Sunday, October 29, 2017

 

आरोग्य धाम (खंड तिसरा)

आरोग्य धाम (खंड तिसरा)
त्या वृध्देच्या एकंदर दुखण्यांचा डाक्टरांनी मनातल्या मनांत आढावा घेतला. म्हातारपणा शिवाय तिला संधिवात नि अपचनाच्याही तक्रारी आहेत. मोडलेला पाय तर एक निमित्त आहे. खरंतर आता ती मरायला मोकळी आहे, पण तिला नाही मरायचंय एव्हढ्यांत. जगात कदाचित् अशी एकही व्यक्ती नसेल जी मृत्यूला शांतपणे सामोरे जाईल !
बिचारी अज्ञान नि मुलगा, सून, नातवंडं, इतकेच नाही तर घरदाराच्या मोहात पूर्णपणे गुंतून पडलीय्. पण तिला जावेच लागणार आहे, प्राप्त परिस्थितीत तेच श्रेयस्कर ठरेल.

त्यांची शरीरयष्टी मजबूत आहे नि शरीराचा भार पावलागणिक सहज लक्षात येणारा. शेजारच्या घरांवरून ते चालत असतांना लोक सहज ओळखतात महाशयांना त्यांच्या  विशिष्ट चालण्यामुळे ! हलक्या रिमझिम पावसामुळे रस्त्यावर चिखल झालाय् नि निसरडे पण. त्यांना डोळ्यात तेल घालून प्रत्येक पाऊल टाकणे भाग आहे. त्रासदायक आहे असे चालणे, पण त्याला इलाज नाही. घसरून पडले तर पाय मोडल्याशिवाय राहणार नाही. किती विचित्र आहे नाही, जेव्हा लोक धरणीला ‘सस्य-श्यामला’, मृदु, धरणीमाता वगैरे नावांनी संबोधतात, पण एकदा घसरून पडल्यावर कळते ती कितपत ‘मृदु’ वगैरे असते ते !! अन् या विचाराने त्यांना हसूं फुटले !
चालता चालतां ते थबकले. रस्त्याच्या कडेला सांचलेले पाणी दोन मुलें एकमेकांवर उडवण्यात रंगून गेली होती. पण महाशयांना पाहतांच त्यांनी स्वत:ला आवरले ; या भागांत जीवन महाशयांचा सगळेच आदर करीत.
‘बाळांनो, तुम्ही हे काय करताय ?’ त्यांनी विचारले.
‘आम्ही मासे धरतोय् ! पहा ना किती मोठाले आहेत इथे !! ‘
‘तूं मदन घोष चा मुलगा ना रे ?’
‘होय् , मी मदनाचा मुलगा बदना, !’
‘असं का ! आपल्या वडिलांचा उल्लेख करायची ही काय रीत झाली ? मूर्ख मुलगा ! तूं म्हटलं पाहिजेस ,” मी आहे बदन लाल घोष, आणि माझ्या वडिलांचे नांव आहे श्री मदनलाल घोष “. कळलं का आतां ?
जरासे लाजत बदनाने मान डोलावली .
‘आणि हा दुसरा मुलगा कोण? ‘ डाक्टरांनी विचारले. त्यांना हा देखणा मुलगा पाहुणा वाटला. तो नाही, पण बदन त्याच्याऐवजी बोलला.
‘तो त्याच्या आजोळीं आलाय, सरकार यांच्या घरी. ‘
‘ओह समजलो ! म्हणजे तू अतसी चा मुलगा आहेस तर ! म्हणजेच अतीन्द्र सरकार चा नातू . ‘
त्या मुलाने दोनदा मान डोलावून म्हटले, ‘होय साहेब’!
‘घरीं जा बाळांनो, नाहीतर तुम्हाला सर्दी होईल. ताप नि डोकेदुखी नकोय ना तुम्हाला ?’
‘मग तुम्ही का बाहेर पडलांत भर पावसात ?’ बदनाने विचारले.
डाक्टर जोरात हसले. ‘मी डाक्टर आहे खट्याळा ! ताप माझ्याजवळ फिरकू शकत नाही. पळा आता किंवा माझ्याबरोबर चला वाटल्यास. त्यांना ही सोबत मजेशीर वाटली.
आपल्या समाधाना खातर ते मुलांबरोबर चालूं लागले . सिताबला यायला वेळ लागला तर या मुलांशी बोलण्यात वेळ चांगला जाईल. ते बोलत राहिले, ‘ तुम्हाला माहीत आहे का, आम्ही डाक्टर मंडळी तुम्हाला कैऱ्या वगैरे खाऊ देत नाही, खूप आंबट असल्याने आजारी पडाल म्हणून . मात्र आम्ही त्या खातोच !!’
त्यांचा मित्र सिताब मुखर्जी आधीच आरोग्य धाम मधे येऊन बसला होता.
‘कुठे होतास इतका वेळ ? नन्द किंवा इन्दीर पण दिसले नाहीत.’
डाक्टरांनी मुलांना जायला सांगितले आणि मग त्यांनी बाहेर जायचे प्रयोजन सांगितले. ‘मोतीच्या आईला ‘बोलावणे’ आलंय्. एक मिनिट थांब, मी आत जाऊन चहा करायला सांगतो. तोंवर तू ही चिलीम पेटवून ठेवतोस का ? इन्दीर बहुधा बाहेर गेला असावा.’
जेवणानंतर एक नोकर गुडगुडी भरून ठेवत असे आणि मग सिताब बरोबर खूप उशीरा संध्याकाळपर्यंत बुध्दिबळाचा डाव ते मांडत. खूप वर्षांपासून बुध्दिबळाची गोडी दोघांना लागली होती आणि तारूण्यांतला उत्साह आता कमी झाला असला तरी ते डाव अवश्य मांडीत.

गुडगुडी भरून चहाचे फर्मान सोडतांच ते खेळायला सुरूवात करीत आणि आत्तां तर ते गढून गेलेत् त्यांत. खेळीत रंग भरेल आतां कारण महाशयांनी सिताब ची राणी काबीज केलीय्. बाहेर पावसाचा जोर वाढलाय् नि आभाळ चांगलेच भरून आलंय्. बहुतेक पाऊस लांबण्याची चिन्हे आहेत ही.
अंमळ स्तब्धतेनंतर सिताबने अचानक घरांत जाऊंया म्हणून सुचवले. ‘मला थंडी वाजतेय् जीवन ‘ तो उद्गारला.
‘थंडी ? मला तर इथे खूप प्रसन्न वाटतंय् ‘
‘तुला तसे वाटतंय् ते तुझ्या भरपूर चरबीमुळें ! शिवाय, मला बरं पण नाहीये. ‘
‘काही बोलूं नकोस ! मला तुझी नाडी पाहूं दे .’
‘आभार ! पण नको !! मलासुध्दा कळते नाडीपरिक्षा. जरासा ताप आला आहे एवढेच. काहीही गंभीर नाही. चल, आत जाऊं. ‘ सिताबने आपला हात मागे घेतला.
डाक्टर असे हरणार नाहीत. त्यांनी पुन्हा हात हातांत घेतला. चांगलाच तापलाय् सिताब. त्यांनी नाडी पहायचा प्रयत्न केला पण सिताबने हिस्सा देऊन सोडवणूक करून घेतली.
‘जीवन, जाऊं दे मला.’
‘मूर्खपणा करू नकोस, नाडी पाहू दे मला. ‘
‘नाही, कदापि नाही ! ‘ सिताब ओरडला.
त्याचे असे वागणे जरा विचित्रच आहे.
‘जाऊ दे मला, जाऊ दे मला ‘ असे म्हणत सिताब उठून चालायला लागला, आपला कंदील उचलत न पेटवताच.
‘तुझी छत्री राहिलीय् सिताब ‘, डॉक्टरांनी साद घातली. सिताब परतला, छत्री घेतली आणि कंदील पेटवून तो परत बाहेर पडला भर पावसात. ‘तू तुझीच नाडी पाहात बस इतरांच्या ऐवजीं, ते कधी मरणार हे सांगत. स्वतःच बघ तू किती दिवस जगणार आहेस ते ! ‘

अशा प्रकारचे कटाक्ष ते नेहमीच ऐकत आलेत म्हणून त्यांनी तो भडिमार मुकाट्याने ऐकून घेतला.
उद्या ते सिताबकडे जातील ; तोसुध्दां मनांत किंतू न बाळगता त्यांचें स्वागतच करील नि वर दिलगिरी दर्शक म्हणेल, ‘मी तुमच्याकडेच येणार होतो ‘!
घरात जाताजातां त्यांच्या मनांत विचार आला की त्याचे असे वागणे कदाचित् जास्त तापामुळे असावे. त्याची नाडी तपासली असती तर बरे झाले असते. आत्तांच जाऊं का सिताबच्या घरी ? पण नकोच. तो खरंच खूप आजारी असला तर अधिकच हेकटपणा करेल आणि तपासूं पण देणार नाही.
त्यांच्या प्रदीर्घ अनुभवांनुसार अशा प्रकारची लक्षणे कुठल्या तरी गंभीर आजारा कडे अंगुलिनिर्देश करतात. सिताबचे आजचे वागणें त्या लक्षणांशी जुळणारें आहे. खरंच सिताब खूप आजारी आहे. कां जाऊं दिले मी त्याला अशा पावसांत ? ताप नि असा अनियंत्रित राग आधीच वाईट, तशांत त्याला सर्दीपडसें यांनीसुध्दां ग्रासले तर आजार गंभीर वळण घेऊं शकतो.
सिताबचे तसे वय झालंय् हे खरे आहे आणि त्याच्यावर बायकोखेरीज  घरचे काही पाश नाहीत. आणि ती देखील तशी समर्थ आहे स्वत:ची काळजी घ्यायला ; कदाचित् नवरा नसला तरी तिचे फारसे अडणारहि नाही. सिताबची उणीव केवळ डाक्टरांनाच जाणवेल. इतक्या चांगल्या मित्राविना जगणे खरंच खूप कठीण असेल.
त्या दिवशीं ते लवकर उठून झटपट तयार झाले सिताबकडे जाऊन त्याला तपासण्यासाठी. एरव्हीं ते अंथरूणात पडून राहणे पसंत करीत, जोंवर पत्नी अतर बहु ऊर्फ ‘दुर्गा’ चा राग ओसरत नसे. नावाला साजेशा लढाईच्या मूडमध्येच ती बहुधा जागी होत असे, दहा हातांत दहा शस्त्रें घेतलेली दुर्गा, कोणालाही न जुमानणारी !
आज तिने घरकाम करणाऱ्या बाईवर खूप तोंडसुख घेतलंय् भांड्यांवरच्या माती नि राखेवरून ! ‘त्या मोलकरणीला कळत कसं नाही की प्रत्येक वस्तु झिजून अखेर राखेत परिणत होते ते , शरीरसुध्दां ! अगदी सत्पुरूष देखील मरणाला टाळू शकत नाहीत जर कुणी त्यांचे डोक्यावर हाणले तर ! मग त्या बिचाऱ्या भांड्यांची काय कथा ? त्यातून पितळ्याची भांडीं किती महाग झालीत आतांशा ! ‘

जरासे खाकरून आपण आल्याची चाहूल डाक्टरांनी दिली नि जरा शेताकडे जाऊन येत असल्याचे त्यांनी हलकेच सांगितले. त्यांनी बाहेर जायचे कारण मुद्दामच लपवले कारण तिच्या जळजळीत कटाक्षाने त्यांचीच राखरांगोळी झाली असती ना !
आपली छत्री घेऊन ते सिताबच्या घरीं पोहोचले नि त्यांनी त्याला हाक मारली. सिताब आधीच उठून बाजेवर तंबाखू ओढत बसला होता.
‘बरं वाटलं तुला पाहून. ‘
डाक्टर त्याच्याशेजारी बाजेवर बसले ; आपल्या मित्राला व्यवस्थित पाहून त्यांना आनंद झाला. ‘मला वाटतं की तुझा ताप पळालाय् !’
‘तूच बघ’ हात पुढे करीत सिताब म्हणाला.’
‘तुला वाटतंय् तसं ?’
‘बघच ! आणि सांग तुझी भविष्यवाणी ! मी तर कंटाळलोय या जगराहाटीला नि जजगण्याला पण. ‘
‘माहीत आहे ! काल रात्री तर माझ्यावर खूप संतापला होतास. ‘
 ‘काल रात्री तर माझ्या म्हातारीने मूठभर पोहेसुध्दा खाऊ दिले नाहीत ! मी सांगितले तिला की मला ताप आलाय नि सर्दीपण झालीय्. म्हणून जीवन महाशयांनीच मला दूध-पोहे खायला सांगितलंय. पण त्याहूनही पौष्टिक आहार म्हणजे तळलेल्या पुऱ्या ! मला माहीत आहे की घरांत साजुक तूप नि कणीक पण आहे, जरी बाजारात मिळत नसली तरी. पण ही म्हातारी तर मला तुपाचा थेंबही दिसू देत नाही, स्वतः मात्र खाते ! मी जेव्हा पुऱ्या तळायला सांगितल्या तर माझ्यावर उखडली. इतकेच नाही तर तुझासुध्दा उध्दार केला !
म्हणून मी असा बसलोंय्, उपाशी ! पोटांत खांडव वन पेटलंय् ! ती काहीच खायला देत नसल्यामुळे तंबाखू ओढत बसलोंय् ! ‘
डाक्टररांनी हात लावून पाहिलं ; ताप खरंच उतरला होता. ‘तुझ्या बायकोने योग्यच केले. आतां ताप ओसरलाय्, चहाबरोबर काहीतरी खाऊन घे. मी लवकर जेवण्याची आणि सूप-भाताची शिफारस करीन.’
‘काही तरी खाऊन घे !’ सिताबने त्यांची नक्कल केली. ‘मग पूजा कोण करेल, तू का मी ?’
‘सांग कुणाला तरी आजच्या दिवस’
‘कसला आशावाद आहे हा ! कोणाही तरूणाला विधिपूर्वक पूजा करता येते का आतां ? आणि त्या मूर्ख मुखर्जींला तर अजिबात बोलावणार नाही पूजा करायला. मी आधीच खाल्लं आहे हे कळताच तो चक्क आठ आणे मागेल ! ‘
‘ तर मग दे की ! आरोग्य आधीं सांभाळायचे, प्रिय मित्रा ! तू किती भुकेला आहेस ते माहिताय् मला. चहा बरोबर थोड्या पोह्यांनी नुकसान नक्कीच नाही. मी कुणाला तरी धाडडून देतो गावातून तुझे काम करून द्यायला.’
‘एक कृपा अजून करशील ? तिला थोडा शिरा करायला सांग ना !’


डॉक्टरांना गंमत वाटली. हे जोडपे खाण्यावरून एकमेकांशी सतत भांडत  असते नि डाक्टरांना नेहमी मध्यस्थी करावी लागते. स्वत: खादाड असूनही नवऱ्याला कायम खादाड म्हणून डिंवचत असते ! “जा आपली जीभ कापून टाक खादाड कुठला“, असे म्हणत त्याची टवाळी करते.

‘का हंसतो आहेस तूं‘, सिताब आता चिडतोय्.
‘तुला भविष्यवाणी हवीय ना ? ‘ पण त्याचा भेदरलेला चेहरा पाहून ते म्हणाले, ‘नाही, कोणतेच भविष्य मी सांगणार नाही. आत्तां तर नक्कीच नाही, कारण अजून बरीच वर्षें आहेत तुझ्यापाशीं. पण ताप पूर्णपणे जाऊ दे, शिरा थांबूं शकतो ! आजच्या दिवस सूप-भातच उत्तम राहील. जरा तुझी नाडी पाहूया. ‘
त्यांनी नाडी तपासली. ‘काही हरकत नाही, उद्या शिरा खायला’. पण शिराच काय म्हणून ?
‘चहा किंवा पोह्यांसारखे बेचव काहीच नकोय्. तिला निदान बिस्किटे तरी सांग ना द्यायला चहासोबत !’
सिताबची बायको लगेचच युक्तिवाद करेल कीं बिस्किटांपेक्षा पोहे कसे अधिक गुणकारी आहेत ते, किंवा जेव्हा बिस्किटें अस्तित्वातच नव्हती तेव्हा आजारी माणसांना काय दिले जायचे खायला. पुरूष असती तर ती नक्कीच चांगला वकील झाली असती. ती कधीही आरडाओरड करीत स्वत:चे संतुलन बिघडूं देत नसे आणि म्हनूनच तिच्याशी युक्तिवाद सोपा नसे. आजच्या स्त्री-स्वातंत्र्याच्या काळात ती जन्मली असती तर बरेच काही मिळवू शकली असती. हल्लीच्या स्त्रिया वकील, न्यायाधीश आणि चक्क कलेक्टर पण होतात.
डाक्टरांनी थोडा विचार केला नि म्हणाले की तुझ्या बायकोला नाही सांगणार पण कोणाकरवीं बिस्किटें धाडून देतो ; तू इथेच थांब.’
आपल्या आवडीचा पदार्थ मिळणार म्हणून सिताब निर्धास्त झाला. डाक्टरांचा हात धरून तो म्हणाला, ‘जरा थांबून चहा तरी घेऊन जा’.
‘मग तुला बिस्किटे कोण पाठवेल ? शिवाय, माझी इतरही कामे खोळंबली आहेत, माझ्याच कर्माचे फलित. पेशंट वाट पहात असतील, मला निघायला हवे. ‘
आता सिताबची काळजी नाही . ‘परमानंद माधव’ असे हलक्याने गुणगुणत ते चालायला लागले.
चालतांना त्यांनी उघडी छत्री जरा तिरपी धरली, जेणेकरुन वाटेत भेटणाऱ्या अशा लोकांना टाळतां येईल ज्यांचे घरी कुणी आजारी व्यक्ती असेल आणि जाताजाता त्याला पाहून जाण्याचा हट्ट पुरवावा लागेल.
अशा लोकांच्या भरपूर स्तुतीला ते जुमानत नसत, त्यांच्या ‘फी’ टाळण्याच्या युक्तीला भाळून ! नव्हे, परंपरेप्रमाणे मोफत इलाज करण्यासाठी त्यांची ना नव्हती, आजवर त्यांनी तसे अनेकदा केलेही आहे. पण आतांशा लोक मेडिकल डिग्री नसलेल्या डॉक्टरकडे तुच्छतेने पाहतात. त्या थंड हवेतसुध्दा त्यांच्या कानाच्या पाळ्या तापल्या. त्यांना काही लोक वैदू समजू लागले होते, असा वैद्य जो आता कालबाह्य झालाय !
त्यांना पशु-डाक्टर म्हणण्याइतपत काही लोकांची मजल गेली होती.
ते झरझर चालत राहिले इस्पितळावरून. एक नवीन आरोग्य केन्द्र उभारलं जातंय्. दिवसाची गडबड नुकतीच सुरू झालेल्या त्या केन्द्राकडे नजर टाकण्याचा मोह त्यांना आवरला नाही. भंगी नि त्याची बायको झाडलोट करीत होते, पेशंट वऱ्हांड्यात गोळा होऊं लागलेत, नर्सेस त्यांच्या क्वार्टर्स बाहेर पडून मुख्य इमारतीकडे चालल्यात. या नवीन आरोग्य केन्द्राची इमारत खूप मोठी असेल अनेक खाटांची नि विविध डिपार्टमेंट्स असलेली. त्यांत लहान मुलांसाठी, सांसर्गिक आजारांसाठी, शस्त्रक्रिया नि सामान्य रूग्णांसाठी  निरनिराळे विभाग असतील. खरंतर अशा प्रकारची सोय होणे कधीपासूनच अपेक्षित होतं. ज्या वेगाने देशांत आजार बळावताहेत तितक्याच प्रचंड प्रमाणांत मार्ग काढणे काळाची गरजच होती. डॉक्टरांना स्मरण झाले पहिल्या धर्मादाय चिकित्सालयाचे, बहुधा एकोणीसशे दोन किंवा तीन सालीं सुरू झालेले. त्याच्या आधीं ……. काय बरें ?
“प्रणाम डाक्टर मोशाय ! व्हिजिटवर गेला होतांत ?”
डॉक्टरांनी वळून पाहिले ; शेजारी खैराती दवाखान्याचा कंपाऊंडर हरिहर पॉल आपली सायकल सांभाळत उभा होता. डॉक्टरांना पाहूनच तो आदरपूर्वक  सायकलवरून उतरला होता. डॉक्टरांनी त्याला प्रेमाने विचारले, ‘कसा आहेस हरिहर?’
‘ठीक चाललंय महाशय !’
‘सगळं चांगलं आहे ना ?’
‘चांगलंच म्हणायला हवं !’
त्याचे खरें तर छान चाललेय्.
‘हल्लीं खूप पेनिसिलीन वापरतोस म्हणें. आता तर पेनिसिलिनचेच युग आहे ना ?’
‘खरंय ते महाशय ; आणि खूप उपयुक्त पण आहे ते .’ बोलताबोलता त्याची नजर डाक्टरांच्या मागून येणाऱ्या व्यक्तीवर पडली.
 ‘डॉक्टर साहेब येत आहेत, बहुधा तुमच्याच गावाकडून। मोती कर्माकरच्या आईला पहायला गेले असावेत. मोती काल रात्री आला होता.’
म्हणजे मोतीचा महाशयांवर विश्वास नव्हता तर ! त्याला या तरूण डाक्टर चा सल्ला घ्यावासा वाटला. जीवन महाशयांना धक्का बसला. त्यांनी वळून पाहिले ; हॉस्पिटलचा तो नवीन डॉक्टर सायकलवर बसून नजीक येत होता.
‘नमस्कार !’ जीवन महाशय म्हणाले.
तरूण डाक्टर सायकलवरून उतरले. ते होते कलकत्त्याहून आलेले प्रद्योत बोस. त्यांनी फुलपॅंट आणि बुशशर्ट परिधान केला होता, डोक्यावर कॅप नि डोळ्यांवर गॉगल्।
‘नमस्कार, कसे आहांत ?’
‘मला काहीच झालेले नाही, म्हणून मी बराच म्हणायचा ! तुम्ही मोतीच्या आईला पाहायला गेला होतात ना ? ‘
‘होय, मोतीने आग्रह केला तसा. तिला विलक्षण वेदना होत आहेत. ती पडली तेव्हा हॉस्पिटल मध्ये आली होती. पण नंतर ती बरेच चालली असावी नि दुखणे वाढवून बसली. तुम्ही कालच पाहिलंय तिला, म्हणून तुम्हाला कल्पना असेलच.’
‘होय. म्हणूनच तुम्हाला काय वाटते ?’
‘नक्की सांगतां येणार नाही एक्स-रे शिवाय. कदाचित् हाडाला भेग पडली असेल किंवा टवका उडाला असेल. एक्स-रे विना पर्याय नाही पण काही गंभीरसुध्दा नसावे,’ काहीशा बेफिकिरीने तो उद्गारला !

महाशयांनी मनोमन विचार केला; फ्रॅक्चर किंवा हाडाला दुखापत झालेली नाही कारण सूज एकाच ठिकाणी टिकून नाही. अर्थात् मला सर्जरीचे फारसे ज्ञान नाही. मला केवळ नाडीचे ज्ञान आहे. मला वाटतं हे दुखणे म्हणजे दुसऱ्याच आजाराचे लक्षण असावे, जो असेल…….’ त्यांनी जाणीवपूर्वक तो विचार सोडून दिला.
पण प्रद्योत आढ्यतेने मधेच बोलून गेला, ‘आणि तुम्ही सल्ला दिलात तिला गंगेवर नेण्याचा ! मला तर ती इतकी भेदरलेली दिसली की ती हा प्रवास सहनही करू शकणार नाही ; स्टेशनवर जाताजातांच ती मरून जाईल. ‘ तो मोठ्यांदा हसून म्हणाला. ‘पण मी तशी वेळ येऊ देणार नाही. ती बरी होण्याची मी पराकाष्ठा करीन. मोती काही रकम भरायला तयार आहे, उरलेले पैसे हॉस्पिटल सोसेल. मी कुणाला मारूं देणार नाही!’

ते शब्द महाशयांना बाणाप्रमाणे चाटून गेले, मात्र त्याचा विखार त्यांना चांगलाच झोंबला. तो विखार प्रत्यक्ष बाणापेक्षाही भयानक होता.

‘मला कोणाला मारायची गरज नाही डाक्टरबाबू, ती म्हातारी आपल्याच मरणाने मरेल तीन ते सहा महिन्यांत. तिला अनेक जुने आजार होते जे आता बळावले आहेत…….’
 प्रद्योतने आकाशाकडे पाहात म्हटले, ‘कृपा करून अशा प्रकारची भविष्यवाणी करायचे बंद करा. अखेर आजचे युग पेनिसिलीन नि स्ट्रेप्टोमायसीन चे आहे. आता तुम्ही तसे करू शकत नाही, अमानवीय ठरेल ते. तुमचे गंडेदोरे नि टोटक्यांच्या बरेच पुढे गेलेय् हे जग आता.
जीवन महाशयांना बोलण्याची संधी न देतां तो म्हणाला, ‘ नमस्कार, मला जायला हवे ; आधीच उशीर झालाय्’. तो घाईने निघून गेला जरासा नाराज होत आपल्या उद्दंडतेवर .

पण तो लगेचच परत फिरला. ‘ तुम्ही एकदा मुद्दाम या हॉस्पिटल पहायला, म्हणजे तुम्हाला झालेला विकास प्रत्यक्ष पाहता येईल. मी तुम्हाला अशा विलक्षण केसेसबद्दल रिपोर्ट्स दाखवीन मेडिकल जर्नल्स मधे छापून आलेले. एक काळ होता असा, जेव्हा भोंदू वैदू सगळीकडे उच्छाद मांडीत. पण आता नाही ! आता वैज्ञानिक पध्दती आहेत आणि लोकांचा त्यांचेवर हक्क आहे. तुमच्या जुनाट नि टाकावू पध्दती किती दिवस सहन करायच्या ? चूक आहे ते सर्व. इतर देशांत याबाबतीत शिक्षा होऊं शकते ! ‘
जीवन महाशय अवाक् होऊन पाहात राहिले त्या आरोपांवर आरोप करणाऱ्या तरूण डाक्टरच्या चेहऱ्याकडे . तर मग ते दोषी आहेत, शिक्षेला पात्र !!
या तरूण डाक्टरला कसं आवरावं ? ते आपल्या जागीं खिळून राहिले, आंत जाणाऱ्या रूग्णांच्या नजरांकडे दुर्लक्ष करीत. त्यांनी स्वत:ला शांत ठेवायचा खूप प्रयत्न केला.
यांत नवीन असे काहीच नव्हते. आपल्या दीर्घ कारकीर्दींत त्यांनी खूप शिकलेल्या डाक्टर्सकडून अशी अवहेलना सोसली होती. इतर डाक्टर्स बरोबर मतभेदही झाले होते, मात्र प्रत्येक वेळी तेच बरोबर ठरत आले आहेत.
त्यांचे निदान होत असे नाडी च्या ठोक्यांवरून नि ते कधीच चुकणारे नव्हते. जीवन महाशयांना आठवले ते दिवस जेव्हा त्यांचे आजोबा दीनबंधू दत्त यांना तें ज्ञान प्रथम प्राप्त झाले होते.

त्यांनी आपले चालणे पुन्हा सुरू ठेवले………!

(क्रमश:…..





Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?