Saturday, October 21, 2017

 

आरोग्य-धाम (खंड दुसरा )

आरोग्य-धाम (खंड दुसरा)
इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या श्रावण महिन्यातल्या दुपारीं जीवन महाशय जराश्या आळसटलेल्या नजरेने आभाळाकडे टक लावून पाहात होते आणि अचानक रस्त्यावरून कोणी तरी साद घातली.
“प्रणाम, डाक्टर मोशाय”
“कोण आहे ते ? ओह , मोती ! कुठे निघालास ?”
कोळश्याच्या धुळीने माखलेला मोती कर्माकर त्याच्या तोकड्या पेहेरावात लगबगीने चालला होता, नक्कीच कुठल्यातरी तातडीमुळे. डाक्टर त्याचे वडील ‘गोशा’ ला ओळखत होते नि त्यांचेवर डाक्टरांचा लोभ होता ;  गोशा ला देखील त्यांचे विषयी खूप आदर होता. रघुवीर भारती नावाच्या एका संन्याशाने तापावर उपाय म्हणून काही मुष्टियोग गोशाला शिकवले होते . ते मुष्टियोग जीवन महाशयांना देण्याची गोशा ची इच्छा होती, मात्र तो उपाय त्यांनी स्वीकारला नव्हता ; उलट तेच आपले रूग्ण कधीकधी गोशाकडे उपचारासाठी पाठवित. ते मुष्टियोग वारंवार चढणाऱ्या तापावर आणि एक किंवा दोन दिवसांआड येणाऱ्या मलेरियान / कालाआझार तापांवर रामबाण ठरत, जेव्हा इतर उपचार, अगदी क्विनाईन सकट सर्व निष्फळ ठरत.
आता ते गुपित मोती ला ज्ञात झाले आहे आणि तो त्यांचा उपयोग करू लागलाय् . पाण्यांत उगवलेली कुठलीतरी मुळी बारीक कुटून एका हळदीने माखलेल्या ओल्या कापडात गंडाळून ती पुरचुंडी रूग्णाला हुंगायला द्यायची नि चुटकीसारखा ताप गायब !  ही संजीवन चिकित्सा खरोखर विलक्षण म्हणायला हवी !
या विलक्षण मुष्टियोगांमुळे गोशा नि महाशयांदरम्यान घनिष्ट संबंध निर्माण झाले हे निर्विवाद. काही विशिष्ट संन्याशांकडून अशा प्रकारचे अनेक मुष्टियोग शिकण्याची ऊर्मी महाशयांना आली होती मात्र त्यांना वैद्यकी शिकवणाऱ्या शिक्षकांनी त्यांना त्यापासून परावृत्त केले होते. “ तूं आधुनिक उपचार पध्दत शिकला आहेस, म्हणून वैद्न्यानिक दृष्ट्या जे तर्कसंगत नाही त्याचा अवलंब तू करू नयेस. “

‘मी तुमच्याच कडे येत होतो काका’ मोती उद्गारला.
अखेर कोणीतरी बोलायला मिळाल्याचा महाशयांना आनंद झाला. ते आपल्या आसनावर स्थानापन्न झाले नि जवळचा तकिया जवळ ओढत म्हणाले, ‘ये, बसून घे ; कसं आहे सगळे काही ?’
‘कृपाकरून तुम्ही ताबडतोब माझ्याबरोबर चला’
‘कशासाठी ?’
माझ्या आईला पाहण्यासाठी.’
‘आता काय झालंय् तिला ?’
‘अहो, ती मागच्या महिन्यात तलावाच्या पायऱ्यांवरून पाय घसरून पडली आणि जायबंद झाली ; मी तिला लगेचच इस्पितळात नेले. त्यांनी मलमपट्टी करून काही दिवस विश्रांती घ्यायला सांगितले. दुखणे कमी पडले पण गेल्या आठवड्यापासून वेदना खूपच वाढल्या म्हणून तिला पुन्हा इस्पितळात नेले. त्यांनी निश्चित निदानासाठी एक्स-रे काढायला सांगितले. पण एक्स-रे तर खूप महाग असतो, म्हणून तुमच्याकडे यायचे ठरवले मी !’
जीवन महाशयांनी स्नेहपूर्वक स्मित केले. ‘बिचारा मोती ! त्याच्या म्हाताऱ्या आईला मानेचे दुखणे आहे ; अजूनही तो लहान मुलासारखी तिच्यावर अतोनात माया करतो नि लोक त्यासाठी त्याची टवाळी करतात तरीही. त्याला तिच्या वेदना पाहवत नाहीत पण एक्स-रे चा खर्च देखील त्याला झेपणारा नाही. अशा द्विधा मनस्थितीत त्याला साहाजिकच  मोशाय काकांची आठवण झाली .
‘ठीक आहे, मी तिला उद्या पहायला येईन. ‘
‘ नको नको, काका, तुम्ही आत्तांच चला ! तिचे किंचाळणे ऐकवत नाहीये हो ! तिचे बोलणे तर अक्षरश: पिळवटून काढतेय् मनाला . माझ्या जागीं तिला मुलगी असती तर तिने अधिक काळजी घेतली असती असं म्हणते ती ! तुम्हाला तर माहीतच आहे ना, की मी तिची हयातभर किती काळजी घेतलीय् ते ! आणि पहा माझ्या नशीबीं काय येतेंय् तें !! ‘ दुःखातिशयाने त्याला अश्रू आवरत नव्हते .
‘ चल, निघूंया तर मग ‘ डाक्टर उद्गारले नि होते तसेच शर्टही न घालतां चालूं लागले.
‘ तुमच्यासाठी छत्री आणू काय ‘ मोतीला त्यांची फिकीर होती.
‘ नको, ही नुसती रिमझिम आहे, काही वाकडे करूं शकणार नाही ‘.
डाक्टर संथगतीने चालतात नि त्यांची पाउलें भारी. ‘तुमची हरकत नसेल तर मी पुढे होतो काका’ असे म्हणत तो धावत सुटला. जीवन महाशयांनी ओळखले, त्याला पुढे जाऊन घर जरा नीटनेटके करायचे आहे ते ! कदाचित् आईच्या अंगावरचे फाटके वस्त्र झाकायचे असेल . मोतीच्या घरची परिस्थिती त्यांचेपासून लपलेली नव्हती. घराजवळ पोहोचताच ते किंचित खाकरले, ते आल्याची चाहूल देण्यासाठी .
‘मोती, तू आत आहेस ना ?’
‘आलोच काका ‘. त्याचा अर्थ त्याला अजून थोडा वेळ लागेल !
डाक्टरांनी ते मनावर घेतले नाही. त्यांनी तो वेळ रस्त्याचा मुआयना करण्यात घालवला, जेथून त्यांचा मित्र सिताब मुखर्जी त्याची पांढरी छत्री, हातांत कंदील नि काखेंत बुध्दिबळाचा पट मारून चालत येत असणार. पण कुठे आहे तो आज ?
दरम्यान, मोतीने त्यांना आत बोलावले.
ती वृध्दा खरंच खूप त्रासलेली होती ; मोतीने उगाच फार बाऊ नव्हता केलेला. डाक्टरांनी तिच्या गुढघ्यावर हात ठेवताच ती जोरात ओरडली. त्यांनी हात बाजूला केला ; तिला बराच ताप चढला होता म्हणून त्यांनी तिची नाडी तपासली.
‘ताप कधीपासून येतोय् ? ‘
‘तिला ताप आहे ?’ मोतीला कल्पना नव्हती.
‘अर्थात्, तिला ताप आहेच’
‘पण त्यात विशेष काही नाही, दुखणं थांबलं की ताप पण उतरेल’, मोतीची आई संकोचून उद्गारली आपला घुंगट वर न सरकावतां .
‘अं, खरंय् ते ; वेदनेसह ताप नि तापासकट वेदना !’
‘मात्र तापासाठी मी कुठलेही औषध घेणार नाही, तो आपोआप जाईल. मला फक्त वेदनेवर काही तरी द्या, तापाची चिंता करू नका. क्विंनाइन किंवा इंजेक्शन नकोच, आणि हो मला खाल्ल्याशिवाय राहवत नाही’ ती लाजून बोलायची थांबली.
‘काळजी नको, मी तुला उपाशी ठेवणार नाही’, डाक्टर हसत म्हणाले. ‘तू नववधू असल्यापासून ओलखतोय् मी तुला नाही ? तुला जेव्हा टायफॉईड झाला होता तेव्हा गोशा तुला मध्यरात्री स्वयंपाकघरातून गुपचुप खायला भात नि मासळी आणून देत असे. आणि म्हणूनच मी तुला ‘पोरेर-भात’ खायची परवानगी दिली होती. (पोरेर-भात म्हणजे मातीच्या भांड्यांत घट्ट झांकण लावून मंद आंचेवर शिजवलेले खूप जुने तांदुळ )
ते मोठ्याने हसूं लागले.
मोतीच्या आईने लाजून जीभ चावली ; खरं तर ती स्वत:च स्वयंपाकघरात लपून छपून जात असे ; तिच्या नवऱ्याने एक दिवस तिला पकडले आणि दुसऱ्या दिवसापासून डाक्टरांनी तिला शिजवलेला भात खायची परवानगी दिली होती !
‘आता काय खावंसं वाटतंय् तुला ?’
ती लाजेने चूर झाली ; काय बोलणार ती !
‘असूं दे ! जे खावंसं वाटेल ते खा’
‘पण औषधांचे काय ? मोतीने चिंतातुर होत विचारले.
‘काही विशेष नाही ; तिला फक्त नीट खायला-प्यायला दे. फार तर काली मंदिरातल्या मातीचा लेप दे जखमेवर नि शेकत राहा.’
‘मला वेदनेमुळे मरूं देणार की काय ?’ आता घुंगट वर करीत ती गरजली !
‘शेक देण्यासारखा उत्तम उपाय नाही, असं शास्त्र सांगते. मिठाच्या पुरचुंडीने शेकून सुध्दा आराम पडेल’.
‘म्हणजे ? औषध नाही, हवे ते खायची परवानगी, म्हणजे मी लवकरच  मरणार की काय ?’ घुंगट पूर्णपणे बाजूला करत नि डाक्टरांच्या नजरेला नजर देत तिने विचारले. तोच मूलभूत प्रश्न तिच्या डोळ्यात स्पष्टपणे तरळत होता, शेवटचा नि अंतिम !
केवळ तीनच प्रकारचे लोक अशा नजरेला सामोरे जावूं शकतात.  एक असतो न्यायाधीश, ज्याला मृत्युदंड सांगायचा असतो ; जर आरोपीने विचारले की मला मरावेच लागेल का ? तर त्याला ठामपणे सांगणे भाग आहे, होय नक्कीच ! दुसरा असतो जल्लाद, जो त्याला फासावर लटकवतो. आणि तिसरा असतो डाक्टर !
खूप जुन्या काळीं साठ-सत्तरी पार केलेल्या रूग्णांना ते सांगत, ‘काय उपयोग आहे आता जगत राहण्याचा ? तुम्ही पुरेसे जगून घेतलंय् असं तुम्हाला वाटत नाही काय ? आता नवीन पीढीला तुम्ही निरोप द्यायची वेळ आलीय्’, ते स्मित करून म्हणत !
त्यांचे वडील म्हणत, ‘ प्रार्थनेंत रमून जा ग़ोविन्द गोविन्द गोविन्द म्हणत ; भवसागर तरून जायचा तो सर्वोत्तम मार्ग होय !’
पण त्यांचे गुरू डाक्टर रंगलाल हे एक वेगळेच रसायन होते ; आपल्या रूग्णांदेखत ते मृत्युचे नावही काढत नसत . रूग्ण जेव्हा आग्रहाने विचारीत तेव्हा ते एवढेच म्हणत, ‘औषधाने आजार बरा होऊं शकतो पण त्याने मृत्यु टाळतां येत नाही’ आणि ते पट्कन घराबाहेर पडत.

जीवन महाशयांनी त्या वृध्देकडे पाहिले नि विचारले, ‘तुला कसला पश्चात्ताप होतोय का ? तुझा मुलगा, सून, नातवंडें सगळे जगणार आहेत; त्यांचा आनंदाने निरोप घे. वाटल्यास तीर्थयात्रा कर.’

मोती त्यांना मधेच अडवीत उद्गारला , ‘ व्वा ! तीर्थयात्रा ! ती रईसी आम्हाला परवडेल काय ? तीर्थयात्रा म्हणें !! ‘
‘वीसच मैलांचा तर प्रश्न आहे ; ट्रेनने जा नि एखादे घर भाड्याने घ्या. कितीसा खर्च येणार त्यात ? ‘कटोआ’ ला खूप शरणार्थी भरलेलेत. त्यापेक्षा उध्दरणपूर बरे राहील. मोकळीं हवा नि गंगामैया ; दररोज डुबक्या मारा, ज्यायोगें तिला नवीन आयुष्य मिळेल. बरं वाटलं तर महिन्याभरात, नाही तर ….! ‘ ते आपलं बोलणे पूर्ण करू शकले नाहीत घराबाहेर पडता पडतां.
‘ हात धुवायला जरा पाणी दे मोती !’

(क्रमश:……..






Comments: Post a Comment



<< Home

This page is powered by Blogger. Isn't yours?