Monday, October 30, 2017

 

स्मृतिगंध

स्मृतिगंध
आता ऐंशीचे वेध हळूहळू लागूं लागलेत् नि दररोज वार्तालाप करणाऱ्या काही सुहृदांचा आग्रह आहे की मी माझे आत्मचरित्र लिहायला घ्यावे. थांबा, मी तसे करणार नाही कारण अनेक प्रसंगीं ते लिहून बोलून झाले आहे. म्हणून पुन्हा त्याच गोष्टी नि प्रसंग तुम्हाला अजिबात सांगणार नाही.
माझे एक ज्येष्ठ स्नेही आज म्हणाले की डॉक्टर तुम्ही चिंतन-मननांत जरा कमी वेळ घालवतां, बाह्य जगाचा विचार किंवा लिखाण तुमच्याकडून भरपूर प्रमाणांत दिसत असले तरीही.
खरं तर माझा पिंड तसा नाही. मी आत्म-चिंतन वगैरे फारसे करूच शकत नाही; मी आहे एक “उचल्या”, बाहेरचे काहीही उचलणारा अर्थात् थोडे तारतम्य बाळगून !
चिंतन मनन वगैरे घडलेच तर गतकाळाच्या आठवणींतच मी रमून जातो. भविष्याचा विचार फारसा नसतो नि सांप्रतचा काळ तर जगतोच आहे इतर सगळ्यांसारखा !
बरं, इहलोक-परलोक वगैरेंचा विचार करण्याइतपत मी गंभीर प्रकृतीचा नाही किंवा प्रबुध्द देखील नाही ! म्हणजे तेही ‘चिंतन’ बारगळले कीं !
मी आहे स्वच्छंद, भिरभिरणारा (भरकटलेला मात्र नव्हे !) जीवन्मुक्त जीव ! (??) म्हणूनच आज आस्वाद घेणार आहे माझ्या स्मृतिगंधाचा. यू टू आर वेलकम !
हाऊएव्हर,
“अवधानरूपी मिळे जरी खाजें (खाऊ) । वक्तृत्व (सांगणे) पुष्ट होय ॥
आणि वक्तृत्वाचिया अक्षरांसी दोंदें (बहर) । सुटती स्वच्छंदें प्रमेयांची (भावार्थ) ॥ ………….ज्ञानेश्वरी !!!

नाही नाही, मला काहीही अवघड सांगायचे नाहीये. जरा ओंवी आठवली एवढेच !
त्या निमित्ताने अचानक आठवतात श्री प्र. गो. घाटे नि त्यांची वक्तृत्व शैली, अक्षरश: मंत्रमुग्ध करणारी. मग ते शारदोत्सवात केलेले व्याख्यान असो, त्यांनी संचालन केलेला परिसंवाद किंवा अतिशय रसाळ ज्ञानेश्वरीचे निरूपण. मग आठवतात कविवर्य अनिल, मंगेश पाडगावकर नि तत्सम कविश्रेष्ठ ज्यांनी माझे भावविश्व मोहरून काढले होते. राजा रविवर्म्याची नि मुळगावकरांच्या अप्रतिम चित्रकृती आणि खूप उशीरा पाहता आलेली यूरोपमधली मायकेलएन्जेलो नि लिओनार्डो डा व्हिन्सीची ‘डेव्हिड’ सारखी पाषाण शिल्पें. ल्युस्सर्न मधले ‘लॉयन् मॉन्युमेंट’ मला कधीच विसरतां येणार नाही. सागर-दर्शन तसे अनेक वेळा घडलें आहे पण कॉर्नवॉलचा जायगॅन्टिक ॲटलांटिक पाहून डोळ्यांचे पारणें तर फिटलेच पण आपली दृष्टी किती विशाल होऊं शकते याची झलक अनुभवतां आली.

आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगसाठी आलेल्या विंदा करंदीकरांनी ‘कवी’ ची अतिशय सुलभ व्याख्या केली होती. ‘ज्याला कविता कळते तो कवी ‘! (तेव्हापासून मी स्वत:ला कवी समजूं लागलों). मी कल्पनेतून एका वेगळ्याच विश्वांत सहज विहार करू शकतो. (पण त्यालाही ‘चिंतन’ वगैरे म्हणतां येणार नाही, कारण तें विश्व क्षणार्धात बदलते नि हाती निखळ आनंदाशिवाय काहीच ‘मौलिक’ वगैरे शिल्लक राहात नाही !

मी हाडाचा ‘खवैया’ आहे (सगळेच असतात, थोडे मान्य करतात) म्हणूनच मला जवळ जवळ प्रत्येक व्यंजनाने भरभरून समाधान दिलेले आहे. मला झोप देखील अत्यंत प्रिय आहे. म्हणून माझी एकच विनवणी त्या जगन्नियंत्यापाशी – माझी भूक नि झोप कायम जागृत राहू देत – असो.
स्मृतिगंधाच्या निमित्ताने आत्मस्तुती होणार हे ओघाने आलेच. तथापि, मला विलक्षण आनंद, समाधान आणि जगण्याची ऊर्मी नि ऊर्जा देणारी अशी काही मंडळी पाहतां ऐकतां आली की ज्यांमुळे मी कृतकृत्य झालो. माझे दोन्ही पितामह, आई-वडील, भावंडें, पत्नी, मुलें, नातवंडे, मित्र, सुहृद, हितचिंतक (आणि माझा असंख्य वाचकवर्ग !) हीं सर्व तर आहेतच पण माझे सद्गुरू, माझ्या वडिलांचे सद्गुरू, प्रत्यक्ष भगवन्त श्री सत्यसाई इत्यादि सर्व सत्पुरूषांचा माझ्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे हे मला कृतज्ञतापूर्वक नमूद केलेच पाहिजे.

स्मृतिगंध आठवतांना या सर्वांचें विस्मरण होणे कसे शक्य आहे ?

प्र. शं. रहाळकर
पुणे
३० । १० । २०१७






Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?