी तलवार उगारत महाभयंकर राक्षसावर तुटून पडण्याचे धैर्य नि आगाऊपण ! एक साधासुधा गवळ्याचा पोर राजपुत्राशीं भांडण उकरून काढायला धजावतो म्हणजे काय !!

(क्रमश: ———-


Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?