Monday, November 06, 2017

 

आरोग्य धाम (खंड चवथा)

आरोग्य धाम (खंड चवथा)
जवळ जवळ दहा व्यक्ती, अधिकतर मुसलमान, मोडकळीस आलेल्या इमारतीच्या बाहेर वाट पाहात बसले होते. त्यांच्या तीन पिढ्यांपासून मोशाय कुटुंबाकडे पेशंट म्हणून ते येत आलेत, थेट वृध्द दीनबंधू मोशाय पासून. आता बरेचसे थकलेल्या जीवन महाशयांना खरं तर हा पारंपारिक वारसा पुढे चालवण्याची फारशी इच्छा नाही, पण लोक अजूनही त्यांच्याकडे आवर्जून येतात. वाढते वय नि घरातले अप्रिय वातावरण त्यांच्या शरीरावर दिसूं लागले आहे. त्यांचा एकुलता एक डॉक्टर मुलगा कालवश झालाय. शिवाय नव्याने अवतरलेले वैद्यक शास्त्र नि त्याचा फापटपसारा शेवटचा धागा ठरतोय. त्यांना कधीपासूनच निवृत्त व्हायचंय, पण काहीना काही कारणांनी तें घडत नाहीये. आज मात्र त्यांनी निश्चय केला आहे ;  डाक्टरकी चा आजचा शेवटला दिवस असणार आहे त्यांचा.

तशीही औषधें मिळत नाहीत आता इथे ;; डॉक्टरांनी  औषध साठा करायचे कधीच बंद केलंय. ते फक्त प्रिस्क्रिप्शन लिहीतात नि पेशंट्स तीं नवग्रामच्या बी. के. मेडिकल स्टोअर मधून खरेदी करतात. दर दोन महिन्यांनी किंवा जवळपास डॉक्टरांचे वाजवी कमिशन त्यांचेकडे पाठविले जाते.  
मोडक्या कपाटांच्या वर अकाऊंट पुस्तकांचे ढीग रचलेले दिसतील. मात्र त्यांचे पुष्टे झिजलेत नि कागदांना वाळवीने पोखरून टाकले आहे. डॉक्टर खिन्नपणे हसले. लोकांकडून येणे असलेल्या जवळजवळ पंचवीस ते तीस हजार रुपयांचे हिशेब आहेत त्यांत ! त्यांनी आपल्या तीन पिढ्यांची येणीं त्यांत जोडली तर हा आकडा लाखाच्यावर सहज जाईल.

त्यांचे आजोबा दीनबंधू महाशय नवग्रामला आले नि तिथेच स्थायिक झाले. तिथल्या रॉय चौधरी कुटुंबाच्या अखत्यारीत त्यांनी एक प्राथमिक शाळा सुरूं केली आणि तिथल्या शिकवणीबरोबरच ते रॉय चौधरींच्याच मंदिराचा आर्थिक व्यवहार पाहात असत नि त्यासाठी त्यांना वसूलीसाठी देखील जावे लागे.
महान् कविराज कृष्णानंद सेन हे त्या कुटुंबाचे फॅमिली फिजिशियन होते. नंतर त्यांनी दीनबंधूंना आपला विद्यार्थी म्हणून स्वीकारले. अशा प्रकारे घटना घडत राहिल्या. रॉय चौधरींचा एकुलता एक मुलगा टायफॉईड ने आजारी पडला. सर्वांनी आशा सोडल्या होत्या. पेशंटचे वडील छातीवर दगड ठेवून हा आघात सहन करीत होते तर दु:खाने व्याकूळ त्याची आई नि तरूण बायको अश्रूंचे पाट वाहात होत्या. केवळ कविराज खंबीर होते. ‘मला एका स्थिर आणि भक्कम परिचारकाची गरज आहे, जो कठीण परिश्रम करायला तयार असेल’. दीनबंधू स्वेच्छेने तयार झाले. अठ्ठेचाळिसाव्या दिवशीं ताप उतरला. ‘तुला अजून सुट्टी नाही,’ कविराज दीनबंधूंना म्हणाले, ‘तुला अजून चोवीस दिवस रूग्णाची काळजी घ्यावी लागेल. हाच काळ अतिशय महत्वाचा असतो. जवळचे आग्रही नातेवाईक त्याला बोलायला लावतील आणि गरजेपेक्षां जास्त खाऊं घालतील. तुला डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागेल.’ दीनबंधूंनी आपले कर्तव्य चोख पार पाडले, अत्यंत प्रभावीपणे.
कृतज्ञ बापाने त्यांना भलें मोठे बक्षीस देऊं केले पण त्यांनी ते नम्रपणे नाकारले.
‘मात्र मी तुला एक मौल्यवान वस्तू भेट देणार आहे, नाकारूं नकोस’ कविराज म्हणाले. ‘तुझ्यात एक सच्चा डॉक्टर व्हायची पात्रता आहे. तुला बुध्दी तसेच विलक्षण संयमाची देणगी लाभली आहे आणि तुला कसली हाव पण नाही. मी तुला पारंपारिक वैद्यक विज्ञान शिकवीन.’

आपला अभ्यासक्रम पूर्ण करून दीनबंधू नजिकच्या या लहानशा नि शांत खेड्यात येवून स्थायिक झाले. त्यांना नवग्राम मधे राहाण्याची इच्छा नव्हती कारण तिथले श्रीमंत जमीनदार एकमेकांवर कुरघोडी करण्यातच मग्न असत. शिवाय तिथल्या बाजाराचा गोंगाट त्यांना सहन होत नव्हता. या श्रीमंत लोकांचे समाधान करणे अवघड असते, ते म्हणत. त्यांचा चट्कन अपमान होई. एक लहानशी चूक जन्मभर केलेल्या सेवेवर पाणी टाकायला पुरेशी असे. त्यातून बाजार हा तर व्यावसायिकांसाठी असतो, निवान्तपणे ध्यानधारणा करणाऱ्यांसाठी सर्वथैव अयोग्य !

दीनबंधूंनी ‘महाशय’ हे बिरूद कमावलेले होते नि तेच पुढच्या पिढ्यामध्ये कायम राहिले. बिनकाठाचे धोतर नि पायांत चप्पल चढवून ते खेड्यापाड्यांतून फिरत असत आजारी नि रोगी व्यक्तींवर उपचार करीत. जवळच्या गावांमधला प्रत्येक मुलगा त्यांना ओळखत होता. आजारी पडल्यास ते त्यांचेवर उपचार करीत आणि जेव्हां कधीं ते भेटत तेव्हा आपल्याजवळ कायम असलेल्या बरणीतून त्यांना मध वाटीत.

त्यांची अजून एक आवडीची गोष्ट म्हणजे साधू संतां बद्दल असलेला जिव्हाळा. अनेक साधूंकडून ते विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीं बद्दल शिकले त्यांची मनोभावें सेवा करता करतां. कित्येक प्रकारचे मुष्टियोग आणि रहस्यमय उपचार त्यांच्याकडून ते शिकले. अर्थात त्यांतले काही लबाड नि भोंदू देखील निघाले, पण त्यांची पर्वा महाशयांनी केली नाही. अशा भोंदूंकडून फसवले गेल्याबाबत कोणी त्यांची टर उडवू लागला तर ते ताडकन् उसळून म्हणत, ‘पण मी तर नाही ना फसवले त्याला ?’

त्यांनी काही आदिवासी जमातींकडून सुध्दा अज्ञात जडीबुटींची माहिती मिळवली होती.
आपल्या असामान्य वडीलांप्रमाणेच असामान्य अशा ‘जगत् बंधू दत्त’ यांनी वडिलांकडून ही सगळी विद्या प्राप्त करून घेतली होती.

 मृत्युशय्येवर पडलेल्या दीनबंधूंनी त्यांना म्हटले होते,” मी तुझ्यासाठी मोठी प्रॉपर्टी सोडून जात नसलों तरी मनाचें मोठेपण नि दिलदारी हा मोठा वारसा ठेवून जातोय्. मोशाय कुटुंबाच्या प्रतिष्ठेला कमीपणा येऊं देऊ नकोस. त्या योगें तुझे संपूर्ण आयूष्य सार्थकीं लागेल नि पुढचें देखील !” ते त्यांचे शेवटले शब्द होते.

जगत् बंधू आपल्या वडिलांच्या अपेक्षांवर खरे उतरले. स्नेहमय बिरूद ‘मोशाय’ त्यांच्या नांवापुढे कायमचे चिकटले. वडिलांनी ते बिरूद कमावले होते ; मुलाला तें वारश्याने मिळाले नि तो उत्तम वारसा त्यांनी समर्थपणे जोपासला.
आयुर्वेद उत्तमप्रकारें शिकण्यासाठी त्यांनी ‘संस्कृत’ भाषेचा कष्टपूर्वक सखोल अभ्यास केला होता. फिजिशियन या नात्याने आयुर्वेद या ज्ञान-शाखेत त्यांचा हातखंडा होता. शिवाय ते आपल्या रूग्णांशी अत्यंत सौजन्याने वागत नि पैशांचा तर त्यांना अजिबात मोह नव्हता. त्यांचा स्वाभिमान त्यांच्या प्रेमळ स्वभावाला पूरक होता, जे त्यांच्या बोलीभाषेवरून, घडून गेलेल्या प्रसंगांवरून आणि त्यांच्या विनोद- बुध्दीवरून सहज जाणवायचे. त्यांच्या हजरजबाबीपणा नि विनोद-प्रियतेच्या आख्यायिका अजूनही स्थानिक रहिवासी रंगून सांगतात. मात्र त्यांच्या कोपरखळ्या कधीच दुखावणाऱ्या नसत. इतकेच नाही तर ज्याची थट्टा होई तो देखील हसून तिचे स्वागत करत असे.
नवग्राम नि त्यांच्या गावाला जोडणारा लाल खडीचा रस्ता जगत् बंधूंच्या विनोद-बुध्दीचा परिचायक ठरायचा. अनेक गमतीदार प्रसंग आठवून ते लोक हसून बेजार होतात.
पंचेचाळीस वर्षांपूर्वी आताचा हा गुळगुळीत रस्ता अतिशय खडबडीत, वेडेवाकडे उंचवटे नि खड्ड्यांनी भरलेला केवळ बैलगाडीसाठी उपयुक्त असा होता. पावसाळ्यात तर ते खड्डे अधिकच भयानक होत, ज्यांत एखादे लहान मूल सहज गडप होणे अशक्य नसायचे.
देवीपूरचे रहिवासी अजूनही त्या खड्ड्यांना विसरलेले नाहीत. कोणत्याही वयस्क इसमाला विचारा, तो ‘चोर-खड्डा’ नाव जरूर घेईल. तो खड्डाच असा होता की एखादा चोर त्यांत अडकून पडत असे. दुसरा एक खड्डा होता पशु-मारक. ब्रज न्हाव्याची म्हातारी गाय त्यांत पडून गतप्राण झाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे दु:खद् प्रसंगसुध्दा हसायला लावीत. ब्रजने गाईच्या मृत्यूबद्दल प्रायश्चित्त घेणे आवश्यक होते पण त्यासाठी त्याचे डोके कोण भादरणार ? न्हावी असल्याने त्याच्याजवळ वस्तरा तर होता, पण त्याच्यावर तो कोणी फिरवायचा? अखेर आपले डोके आपल्याच हातांनी कुणालाच भादरतां येणार ! शेवटीं जगत् बंधू महाशयांना ते करावे लागले. बेशुध्द अवस्थेतल्या एखाद्या रूग्णांचे केस ते स्वत: काढीत कारण न्हाव्यावर ते काम सोपवणे धोक्याचे असे.
त्यांनी जेव्हा ब्रज न्हाव्यासमोर बसून त्याचे डोके दोन्ही हातात धरले तेव्हा त्यांना हसूं आवरेना. “चांगला तावडींत सापडलास आज”, ते म्हणाले.
“तावडींत सापडलास म्हणजे ?”
“तूं इतक्या जणांचे रक्त काढले आहेस आजवर हजामत करताना ; आज माझी पाळी. कसें ?”

या रस्त्याला सुधारण्याचे श्रेय जीवन महाशयांना जाते. आपल्या नावाची  लाकडी पाटी त्यांनी आपल्या दवाखान्यावर लावली होती. ‘जगत् बंधू’ कविराज होते पण ‘जीवन महाशय’ कविराज आणि डॉक्टर पण. त्याकाळीं लोकांकडे पर्याय असे ‘जगत्’ नि ‘जीवन’ यांच्यांत. तुम्हाला कुठल्या प्रकारचा उपचार हवाय् ? जगत् बंधू आयर्वेदिक उपचार करतील तर जीवन महाशय नवीन प्रणालीचा.

‘निघून जाऊ देत लोकांच्या आठवणीतील त्या संकल्पना’, जीवन महाशय खिन्नपणे पुटपुटले.

त्या आठवणींनी त्यांना चांगलाच मनस्ताप झाला होता. जड अंत:करणाने ते दवाखान्यात परतले आणि काहीच न पाहता ते शून्यांत बघत राहिले.
आजचा दिवस ! होय, आज शेवटला दिवस असणार आहे महाशय परंपरेच्या डॉक्टरकीचा ! ठीक आहे, तसं का होइना !!

‘बाबू मोशाय’ !

‘मोशाय महोदय !’ म्हाताऱ्या शेख मक्बूल ने पुन्हा दारात येऊन हाक दिली. जीवन महाशयांनी दीर्घ निःश्वास टाकला. मक्बूल कडे वळत ते पुन्हा भानावर आले.
‘कोण आहे ते ?’
‘कृपा करून माझा हात पाहाता का महाशय ? मला खूप त्रास होतोय नि या वयात ते सहन होत नाहीये. प्रत्येक अंगप्रत्यंग ठणकतंय नि ताप पण ओसरत नाहीये. मला ठाऊक आहे मला लवकरच मातींत मिळावं लागणार आहे. पण हे दुखणे !! काही करता येणार नाही काय ?’
महाशयांनी नकारार्थी मान हलवली. ‘कृपया माझ्याकडे येऊ नकोस मकबूल. मी उपचार करणे बंद केलेय्. तू हॉस्पिटलच्या नवीन डॉक्टरांकडे का जात नाहीस ? ते कितीतरी चांगले आहेत.’
मकबूलच्या कानांवर विश्वास बसेना. जीवन महाशय, जगत् बंधूंचे पुत्र नि दीनबंधूंचे नातू असे कसे बोलूं शकतात ? जीवन महाशय, ज्यांच्या बोटांनी रूग्णांचे मनगट हातात घेताच आजार अर्धा गायब होतो, ते आज उपचाराला नाही म्हणताहेत ?
डॉक्टर खिन्नपणे स्मित करीत म्हणाले, ‘थकलोय् मी आता मकबूल. मी म्हातारा होत चाललोंय् नि माझ्या हातून चुका पण व्हायला लागल्यात.’
‘असं कसं म्हणतां तुम्ही डॉक्टर ?’ अतिशय कष्टाने कामदेवपूरचा दान्तू घोषाल म्हणाला. ‘ तुम्ही जर उपचार करायचे थांबवले तर आमचे कसे होणार ? कृपा करून आमची नाडी बघा नि आम्ही लगेचच निघून जाऊं. तुमच्याकडून चूक ? अन् तशी झालीच तर ते आमचे दुर्दैव समजू. आमचा नवीन डॉक्टरांवर, नवीन उपचारांवर आणि सगळ्या मूर्खपणावर  भरौसा नाय् ! शिवाय आमच्यासाठी ते फार महागडे आहेत.
त्याचे हे बोलणे खूपच लांबल्यामुळे त्याला अचानक धाप लागली नि तो खोकल्याने कासावीस झाला.
क्षणभर असं वाटलं की हा आता गुदमरणार ; डाक्टरांनी जवळपास पंखा किंवा तत्सम काही दिसतंय् का ते पाहिलं, त्या बिचाऱ्याला मोकळ्या वाऱ्याची खूप गरज होती. तो घामाघूम झाला होता. पण त्यांना काहीच सापडेना. तो चोरटा नंदू ! हातीं लागेल ते पळवणारा; मग त्या बाटल्या असोत, ग्लासेस, थर्मामीटरची डबी, स्टेथोस्कोपच्या टाकाऊ नळ्या वगैरे मिळेल ते !
काहीच न सापडल्याने डाक्टरांनी हिशेबाची एक वही ओढून काढली नि तिचा पुष्ठा फाडून त्या बिचाऱ्याला वारा घालायला सुरूवात केली. खरं तर त्या वहींत वसूल न झालेल्या पैशांचा हिशेब लिहिलेला होता. त्यांनी दुसऱ्या एका पेशंटला, ‘ आत जाऊन पटकन् ग्लासभर पाणी घेऊन ये ‘ असे सांगितले.
कामदेवपूरचा दान्तू घोषाल अजिबात बदलला नव्हता. तो चांगलाच खादाड होता आणि एकही मेजवानी तो चुकवीत नसे. ‘खाणे’ एवढे एकच उद्दिष्ट त्याच्या आयुष्यात होते. पण शरीराला पुष्ट करण्याऐवजी त्याची प्रकृती ढासळत चालली होती. त्याच्याशिवाय त्याला गांजाचे व्यसन जडले होते, पक्का गांजेकश झाला होता तो. तरूण वयात भूक वाढवण्यासाठी त्याने सुरूवात केली होती जेवणापूर्वी एकाद-दुसरा झुरका मारण्याची. त्याने त्याचे पोट फुगायचे अधिक अन्न मावावे म्हणून ! एकदां जीवन महाशयांकडच्या मेजवानीत तो बादलीभर अन्न खाऊन गेला नि त्या नंतर सत्तेचाळीस रसोगुल्ल्यांवर त्याने ताव मारला होता ! एका उन्हाळ्यात तर त्याने एकट्याने आख्खा फणस फस्त केला होता आणि शेवटी व्हायचे तेच झाले, प्रचंड पोटदुखीने कासावीस झाला. चार चार वेळा कॉलऱ्यासारख्या लक्षणांनी मरणासन्न झाला होता पण ‘पेटूगिरी’ त्याला कमी करता आली नाही. अपचनाबरोबरच दम्याने त्याला ग्रासलेले नि गांजा तर सुटत नव्हता, गांजा नि हुक्का दोन्ही ! आठवड्यातून किमान दोनदा डाक्टरांकडे येऊन तो म्हणें ,’ मला काहीतरी उत्तमातलं उत्तम औषध द्या डॉक्टर, मला अजिबात सहन होत नाहीये !’
त्याला सर्वोत्तम औषध तर हवे असायचे पण तेही फुकट !! तो डाक्टरांचा जुना वर्गमित्र होता खेड्यातल्या प्रायमरी स्कूल मधला आणि अनेक दंगा-मस्तीतला सवंगडी ! म्हणून त्याचा हक्क नव्हता का मोफत इलाजावर ?
शिवाय दान्तू पडला एक ब्राह्मण जो काही विशिष्ट कुटुंबांत पूजा करायला जात असे, भलेही त्याचे संस्कृत उच्चार चुकीचे असले तरी !
या त्याच्या विशिष्ट स्थानामुळे तो फुकट उपचाराचा धनी होता. बाहेरची डाक्टर मंडळी या हक्काला मान देत नसत पण जीवन महाशय देत. आणि का देऊं नये ? शेवटी हा हक्क त्याला त्यांच्या आजोबांपासून मिळत आलाय्.
तरी पण, दान्तूचे एक स्वभाव-वैशिष्ट्य होते. जेव्हा कधी त्याला एखाद्या होऊ घातलेल्या मेजवानीची कुणकुण लागे, तो तात्काळ यजमानांच्या मदतीसाठी आपण होऊन पुढाकार घेत असे. त्यावेळीं तो मन लावून सगळी कामे बिनबोभाट मार्गांवर लावी, मस्तपैकी पोटभर जेवून मगच घरी जाई. या स्वेच्छा कामासाठी त्याला पैशांची अपेक्षा नसायची, पण दोनचार आण्यांचा गांजा मात्र तो कृतज्ञतापूर्वक स्वीकारत असे ! अंत्ययात्रेच्या वेळी तो आवर्जून हजर राहात असे.
एक जुनी म्हण आहे – “जो कुणी मेजवानी किंवा अंत्ययात्रेच्या वेळी तुमच्या शेजारी असेल किंवा राज दरबारीं अथवा कोर्टात, तो खरा मित्र.”
एका दृष्टीने दान्तू सर्वांचा आदर्श मित्र म्हणायला हवा कारण तो कोर्टकचेऱ्यांत व्यायसायिक साक्षीदार म्हणून उभा राहायच !

खूप कष्टाने दान्तूला एक दोन ढेकर देतां आल्या आणि त्यामुळे त्याला जरा बरे वाटले. एक मोठा श्वास आंत घेत तो उद्गारला, ‘आता बरं वाटतंय्. तुम्ही या बाकीच्यांना तपासून घ्या डाक्टर, मला वाटतं मला थोडी विश्रांती हवीय्. ‘
मकबूल पुढे सरकला नि त्याने आपला हात पुढे केला. डॉक्टरांनी त्याचे मनगट धरतांच त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले. डॉक्टरकी सोडण्याची कितीही तीव्र इच्छा असली तरी ही मंडळी काही ते करू देणार नाहीत, हे मकबूलसारखे लोक. नव्याचें भय वाटते यांना नि परवडणार पण नाही बहुतेकांना. पैशांचे राहू देत, मानसिकताच नाही त्यांची. शिवाय त्यांची प्रकृती अशी विलक्षण आहे की नव्या औषधांना ते भलत्याच तऱ्हेने प्रतिसाद देतील. मकबूलला केवळ एक ग्रेन क्विनीन् दिले तरी तो घामाघूम होतो, नाडी क्षीण होते. म्हणून त्याला विदेशी औषधें मरणप्राय वाटतात.
डॉक्टरांनी अखेर सर्व पेशंट्स पाहिले नि मग ते दान्तू घोशाल कडे वळले. दान्तू आता बऱ्यापैकी स्थिरावला होता. त्याने जेव्हा डॉक्टरांकडे हात केला तेव्हा ते म्हणाले, ‘ काही उपयोग आहे का दान्तू ? तू कधीच पूर्ण बरा होणार नाहीयेस. कारण खूप सोपे आहे, तू खाण्याच्या बाबतींत फार हावरट आहेस. खरं तर तेच तुझा शत्रू आहे नि तेच मूळ कारण देखील. हावरटपणा घालवण्याचे माझ्याजवळ कुठलेच औषध नाही. त्याशिवाय गांजा ! मला वाटतं तब्येत बरी नसतानाही तू सकाळीच दम मारून आला आहेस.
अजिबात न डगमगतां दान्तू उत्तरला, ‘गांजा नव्दे डॉक्टर, विडीमुळे त्याची सुरूवात झालीय्. तुझ्या घराबाहेर तुझी वाट पाहतांना मला ताहेर शेख भेटला विडी ओढत बसलेला. मला खूपच गरज होती विडीची म्हणून मागितली एक. पण एकच झुरका घेतला नि ही स्थिती झाली माझी. त्यानंतर खूप बोललो पण तुझ्यापाशी !’ त्याने असा आव आणला जणू  काहीच चूक नव्हती त्याची. भाबड्यासारखे सुस्कारे सोडत तो बोलत राहिला, ‘ तुला कळणार नाही पण सगळा माझ्या नशीबाचा खेळ आहे हा ! आत्तां निदान ही खोकल्याची उबळ कमी होण्यासाठी काहीतरी दे. मी रोज दोन उकडलेली झुरळं घेतोय् चहासोबत सकाळ-संध्याकाल, पण काहीच फरक पडला नाही.
‘तू विडी नि गांजा सोडला पाहिजेस ताबडतोब’, डॉक्टर म्हणाले. ‘मेजवान्या सुध्दा बंद. नुसता साधा भात नि पिठलं, नाहीतर औषधांचा काही उपयोग नाही नि मी देणार पण नाही. ‘
‘ठीक आहे ; तर मग माझी नाडी बघ नि सांग तुझी भविष्यवाणी, जी तुझी खासियत आहे असं म्हणतात ! मी तर असेही ऐकलंय् की लोहाराच्या बायकोला तू अंतिम निर्णय सांगून टाकला आहेस नि तिला गंगेवर नेण्याचा सल्ला पण देऊन बसला आहेस ! आतां मला जे काही सांगायचं असेल ते सांगून मोकळा हो !
डॉक्टरांना धक्का बसला नि त्यांना सकाळचा प्रसंग आठवला. चट्कन विषय बदलत ते म्हणाले, ‘जरा गप्प बसतोस काय दान्तू ?’
एका कागदावर प्रिस्क्रिप्शन लिहून तो कागद त्याच्या हातांत कोंबला. ‘हे धर. बहुतांश वनस्पतीच आहेत, उरलेल्या गोष्टी किराण्यातून घे आणि चूर्ण करून सेवन कर.’
ते उठले, खूर्ची मागे सरकवली नि खोलीबाहेर पडले.
अमरकुरीचा पराण खान आपली बैलगाडी घेऊन बाहेर थांबला होता. त्याने महाशयांना सलाम केला आणि अदबीने उभा राहिला. त्याची तिसरी बायको गेले सहा महिने आजारी आहे एका मृत अर्भकाला जन्म देऊन. परण डॉक्टरांना घ्यायला आठवड्यातून दोनदां येत असे. आज जायचंय् . परण एक सधन शेतकरी आहे नि तो डॉक्टरांची ‘फी’ ताबडतोब आदा करतो.
डॉक्टर विषण्णपणे हसले कारण त्यांना आठवले ते कटु सत्य. अखेर जगण्यासाठी पैसा तर लागतोच ना ! जेव्हा ते पेशंट्सना आपला निर्णय सांगत होते तेव्हा या वस्तुस्थितीचा त्यांना विसर पडला होता. शिवाय त्यांना तर ते मोफत तपासत होते. शेवटीं स्वत:साठी, घरखर्चासाठी नि तडजोड न करणाऱ्या पत्नीसाठी काहीतरी कमावणे आवश्यक आहेच की !
‘तुम्ही तयार आहांत का डॉक्टर, का अजून काही लोक तपासायचे राहिलेच ?’
‘अरे नाही. चल निघूया !’
‘थोडा वेळ आतच थांबाल का ? मी आणलेल्या भाज्या घेऊन नंदू आंत गेलाय्. रिकामी टोपली आणताच निघू .’
परणखान एक जुन्या चालीरीती सांभाळणारा इसम आहे जो आपला स्नेह त्याच्याच तलावांतली मासळी आणि शेतांतले उत्पन्न भेट देवून दर्शवतो. आणि आता तर त्या भेटवस्तू वरचेवर पोंचविल्या जातात, त्याच्या बायकोच्या आजारापासून. डॉक्टरांच्या वरचा त्याचा विश्वास तसुभरही कमी झालेला नाहीं. हल्लीच्या नवीन औषधांवर त्याचा भरवसा असेल किंवा नसेल. पण नवीन तरूण डाक्टरांवर तर अजिबात नाही.
परण ची तिसरी बायको तरूण नि सुस्वरूप पण आहे आणि तो जरा संशयी वृत्तीचा ! बायकोच्या उपचारांसाठी अमाप पैसा खर्च करण्याची त्याची तयारी असली तरी त्याला आत्मसन्मान सर्वात महत्वाचा वाटे. त्या सन्मानासाठी मृत्यूदेखील कस्पटासमान होता. मात्र त्याला पांढऱ्या केसांच्या, सुसंस्कृत, वयस्क जीवन महाशयां बद्दल कधीच संशय येणार नाही. त्यांची नजरच मुळी एका पित्यासमान स्निग्ध नि प्रेमळ आहे किंवा हिवाळ्यातल्या गंगाजळाप्रमाणे शुध्द वि पवित्र.

बैलगाडी खडखड करीत निघाली.
मोकळ्या मैदानात येताच त्यांना रस्त्याच्या कडेला गच्च भरलेली भातशेती दृष्टीस पडली. एकेकाळीं तीं सर्व मोशाय कुटुंबाच्या मालकीची होती, आतां बिराट पांजाच्या मालकीचे तळें आणि घोष कुटुंबाचा बगीचा. जगत् बंधूंनी ही सर्व जमीन खूप पैसे वेचून खरेदी केली होती तळ्यासकट नि झमीनदाराच्या एक सोळांश हिश्श्यातून.

भूतकाळाच्या आठवणींत रमून गेलेत जीवन महाशय.
नवग्रामच्या प्रायमरी स्कूलमधे ते शिकत होते, बहुधा शेवटच्या वर्गांत. त्याकाळी जमीनदारांचा तोरा काही और असायचा. जमीनदारी मिळताच बडेजाव मिरवणें साहजिकच घडत असे. जमीनदारीचा अर्थ होता देवी लक्ष्मीला आपल्या कुटुंबात कायमची बांधून ठेवणे !
लहानपणी जीवन महाशय दिसायला छान वगैरे नव्हते. दणकट शरीर-यष्टी, काळासावळा रंग, फुगीर चेहेरा आणि चमकदार डोळ्यांमुळे ते उठून मात्र दिसत. आपला कासोटा घट्ट आवळून ‘हुतुतु’ च्या खेळात ते जेव्हा प्रतिस्पर्ध्यांवर चढाई करत तेव्हा एकाच वेळी अर्धा संघ गारद करूनच परत येत. मुलें तर चक्क पळून जात नि ‘तो पाहा वाघ’ म्हणून त्यांना चिडवत.
घराच्या मागे एक कुस्तीचा आखाडा होता आणि तिथे जीवन महाशय खूप व्यायाम करीत. मुदगल नि डंबेल्सचा नियमित सराव करीत. एक जोडी तर अजूनही पडलीय् घरात !
हा ढाण्या वाघ कदाचित् नरभक्षक झाला असता, जर पैशांचा अजिबात लोभ न करणारे वडील जगत् बंधू त्यांना न आवरते. त्यांना घराण्याचे चांगले नांव खराब होऊ द्यायचे नव्हते. त्यांना जमीनदारीची बिलकुल हाव नव्हती, पण केवळ इतर जमीनदारांचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांनी एक आयुध म्हणून जमीनदारीत थोडी भागीदारी घेतली होती.

त्यावेळचा एक प्रसंग त्यांना स्पष्टपणे आठवतोय.

मालकीहक्काच्या कागदांवर सह्या करण्याच्या दिवशीं त्यांचा मित्र ठाकुरदास मिश्राने काही बोचरे बोल सुनावले होते जगत् बंधूंना. एकें काळी याच मिश्राने “आरोग्य प्राप्ती हाच सर्वोत्तम लाभ” असे ठळक अक्षरात लिहिले होते दवाखान्याच्या भिंतीवर. ‘अच्छा, तर तूं आता जमीनदार झालास म्हणायचा ! म्हणजेच आध्यात्माच्या वैभवावर लक्ष्मी वरचढ झाली तर’, कुत्सितपणे म्हणाला होता. ‘जे लोक तुला मोशाय म्हणून आदरपूर्वक संबोधायचे ते आता अधिकच वाकतील ‘जमीनदार मोशाय’ समोर !’ या मिश्राला संधिवातातून बरे केले होते जगत् बंधूंनी !  पण ते खूप वर्षांपूर्वीं !
जगत् बंधूंनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ‘मी सांगतो तुला ठाकुरदास. आपण तलवार नि ढाली चे उदाहरण घेऊया. तशी दोन्ही शस्त्रेच. दोन्ही असतील तुमच्याकडे तर तुम्ही योध्दा म्हणवले जातां. मात्र तलवार-धारक नि केवळ ढाल ठेवणाऱ्यांत एक महत्वाचा फरक आहे, जो आपले शीर वाचवण्यासाठी ढाल बाळगतो. मला या मोठ्या जमीनदारांना तोंड देणे अवघड जात होते त्यांच्या कायम उगारलेल्या तलवारींमुळें. म्हणून मला ढाल घेण्याशिवाय पर्याय नव्हता. खरोखर सन्मानाने वावरणे कठीण होऊन बसले होते. रॉय चौधरींनी त्यांच्या तलवारींचे पातें कधीच गमावले आहे पण त्याची मूठ तितकीच त्रासदायक आहे. नवश्रीमंत असलेल्या ब्रजलाल बाबूचा हिस्सा अर्धी आहे पण रुबाब किती ! गेले सहा महिने तो मला चपराश्यामार्फत बोलावणे धाडतो. अर्थात तो चपरासी नम्रपणेच बोलतो. “सलाम डॉक्टर बाबू. तुम्हाला यावे लागेल”, तो म्हणतो. आता या रॉय चौधरींशी रस्त्यावर येऊन तर भांडतां येत नाही ना. ते हुकुम सोडतात त्यांचेकडे जाऊन तपासण्याचा. त्यांतले मोठे बंधू निदान माझी फी तरी देतात पण इतर सर्व ती चक्क डावलतात. म्हणून मला दुसरा पर्याय नव्हता ढाल बाळगण्यावाचून ! पण लक्षात ठेव, ही तलवार नव्हे. मी आता एका हातांत ढाल घेऊन सज्ज आहे तर दुसऱ्यात माझी औषधांची पेटी. आपण असे म्हणूया की छत्रीचा तो पर्याय आहे.”

आपल्या शब्दाला ते कायम जागले ; त्यांनी आपल्या संपत्तीचा कधीच बडेजाव मिरवला नाही दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठीं. उलट त्यांच्या छत्रछायेखाली अनेकांना सावली मिळत राहिली.
जीवन दत्तांनी शेजारच्या खोलीतून अभ्यास करताना हे संभाषण ऐकले होते.
तथापि, संपत्तीचा मद हळूहळू चढू लागतोच. ते स्वाभाविक असते म्हणा. ज्योतीजवळ कुठलीही वस्तु आणा, ती तापतेच. निसर्ग नियम आहे तो. सरतेशेवटी जीवन यांना पाश्चिमात्य औषधोपचारांचे आकर्षण वाटू लागले, जरी ते आपल्या वडिलांकडून आयुर्वेद सहज शिकू शकले असते. एखादा पदार्थ गरम झाला की प्रसरण पावतो. जमीनदाराचा मुलगा तो, त्याला पारंपरिक संकुचित वातावरणाच्या बाहेर पडायची घाई झाली होती. प्राथमिक शिक्षण पूर्ण होताच त्याने संस्कृत विद्यालयातून उत्तम संस्कृत नि व्याकरण शिकावे म्हणजे आयुर्वेद शिकणे शक्य होईल असा सल्ला जगत् महाशयांनी दिला. पण जीवन ने निषेध करून बंडच पुकारले. “मला मेडिकलला जायचे आहे ; पाश्चिमात्य मेडिसीन.” तो म्हणाला होता.
“मेडिकलचे शिक्षण ?”
“का नाही? तेच आता प्रचलित होतंय्. लोकांना कविराजी वर विश्वास राहिला नाही. बर्दवान् ला नवीन मेडिकल स्कूल उघडलंय, मी तिथे जाऊ शकतो.”
त्याने बरोब्बर निशाणा साधला होता. पाश्चिमात्य मेडिसीनचा पूर्ण शिरकाव झालेला होता. कोलकात्याचे मेडिकल कॉलेज नि हॉस्पिटल आणि बर्दवान् चे मेडिकल स्कूल. प्रत्येक जिल्ह्यात उभी राहणारी हॉस्पिटल्स, सगळीकडे खैराती दवाखाने. इंग्रज डॉक्टर्स नि त्यांचे हिंदी सहायक डॉक्टर्स त्यांच्या उंच गळ्याच्या जॅकेट, फुलपॅन्ट नि गोल हॅट्स, चेनच्या पॉलिश केलेल्या डॉक्टर बॅग्ज, नव्याने चिटकवलेल्या लेबलच्या बाटल्यांतली रंगीबेरंगी औषधें. खरंच एक नवीन युग अवतरतंय् !

प्रांताच्या या भागांत कविराजांचाच बोलबाला आहे पण उत्तर नि दक्षिण-पूर्व भागांत दोन नवीन मॉडर्न डॉक्टर्स आलेत, जणू रयतेवर हल्लाबोल करायला. उत्तरेकडील भाग डॉक्टर भुवन गाजवतोय्. मांडीपर्यंत चोळणा (ब्रीचेस) चढवणारा नि उंच कॉलरवाला कोट घालणारा भुवन एका लाल घोड्यावरून फिरतो. दुसरे डॉक्टर रंगलाल पालखीतून प्रवास करतात चार मैलांवरील त्यांच्या घरापासून. ते रेशमी पॅंट, लांब कोट, चेनने बांधलेले पॉकेट वॉच परिधान करतात. या भागांत नवीन उपचार प्रणाली आणणारे ते पहिलेच. एक स्वयं-शिक्षित विलक्षण बुध्दी असलेले नि अक्षरश: अवलिया असे हे विचित्र व्यक्तिमत्व. नदी काठच्या घाटांवरून किंवा जळक्या चिते वरची प्रेतें ते उचलून आणीत आणि पुस्तकाच्या निर्देशानुरूप त्यांची चीरफाड करीत. अशा प्रकारे ते ‘ॲनॅटॉमी’ (शरीर रचना शास्त्र) शिकले स्वत:च स्वत:पासून. या कठोर परिश्रमाचे फळ होते  असाधारण यशप्राप्ती हेच. दूरवरच्या हुगळीहून ते आले होते राज इंग्लिश स्कूल मधे शिकवायला शिक्षक म्हणून. त्यांचे इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते. आपल्या असाधारण आत्मविश्वासाच्या जोरावर ते राज इंग्लिश स्कूलच्या नामांकित हेडमास्तर शिवबाबूंच्या इंग्रजीला आव्हान देऊ शकत. मात्र एकाएकी त्यांना मयुराक्षी नदीलगतच्या एका खेड्याने ओढून घेतले आणि आपला पूर्ण वेळ त्यांनी मेडिसीनच्या अभ्यासासाठी झोकून दिला. सरते शेवटी त्यांनी मेडिसीनची प्रॅक्टिस करण्याचा मनोदय जाहीर करून टाकला. त्यांची ख्याती लवकरच पसरू लागली डॉक्टर म्हणून आणि एवढेच नाही तर त्यांची कीर्ती एक निष्णात पाश्चिमात्य डॉक्टर म्हणून दूरदूरवर पोहोचली. या नवीन शास्त्राने काही लोकांचे मनें काबीज केली होती हे नि:संशय.
जीवनच्या आयुष्याला महत्वाचे वळण देणारा हा कालखंड होता. नवीन मेडिकल शास्त्राने त्यांच्यावर मोहिनी घातली. त्यांना नाव, कीर्ती, यश, पैसा नि लोकांचे प्रेम देखील हवे होते. त्याचे वडील आता जमीनदार असल्याने ते शिक्षण परवडण्या सारखे होते. म्हणून प्राथमिक शाळेतून ते कांदीच्या राज हायस्कूलमधे दाखल झाले. ते तेथून प्रवेश परिक्षा देतील, मग एफ. ए. ची, मेडिकल स्कूलच्या प्रवेशासाठी. ……………

बैलगाडी थांबताच ते भानावर आले. ते आत्तां परम खानच्या घराच्या बाहेरच्या खोलीसमोर उभे होते.

(क्रमश:…………




Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?